२० नोव्हेंबरला सायंकाळी साहेब दिल्ली विमानतळावर उतरले. दिल्लीनं आपलं धक्कातंत्र सुरू केलं. साहेबांच्या स्वागताला सरसेनापती थापरऐवजी सनसेनापती म्हणून जनरल चौधरी हजर होते. साहेब विमानतळावरून 'तीनमूर्ती' या नेहरूजींच्या निवासस्थानी पोहोचले. नेहरूजी आत्मविश्वासानं साहेबांसोबत बोलले. दिल्लीत अतिवेगानं घडणार्या घटनांची कल्पना साहेबांना दिली. थापर यांचा राजीनामा, त्यांच्या जागी जनरल चौधरी यांनी नेमणूक, नेफामधील आताच्या घडीला काय परिस्थिती आहे, चीनचे सैन्य कुठल्याही क्षणी हिमालय ओलांडून भारतभूमीवर पाय ठेवेल याची कल्पना साहेबांना दिली. नेहरूजींशी चर्चा करतानाच साहेबांना कळलं की, इंदिरा गांधी यांनी आसाम सीमेचा दौरा निश्चित केलेला आहे. साहेबांनी इंदिरा गांधींसोबतही चर्चा केली. काळ, काम आणि वेग यांचा ताळमेळ घालता घालता मध्यरात्र केव्हा उलटून गेली हे साहेबांना कळलंही नाही. दिल्लीत मोरारजींच्या घरी साहेबांचा मुक्काम असायचा. रात्री साहेब मोरारजींच्या निवासस्थानी पोहोचले. मोरारजींशी विचारविनिमय झाला. नेहमीच्या थांबायच्या खोलीत साहेब पोहोचत असतानाच दूरध्वरी खणखणू लागला. एवढ्या रात्री कुणाचा फोन असेल, चीनकडून अधिकची कागाळी तर झाली नसेल ? या मनःस्थितीत साहेबांनी दूरध्वनी उचलला. तिकडून 'मी बिजू पटनाईक बोलतोय. आपल्याला वेळ असेल तर मला तुमच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. मी आपल्याकडे यावयास निघलो आहे.'' साहेबांच्या उत्तराची वाट न पाहता त्यांनी फोन ठेवून दिला.
बिजू पटनाईक नेहरूजींचे अतिविश्वासू सहकारी. त्यांना नकार देणं साहेबांना अशक्य होतं. साहेब आणि बिजू पटनाईक यांची संरक्षण खात्यासंबंधी चर्चा झाली. पटनाईक यांनी संरक्षण खात्यातील समस्या, लष्करी डावपेच इत्यादींचा ऊहापोह केला. पटनाईक एकटेच बोलत होते. साहेब ऐकण्याची भूमिका आत्मीयतेनं पार पाडीत होते. मध्येच साहेबांच्या अस्मितेला धक्का पोहोचेल असा प्रश्न पटनाईक यांनी केला.
पटनाईक म्हणाले, ''तुम्ही दिल्लीत अशा संकटसमयी कशाला आलात ?''
साहेब या प्रश्नानं अचंब्यात पडले. या प्रश्नाच्या धक्क्यातून सावरतानाच दुसर्या धक्का पटनाईकांनी साहेबांना दिला.
पटनाईक म्हणाले, ''चीनचं सैन्य वेगानं भारताच्या भूमीत मुसंडी मारण्याची शक्यता आहे. ही शक्यता नाकारता येत नाही की, मुंबई ही युद्धक्षेत्र बनू शकेल. अशावेळी तुम्ही मुंबईत असलेलं बरं.''
या धक्कातंत्रानं साहेब आपला विचार बदलतील आणि संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी न स्वीकारता मुंबईला परत जातील अशी समजूत पटनाईक यांनी करून घेतली असावी. पटनाईकांच्या मनात आपल्याविषयी आस्था निर्माण व्हावी म्हणून त्यांच्या म्हणण्याला साहेबांनी पुस्ती दिली.
साहेब म्हणाले, ''नेहरूजी आणि देशाच्या प्रेमाखातर मी या संकटाला सामोरे जाण्याचा निर्धार केलेला आहे. देशाच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जात असताना, घाला घालणार्या शत्रूचा नायनाट करण्याचा विडा मी उचललेला आहे. महाराष्ट्राचा जन्मच केवळ देशाच्या रक्षणाकरिता घालेला आहे. महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे.''