दोन्हीही विचारप्रवाह माझ्या मनावर संस्कार करीत होते, त्यावेळी मी श्री. आत्माराम पाटील आणि राघूआण्णा या दोघांशी या बाबतीत जरूर बोलत असे.
राघूआण्णा हे भावनाप्रधान गृहस्थ होते. त्यांची एस्. एम्. जोशी आणि ना. ग. गोरे यांच्याशी वैयक्तिक मैत्री होती, म्हणून त्यांच्या प्रभावाखाली ते होते. मी असा शंकित होतो, हे त्यांना पटत नव्हते. तेव्हा त्यांनी एक मार्ग काढला. ते म्हणाले,
''आपल्या पुण्याला समाजवादी पुढाऱ्यांना काँग्रेस समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अधिवेशन घ्यावयाचे आहे. आपण ते कराडला घेऊ या.''
या वेळपर्यंत कार्यकर्ता म्हणून माझा बोलबाला झाला होता. मला मानणारे काही कार्यकर्ते तालुक्यात आणि जिल्ह्यात होते. माझ्या सहकार्याची त्यांना अपेक्षा होती, याची मला कल्पना होती आणि मी राघूआण्णांच्या प्रेमापोटी त्यांना होकार दिला आणि अशी परिषद आम्ही कराडमध्ये माझ्या कल्पनेने १९३५ साली भरविली. राघूआण्णांच्याबरोबर या परिषदेचा सरचिटणीस म्हणून मी काम केले. आम्हांला शक्य होती, तितकी उत्तम तयारी केली. बाहेरून येणा-या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी केली.
या परिषदेचे अध्यक्ष म्हणून श्री. युसूफ मेहेरअल्ली हे आले होते. परिषदेचे काम दीड दिवस चालले. पुढाऱ्यांची भाषणे झाली. जे काही ठराव त्यांना करावयाचे होते, ते त्यांनी मंजूर करून घेतले आणि दुस-या दिवशी परिषद संपून पाहुणे मंडळी निघून गेली.
परिषदेचा एक चिटणीस या नात्याने युसुफ मेहेरअल्लींची माझी प्रथमच भेट आणि ओळख झाली होती. मोठा उमदा तरुण, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि तितकेच आकर्षक वक्तृत्व, त्याचबरोबर १९३०-३२ च्या चळवळीतून केलेल्या स्वार्थत्यागाची पार्श्वभूमी यामुळे पुढारीपणाला आवश्यक असलेले सगळे गुण त्यांच्याजवळ होते, असे मला दिसून आले. व्यक्ती म्हणून त्यांनी माझ्यावर प्रभाव पाडला.
ज्यावेळी ही परिषद कराडमध्ये होत होती, त्याच वेळी आमच्या जिल्ह्यात रॉयवादी मंडळींनीही आपला मुक्काम कराडमध्येच ठेवला होता. परिषदेमध्ये झालेल्या चर्चेवर ते टीका-टिपण्णी करीत होते. त्या संदर्भात ते माझी काहीशी उलटतपासणीही करीत होते. मूलतः त्यांनी हा प्रश्न विचारला,
''स्वतंत्र परिषद घेऊन तुम्ही कोणता नवीन विचार मांडला, हे सांगाल काय? उद्या या जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाची आखणी करण्याकरता जेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांपुढे जाल, तेव्हा या तुमच्या परिषदेने काही नवीन कार्यक्रम द्यायचा प्रयत्न केला आहे काय ?''
हे त्यांचे प्रश्न रास्त होते आणि मजजवळ त्यांची उत्तरे नव्हती.
परिषद संपून गेल्यानंतर आमच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी माझी बरीच उलटसुलट चर्चा झाली आणि मी या मताशी आलो, की काँग्रेस समाजवादी पक्षाचा सदस्य म्हणून काम करणे मला शक्य होणार नाही, यावेळी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या प्रभावाखाली काम करणा-या कार्यकर्त्यांचा विचार मनात अधिक वावरत होता, ही गोष्ट कबूल केली पाहिजे. त्यामुळे ही परिषद संपून गेल्यानंतर एक-दोन आठवड्यांतच काँग्रेस समाजवादी पक्षाचा राजीनामा देऊन मी यातून मुक्त झालो. राघूआण्णांना मी सांगितले,
''तुमच्याबद्दलच्या वैयक्तिक आदरामुळे आणि प्रेमामुळे मी या परिषदेची जबाबदारी स्वीकारली होती. आता परिषदेचे कार्य यशस्वीरीत्या पार पडले आहे. माझे आजचे जे विचार आहेत आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांबद्दल जो अनुभव आहे, त्यांवरून यापुढे या पक्षाशी संबंध ठेवणे मला शक्य नाही. यामध्ये त्या पक्षाच्या धोरणावर किंवा त्यांच्या नेतृत्वावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही. हे सर्व काँग्रेसमधील मोठे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याबद्दल मला आदरच राहील. परंतु या संघटनेचा एक सदस्य म्हणून काम करणे माझ्याच्याने होणार नाही.''