''आपल्या दोघांच्या संबंधातच आहे.'' मी.
''माझ्यापासून लपवून ठेवण्यासारखं असेल तर नको सांगू. तुझ्या आणि माझ्या संबंधातील तो सल्ला असेल तर डॉक्टर मलाही तो सल्ला सांगतीलच.'' साहेब.
शवेटी माझा नाइलाज झाला. मला साहेबांना सांगावंच लागलं.
''डॉक्टरांनी सांगितलं... माझी फुफ्फुसं कमजोर झाली आहेत. त्यामुळे आपल्याला संतती होणार नाही.''
साहेब क्षणभर स्तब्ध राहिले. मी त्यांच्या चेहर्यावरील हावभाव निरखू लागले. कुठलाही भाव त्यांच्या चेहर्यावर मला दिसला नाही. एखाद्या स्थितप्रज्ञासारखे डुबणार्या सूर्याकडे नजर लावून बसले.
मीच त्यांना म्हणाले, ''ऐकलंय ना मी काय म्हटले ते ?''
''हो, ऐकलंय.'' साहेब.
''मला असं वाटतंय, तुम्ही दुसरं लग्न करावं.'' मी.
''कशाकरिता ?'' साहेब.
''तुम्ही तरुण आहात. तुमचं नाव झालेलं आहे. पुढेही तुम्ही जीवनात यशस्वी होणार आहात. मग तुमच्या वंशाला दिवा नको का ?'' मी.
''लौकिकार्थानं तुझं म्हणणं बरोबर आहे. मी तुला पसंत केलं ते वंश वाढविण्याकरिता नाही. मला आणि आणि माझ्या आईला सांभाळणारी सून आमच्या घराण्याला हवी होती. तशी तू आहेस. माझ्या पसंतीत तू उत्तीर्ण झालीय.'' साहेब.
''आता तुम्हाला माझं म्हणणं पटणार नाही; पण पैपाहुण्यांकडून आणि घरातून तुम्हाला भरीस घालण्यात येईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. आता कुठलाही खानदानी मराठा आपली मुलगी तुम्हास द्यावयास तयार होईल.'' मी.
''वेणू, मी तुझी निवड केली ते घरंदाज मुलगी म्हणून. खानदानी मुलीचा प्रश्न काढला म्हणून सांगतो, तुला पाहण्यापूर्वी मी एक खानदानी मुलगी कोकणात मालवणला पाहिली होती. मुलीचे वडील ब्रिटिश सरकारमधील निवृत्त डीवायएसपी होते. साळवी की असंच काही त्यांचं नाव. मुंबईतील स्वातंत्र्यचळवळीतील कार्यकर्ते गोडसे यांनी ते स्थळ सुचविलं होतं. गोडसे हे सातारा जिल्ह्यातील रहिवासी होते. ते आणि माझे दोन-तीन मित्र सोबत घेऊन मी मालवणला मुलगी पाहावयास गेलो. मुलगी आमच्यासमोर आली ती पाश्चिमात्य कपडे घालूनच. आम्ही तिला प्रश्न विचारायच्याऐवजी तीच आम्हाला प्रश्न विचारू लागली. तिच्या वडिलांचाही मला आग्रह होता 'दोघांना एकांतात काही बोलायचं असेल तर बागेत जाऊन बोलू शकता, एकमेकांना समजावून घेऊ शकता.' त्यांच्या सूचनेला मी नकार दिला. गोडसे यांनी त्या मुलीला काय प्रश्न विचारले ते मला आज आठवतदेखील नाही. त्या वातावरणात माझा दम घुटू लागला. केव्हा त्यांच्या तावडीतून सुटका होते याची मी वाट पाहू लागलो. एकदाचं हातावर पाणी पडलं. त्या खानदानी घराण्याचा आम्ही निरोप घेतला. रस्त्यानं गोडसे यांनी माझ्यामागे तगादा लावत शेवटपर्यंत हा विवाह जमावा म्हणून प्रयत्न केले. अर्थातच मी नकार दिला.'' साहेब.
साहेबांनी सांगितलेली हकिकत ऐकून मी थक्कच झाले. माझ्यासारख्या कमी शिकलेल्या मुलीसोबत साहेबांनी विवाह का केला या रहस्याचा उलगडा मला आज झाला.
मीच साहेबांना म्हणाले, ''निघूया का ?''