राजाच्या अकाली जाण्यानं मी खचून गेले. मला जगण्यात स्वारस्य राहिलं नाही. माझ्या दम्यानं उचल खाल्ली. मी अंथरुण धरलं. मी साहेबांना विनंती केली, ''उन्हाळ्याच्या सुटीत सूनबाई मंगला, नात वीणा व नातू सिद्धार्थ यांना दिल्लीत बोलावून घ्या. मला त्यांच्या सहवासात राहण्याची इच्छा झाली.''
साहेबांनी सूनबाई मंगला, सिद्धार्थ व वीणाला बोलावून घेतलं. एक महिना माझ्यासोबत राहिले. सुट्या संपण्याची तारीख जवळ येऊ लागली. मी मंगलला जवळ घेतलं. तिच्या कपाळाकडं पाहून मला रडू कोसळलं. मी तिला पोटाशी धरलं. तीही माझ्याकडं पाहून रडू लागली. आम्ही सासू-सुनानं एकमेकींकडं पाहून रडून घेतलं. मी तिला व तिनं मला सावरलं. साहेब बाहेर नातू व नातीला खेळवीत होते.
मी मंगलाला म्हणाले, ''मंगला, साहेबांनी तुझ्याबद्दल माझ्या काय भावना व्यक्त कराव्यात ?''
''काय म्हणाले साहेब ?'' मंगला.
''साहेब म्हणाले, मंगलामध्ये मला विठाई दिसतात. मी चार वर्षांचा असताना माझे वडील गेले. विठाईसमोर आम्हा भावंडांच्या भावी आयुष्याचा डोंगर उभा राहिला. विठाई डगमगली नाही. संकटांशी आणि अंधकाराशी झुंजली. गरिबीला जुमानलं नाही. आम्हाला घडविलं. मंगलाला गरिबीची झळ पोहोचलेली नाही. सिद्धार्थही चार-पाच वर्षांचा आहे. नियतीनं त्याच्या वडिलाला त्याच्यापासून हिरावून घेतलं. मंगलाने या संकटावर मात करावी. सिद्धार्थ आणि वीणाचा विठाई होऊन या चव्हाण कुटुंबाच्या वारसांना घडवावं...'' मी.
''आई, असं म्हणाले साहेब माझ्याविषयी !'' मंगला.
''होय ! मंगला, साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहीत नाही. साहेब कुटुंबातील कुणालाही प्रत्यक्ष काहीही बोलत नाहीत. ते भावनावश होऊन सर्वांबद्दल माझ्याजवळ काळजी व्यक्त करतात. त्याचा अर्थ मी असा लावते की, मी त्यांच्या या भावना यथावकाश तुमच्या कानावर घालाव्यात.'' मी.
''आई, मी सिद्धार्थ आणि वीणाची विठाई होईल. या दोघांचं भविष्य घडवील. चव्हाण आणि माझ्या माहेरच्या घराण्याचा नावलौकिक वाढवील.'' मंगला.
आम्हा दोघींचं हे बोलणं चालू असतानाच मला अस्वस्थ वाटू लागलं. मी साहेबांना आत बोलावून घेतलं. माझा जड झालेला आवाज ऐकून साहेब कावरेबावरे होऊन माझ्याकडं पाहू लागले. कदाचित माझा खोल गेलेला आवाज ऐकून त्यांना काही संकेत मिळाला असावा असा भाव साहेबांच्या चेहर्यावर मला दिसला.
मी साहेबांना म्हणाले, ''बाबासाहेब, शामराव, अशोक व दादाला इथं बोलावून घ्या. मला त्यांना डोळे भरून पाहायचंय.''