गेल्या तीन-चार दिवसांपासून कराडहून माधवराव जाधव साहेबांना सारखे फोर करू लागले. त्यांनी कराडला साहेबांचा नागरी सत्कार आयोजित करण्याचं ठरविलं होतं. साहेब पाहू, बघतो, तारीख कळवतो असं म्हणून जाधवांना टाळू लागले. जाधवांनी शेवटी साहेबांना निर्वाणीचा निरोप दिला की, ''आम्ही रविवारी नागरी सत्कार आयोजित केला आहे. आपणास येणे अनिवार्य आहे.''
कराडमध्ये सत्काराचा ज्वर चढू लागला. बाबुराव कोतवाल सत्कार समितीचे सचिव होते. माधवराव जाधव आणि साहेबांचे चळवळीतील सर्व सहकारी सत्कार भव्य आणि दिव्य व्हावा म्हणून झटू लागले. त्यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी वयोवृद्ध आणि साहेबांवर सर्व प्रसंगात प्रेमाची सावली धरणारे दादासाहेब फडके वकील यांची निवड केली. बसस्थानकाजवळील मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला. या सत्काराचे निमंत्रण साहेबांच्या पाठीराख्यांना तर दिले; पण काही कारणास्तव साहेबांपासून दुरावलेल्यांनादेखील निमंत्रणपत्रिका दिल्या. निवडणूक संपल्यानंतर काही दिवसांत त्यांना आपली चूक कळून आली होती. बाबुराव कोतवाल, माधवराव जाधव, बाबुराव काळे, डॉ. गजानन पावसकर, मारुती डांगे, राजाराम जिरंगे, रामविलास लाहोटी, यशवंतराव मुळे, अण्णासाहेब रैनाक, हरिभाऊ लाड, सिंहासने यांनी एकत्र येऊन 'न भूतो न भविष्यति' असा हा सत्कार व्हावा असा चंग बांधला.
मंत्री झाल्यानंतर साहेब प्रथमच कराडला येणार होते. डोंगरे यांच्याकडून कळलं की, साहेब प्रथम घरी येत आहेत. मी, सोनूताई आणि राधाक्कानं साहेबांना ओवाळण्याची तयारी केली. आमच्या चिमण्या चिवचिव करू लागल्या. सुधा आणि लीला यांनी आग्रह धरला - आम्हीच काकांना ओवाळू ... आम्ही तुम्हाला ओवाळू देणार नाही. आईनंही त्यांची बाजू घेतली. शेवटी तह करण्यात आला. तहाअंती ठरलं... आमच्या कन्यारत्यांनी काकाला ओवाळावं. ठरलेल्या वेळेला साहेबांची गाडी घरासमोर येऊन उभी राहिली. मागेपुढे पोलिसांच्या गाड्यांचा ताफा. त्या गाड्यांतून उतरलेल्या पोलिसांनी साहेबांच्या गाडीभोवती कडं केलं. साहेब गाडीतून उतरले. साहेबांनी त्यांना 'याची काही गरज नाही' असं सांगितलं. ते बाजूला झाले. साहेब घरात येण्यापूर्वी आमच्या चिमुरड्या कन्यांनी साहेबांना घराच्या उंबरठ्यावर ओवाळलं. आम्ही आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहतच उभं राहिलो. आई घरात बसल्या होत्या. त्यांच्या अवतीभोवती हरिभाऊ, राघूअण्णा लिमये, सिंहासनेअप्पा उभे होते.
साहेब घरात आले. आईच्या पायावर माथा टेकविला. आईच्या बाजूबाजूला उभ्या असलेल्या मित्रांची गळाभेट घेतली. सत्कार समितीचे कार्यकर्ते साहेबांना घेण्यासाठी आले. डुबल गल्लीपासून जुन्या बसस्थानकाच्या मैदानापर्यंत उघड्या जीपमधून साहेबांची मिरवणूक काढली. संपूर्ण कराडची जनता रस्त्याच्या दुतर्फा उभी राहून साहेबांवर फुलांचा वर्षाव करीत होती. साहेब त्यांच्या स्वागताचा हात जोडून स्वीकार करीत होते. साहेब सभास्थानी पोहोचले.
सभामंडप लोकांनी खचाखच भरला होता. पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. अनेकजण उभे राहून सत्कार सोहळ्याचा आनंद घेत होते. अनेक वक्तयांची भाषणे झाली. बाबुराव कोतवालांनी ओजस्वी व भावनात्मक भाषण करू सभा जिंकली. सर्वांचे स्वागत केले. विशेष म्हणजे जे गैरसमजापोटी साहेबांना सोडून गेले होते ते सर्वजण येथे हजर होते. साहेबांच्या दृष्टीनं सर्वात आनंदाची घटना म्हणजे साहेबांचे स्वातंत्र्यचळवळीतील सहकारी पांडुरंग डोईफोडे हजर होते. त्यांनी साहेबांचं बालपण, तुरुंगवास, चळवळीतील घटनांचा साक्षात इतिहास जनतेसमोर उभा केला. साहेबांच्या मनाच्या मोठेपणाचे प्रसंग सांगितले. त्यांना आपल्या भावनांना आवर घालता आला नाही. शेवटी भावनाविवश होऊन बोलण्याचे थांबवून ते खाली बसले. संपूर्ण सभेत सन्नाटा पसरला. सत्कार समितीचे अध्यक्ष दादासाहेब फडके यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार केला. सर्व जनता उभी राहून टाळ्यांच्या कडकडाटात साहेबांचा सत्कार करीत होती. सांगली, सातारा पंचक्रोशीतील सर्व संघटना, संस्था, व्यक्तींनी साहेबांचा पुष्पहार घालून सत्कार केला. हा सत्कार सोहळा पाहून सामान्य जनतेच्या डोळ्यांचे पारणे फिटले.