या चक्रीवादळाचा एक-एक पाश तोडताना, तुम्हाला राजकीय डावपेच आखताना घ्यावे लागलेले निर्णय किती अचंब्यात टाकणारे होते... इंदिराजी वसंतराव नाईक यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार अशी कुणकुण तुम्हाला लागताच तुम्ही प्रतिडाव टाकला. औरंगाबाद मुक्कामी वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदी राहतील असं जाहीर केलं. मराठवाड्याची जनता नाराज झाली. त्यामागील डावपेचाचा उलगडा 'सत्तेचे मोहरे' हे जगन फडणीस लिखित पुस्तक वाचल्यानंतर होतो. या पुस्तकात आपण आपल्या सहकार्यांना मराठवाड्याला न्याय द्यायचा आहे म्हणून प्रदेश काँग्रेसचे त्यावेळचे सचिव, गाडगीळ, शरद पवार, तुषार पवार यांना सूचना केल्या,
'शंकरराव चव्हाण यांनी खात्यात चांगले काम केले आहे; पण नेत्यासाठी लागणारे गुण त्यांच्यात नाहीत. ते कार्यक्षम आहेत. शंकररावांना मुख्यमंत्री करावयाचे आहे. तुम्ही त्यांची विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात इमेज वाढवा.'
योगायोगाला तुमच्या राजकीय जीवनात अतिमहत्त्वाचं स्थान राहिलेलं. दिल्लीकरांनी महाराष्ट्रातून तुम्हाला मिळणारी राजकीय रसद तोडण्याचा डाव आखला. प्रथम बाळासाहेब देसाई, पी. के. सावंत, यशवंतराव मोहिते, वसंतदादा पाटील या तुमच्या मावळ्यांना दिल्लीने सुभेदारी देऊ केली; पण या मावळ्यांनी इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला होऊ द्यायची नाही. पुन्हा संताजी-धनाजी निर्माण होऊ द्यायचे नाही; असं दिल्लीला ठणकावून सांगितलं.
साहेब, आपण जर ध्येयवादाच्या यशस्वितेसाठी धोके पत्करण्याची तयारी दर्शविली असती तर तुम्ही अखिल भारतीय कीर्तीचे महान नेते, कदाचित पंतप्रधानही झाले असता, असं मत मोहन धारिया यांनी आपल्या बाबतीत व्यक्त केलं. (सफर; ११३)
साहेब, दिल्लीनं राजकारणात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जे डिवचलं ते सुसंस्कृत व राजकारणात साधनशुचितेला महत्त्व देऊन राजकारण करणार्या मंडळींना आवडलं नाही. १९७९ मध्ये शरदरावांनी आपल्या कृतीनं दिल्लीला विरोध केला.
शेवटी दिल्ली यशस्वी झाली. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही राजकीय कमकुवत मासे दिल्लीच्या गळाला लागले. महाराष्ट्रातील तुमची रसद तोडण्यात दिल्ली यशस्वी झाली. मराठवाड्यातील फाटक्या लुगड्यातील एका मातेनं खाऊसाठी तुम्हाला एक रुपया दिला. त्या मराठवाड्यात आपण राजकारणातील आपल्या राजकीय वनवासाच्या वाटेवरून जात असताना विदर्भातील गायधनी नावाच्या कवीची कविता व्यक्त करून आपल्या राजकीय जीवनाचं सार सांगितलं...
'अंगावर चिंध्या पांघरूण
सोनं विकायला बसलो तर...
गिर्हाईक फिरकता फिरकेना...
सोनं अंगावर पांघरुण
चिंध्या विकायला बसलो तर...
गर्दी आवरता आवरेना...'
साहेब, मी तुम्हाला मागे सोडून जात असताना मला अतीव यातना होताहेत. भारतीय संस्कृतीत स्त्रीला आहेव मरण येणं हे सत्कर्म केल्याचं लक्षण समजलं जातं. आज मी आहेव मरणाच्या वाटेवर आहे. काही क्षणातच मी तुमची साथ सोडणार... तुमच्या भवितव्याची काळजी काळजात ठेवून घेत मी तुमची साथ सोडते...''
साहेबांनी माझ्या तोंडात पाण्याचा एक थेंब टाकला. तो मी गिळला. मी साहेबांकडे व माझ्याभोवती जमलेल्या माझ्या रक्तामांसाच्या माणसांकडे नजर फिरविली तोच माझा श्वास मला सोडून गेला.