''वेणू, तू आज विवाहाचा प्रश्न काढला. यापुढे तो काढायचा नाही. राहिला वंशाच्या दिव्याचा प्रश्न. वंशाला दिवा पाहिजे तर ज्ञानोबादादा आणि गणपतदादांची मुलं आता आपलीच आहेत. त्यांना आपल्याशिवाय कोण वाली आहे त्यांनाच वाढवायचं, त्यांचं चांगलं पालनपोषण करायचं. तू त्यांची आई होऊन त्यांचं जीवन घडवायचं. तेच आपले वंशज. या संसारात अनेक अशी मुलं आहे की, ज्यांना आईबाप माहीत नाहीत. असले तर त्यांची या मुलांना घडविण्याची ऐपत नाही. त्यांचे आपण मायबाप होऊन आपलं जीवनकार्य सार्थकी लावू. यापुढे तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी.... विवाहाचा विषय यानंतर काढायचा नाही.'' साहेब.
अंधार दाटून आला होता. मी व साहेब दवाखान्याच्या वाटेला लागलो. दिवेलागणीच्या वेळेस आम्ही दवाखान्यात पोहोचलो. चंद्रिकाताई आमची वाट पाहत दवाखान्यासमोर उभी होती. आम्ही दोघं जोडीनं फिरून आलेलं पाहून तिला आनंद झाला. साहेबांनी आज मिरजेला मुक्काम केला. दुसर्या दिवशी आमचा निरोप घेऊन साहेब मुंबईला गेले.
खेर-मोरारजी देसाई यांच्या कारभारावर बहुजनवादी मंडळी नाराजी व्यक्त करू लागली. या दोघांकडून ग्रामीण शेतकरी, शेतमजुराला न्याय मिळण्याची सूतराम शक्यता नव्हती. त्यांचे सर्व निर्णय धनदांडग्या आणि उच्चवर्णीयांच्या हिताचे असायचे. यात गुजराती प्रतिनिधी व 'जैसे थे' वादी प्रतिनिधी संतुष्ट असायचे. खेर-मोरारजी मंत्रिमंडळानं शिक्षण धोरण ठरविताना 'इंग्रजी' या विषयाला शिक्षण अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
प्रतिगामी वृत्तीच्या लोकांच्या आग्रहाखातर शिक्षणाचं माध्यम मातृभाषा असावं, असं एक विधेयक सभागृहासमोर ठेवण्यात आलं. धार्मिक श्रध्देचं जतन करण्याचा प्रतिगाम्यांचा उद्देश होता. तो त्यांनी या विधेयकाच्या माध्यमातून साध्य केला. यापाठीमागचा हेतू असा की, ग्रामीण भागातील जनता शिकून ज्ञानी झाली तर आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. सरकारी नोकरीत एका वर्गाचं वर्चस्व अबाधित राहावं हाही हेतू या विधेयकामागे होता.
शेतकरी कामगार पक्षात बहुजनाचे स्वतःला कुलवंत म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधी असल्यानं काँग्रेसमधील अनेक तरुण या पक्षाकडे आकर्षित होऊ लागले. साहेबांनी या पक्षस्थापनेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळं गांधी-नेहरूंच्या विचारांचे बहुजनांतील कार्यकर्ते साहेबांकडे मोठ्या आशेनं पाहू लागले. साहेबांनी या विचाराच्या कार्यकर्त्यांची एक बैठक अध्यक्षाच्या परवानगीनं मुंबईला तांबे यांच्या आरोग्य भवनात आयोजित केली. काँग्रेसचे आमदार व कार्यकर्ते मिळून सुमारे ७५ ते ८० निमंत्रित या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत जनतेला व कार्यकर्त्यांना उद्देशून एक आवाहन करणारा धोरणात्मक मसुदा तयार करण्यात आला -
''स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बहुजनांच्या आशा-आकांक्षांना खतपाणी दिलं जातं आणि लोकशाहीला ते अभिप्रेत असतं. या आशा-आकांक्षा फलद्रूप होण्याकरिता सरकारही भरभक्कम व कर्तव्यदक्ष असावं लागतं. असं सरकार काँग्रेस पक्षच देऊ शकतो. आर्थिक उन्नती करायची असेल तर देशाच्या उत्पन्नातही वाढ झाली पाहिजे. उत्पन्नात वाढ झाल्याशिवाय देश स्वावलंबी व स्वयंपूर्ण होऊ शकणार नाही. हे सर्व करण्याकरिता सशक्त सरकारची आवश्यकता असते. सक्षम सरकार देण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी एकसंध राहणे आवश्यक आहे.''
या मसुद्यावर साहेब, स्वामी सहजानंद भारती, बाबासाहेब शिंदे, शि. र. राणे, बाबासाहेब घोरपडे, वामनराव पाटील, डॉ. कृ. भि. अत्रोळीकर, अमृतराव रणखांबे यांच्या सह्या होत्या. साहेब मुंबईला मरीन लाईनला राहत होते. जे मसुद्यातील विचारांशी सहमत असतील त्यांनी साहेबांच्या पत्त्यावर लेखी सहमती कळवावी, अशी विनंती करण्यात आली होती. संपूर्ण मुंबई राज्यातून ग्रामीण व शहरी कार्यकर्त्यांची हजारो सहमतीपत्रे आली.