साहेबांनी सर्वांना बोलावून घेतलं. गोकुळावाणी भरलेलं घर मी पाहिलं. दम्यानं मला घेरलं. मला होत असलेल्या वेदना मी माझ्या चेहर्यावर येऊ नयेत म्हणून प्रयत्न करायचे. आता मला होणारा त्रास माझ्या सहन करण्याच्या पलीकडे गेला. सर्वजण माझ्या आजूबाजूला बसून आहेत. डॉ. कुरोली यांनी मला दवाखान्यात भरती करण्याचा सल्ला साहेबांना दिला.
साहेब माझ्याजवळ आले व म्हणाले, ''वेणू, डॉ. कुरोली याचं मत आहे, तुला दवाखान्यात भरती करावं लागेल.''
मी एकटक साहेबांकडं बघितलं.
क्षीण आवाजात म्हणाले, ''मला काही होणार नाही. तुम्ही तुमची काळजी घ्या. डॉक्टर साहेब, आपण साहेबांची काळजी घ्या.''
आज तारीख १ जून १९८३. माझा त्रास वाढला. सर्व घर माझ्याभोवती फिरतंय. साहेबांना बोलावून घेतलं. साहेबांपाठोपाठ सर्व लहानथोर मंडळी माझ्या खोलीत आली. साहेबांनी माझं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. मी साहेबांचा चेहरा न्याहाळू लागले.... साहेबांच्या कर्तृत्वाची एक-एक आठवण मला आठवू लागली... साहेबांनी मला अनेक पत्रे लिहिली; पण मी मात्र त्यांना एकही पत्र लिहिलं नाही. माझ्या मनात मी साहेबांना लिहिण्यासाठी जे साठवून ठेवलं ते मी आता मनातल्या मनात व्यक्त करू लागले....
''साहेब, आपण सह्याद्रीच्या कुशीत वाढलात. सह्याद्रीच्या वार्याची दिशा आपण आपल्याला हवी तशी बदलविली. तिला आपलंस केलं. सह्याद्रीच्या वार्यानं तुमच्या कलानं वाहण्याचं मान्य केलं. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या दिल्लीच्या वार्याची दिशा बदलविता बदलविता तुमची दमछाक झाली. महाराष्ट्रातील अनुस्वरांच्या संस्कृतीला तुम्ही जिंकलं. त्या अनुभवाच्या शिदोरीवर तुम्ही दिल्लीतील अनुस्वरांच्या संस्कृतीला जिंकू शकला नाहीत. दिल्लीवर या संस्कृतीचा पगडा जबरदस्त तरीपण तुम्ही तुमच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचं मोहजाळ दिल्लीवर टाकलं. तुमच्या मोहजाळात दिल्ली थोडी घुटमळली. तुमच्या कर्तृत्वाचे गोडवे गाऊ लागली. तेथेच दिल्लीचे वारे तुमच्या विरोधात घोंगावू लागले.
साहेब, आपण भारताचे संरक्षणकर्ते झालात. त्यात यशाचं शिखर गाठलं. दिल्लीची जनता आपल्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यासाठी रामलीला मैदानावर सज्ज झाली. दिल्लीतील तथाकथित साहित्यिक मंडळी दरवर्षी गणतंत्र दिवशी दिल्ली प्रदेश हिंदी साहित्य संमेलन भरविते. या संमेलनाचे उद्घाटक होता आपण. दिल्लीत चर्चा होती - देशाचं संरक्षण करणार्या या महाराष्ट्रपुत्रानं साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्याचं मान्य कसं केलं ? साहित्यक्षेत्राशी यांचा काय संबंध ? या उत्सुकतेपोटी आणि देशाचं संरक्षण करणार्या तुम्हाला पाहण्यासाठी येणार्या साहित्यिकांना आणि प्रेक्षकांना रामलीला मैदानावरील सभामंडप अपुरा पडू लागला. श्रोत्यांची तोबा गर्दी पाहून अटलबिहारीजींसारख्यांना प्रश्न पडला - या जनसागरातून तुमची नौका पार पडेल किंवा नाही ? निर्धारित वेळेला तुम्ही पोहोचलात.