माझी प्रकृती औषधाला प्रतिसाद देऊ लागली. अधूनमधून मिरजेला येऊन साहेब भेटून जायचे. आम्ही बराच वेळ बोलत बसायचो. मी लवकर बरं व्हावं असं साहेबांना वाटायचं.
मीही साहेबांना म्हणाले, ''मलाही आता केव्हा बरी होते आणि तुमच्यासोबत मुंबईला येते असं झालंय.''
''आत तुझी तब्येत ठीक झाली की, आपण इथूनच मुंबईला जाऊ. तिथेच तुझ्यावर चांगले उपचार करता येतील.'' साहेब.
माझी प्रकृती झपाट्यात सुधारू लागली. मी आणि चंद्रिकाताई मिरजेच्या मोकळ्या हवेत फेरफटका मारून यायचो. माझ्यात उत्साह संचारला. मी आईची व राजाची चौकशी केली. भागीरथीताईंच्या प्रकृतीची माहिती घेतली. आई एक-दोन वेळेस मिरजेला येऊन माझ्या प्रकृतीची चौकशी करून गेल्याचं चंद्रिकाताईनं मला सांगितलं. राजाला मला पाहायचं आहे. मी डॉक्टरांना विचारलं; पण डॉक्टरांनी मला परवानगी दिली नाही. एक दिवस साहेब मुंबईहून मिरजेला मला भेटावयास आले. मी ठणठणीत बरी झालेलं पाहून आनंदी दिसले.
मीच साहेबांना विनंती केली, ''आपण आज दूरवर या माळरानावर फिरायला जाऊ या का ?''
''तू माझ्या मनातलं बोललीस. चल, जाऊया.'' साहेब.
आम्ही दोघं मिरजेच्या या माळरानावर दूरवर चालत गेलो. किती लांब चालत आलो याचं भानच राहिलं नाही. सूर्याला मावळतीची घाई झालेली होती. एक चांगलीशी जागा निवडून आम्ही तिथं बसलो.
मी साहेबांना म्हणाले, ''आपण लवकरच कराडला जाऊ. मुलं त्रास देत असतील आईला.''
''नाही. आता घाई करायची नाही. डॉक्टरांचा सल्ला प्रमाण मानून यापुढं आपण आपला संसार करायचा.'' साहेब.
''बरं झालं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याचा विषय काढला. मी माझ्या आजाराविषयी डॉक्टर साहेबांशी सविस्तर चर्चा केली. यापुढे घ्यावयाची काळजी, आहार, पथ्य इत्यादी बाबतीत डॉक्टर साहेबांना विचारून घेतलं. बोलण्याच्या ओघात डॉक्टर साहेब असंही म्हणाले, ....'' मी.
माझं बोलणं मी मध्येच थांबवलं. मला साहेबांना जे सांगायचं होतं ते सांगावं की नाही याचा विचार मी करू लागले.
''काय म्हणाले डॉक्टर ?''
''काही नाही. सांगेल तुम्हाला कधीतरी.'' मी.
''मला सांगण्यासारखं नसेल तर मी आग्रह धरणार नाही. आपल्या दोघांच्या संबंधात असेल तर मला सांगायला काही संकोच करू नको.'' साहेब.