साहेब सत्काराला उत्तर देण्यासाठी उभे राहिले. सभागृहभर एक नजर फिरविली. सभागृह डोळ्यात साठवून घेतलं. क्षणभर कंठ दाटून आला.
दाटलेल्या कंठानेच बोलताना म्हणाले, ''कराडसारख्या ग्रामीण भागातील स्वातंत्र्यसैनिक म्हणून १९४६ मध्ये मी या सभागृहात प्रवेश केला. माझ्यात आत्मविश्वास ठासून भरलेला होता तरीपण लाजरीबुजरी वृत्ती माझ्यात होती. त्या लाजर्याबुजर्या वृत्तीला या सभागृहानं घालविलं. आत्मविश्वास आणि निधडेपणाची वृत्ती सोबत घेऊन मी हे सभागृह सोडत आहे. संकटकाळावर मात करण्याकरिता मला हा आत्मविश्वास आणि निधडेपणाची वृत्ती कामास येईल. मी ज्या सामर्थ्याच्या जोरावर जात आहे ते सामर्थ्य मला या मातीतून मिळालेले आहे. या मातीत मी लहानचा मोठा झालो. या मातीनं माझ्यात जी रग निर्माण केलेली आहे ती रग समोरच्या शत्रूला पळताभुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. या आत्मविश्वासाने मी आपला निरोप घेत आहे.''
मुंबईच्या जनतेनं आजच्या दिवशीच चौपाटीवर साहेबांचा भव्य असा निरोप समारंभ घडवून आणला.
मुंबईच्या जनतेचा निरोप घेताना साहेब म्हणाले, ''मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी मी जे वचन दिलेलं आहे त्याची पूर्तता करण्याचा माझा प्रयत्न राहील. मी तुम्हाला वार्यावर सोडणार नाही. भारत संकटात सापडला आहे. त्याने महाराष्ट्राला संरक्षणाकरिता हाक दिलेली आहे. देशाचं संरक्षण करणं महाराष्ट्राचं कर्तव्य आहे. ती महाराष्ट्राची परंपरा आहे. हिमालयाच्या संरक्षणाकरिता सह्याद्री एक वेळ आपले प्राण अर्पण करील; पण मागे हटणार नाही. महाराष्ट्राचा इतिहास आपणास हे शिकवितो.''
मुंबई सोडण्यापूर्वी आकाशवाणीवर भाषण करताना साहेब म्हणाले,
''या मातीतच मी प्रथम रांगलो आणि रंगलो पुढे
हीच, गड्यांनो, माती माझ्या रक्तात चढे....''
''स्वातंत्र्य धोक्यात सापडलेलं असताना कुणीही महाराष्ट्रीयन आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आपल्या प्राणाचे बलिदान करण्यास मागेपुढे पाहणार नाही. इतिहास याला साक्षी आहे. महाराष्ट्राची ही वृत्ती आहे. कर्तव्यपालन करीत असताना माझ्यासोबत सह्याद्रीचा बेडरपणा, कृष्णा-कोयनेचा संथपणा, गोदावरी-नर्मदेची नितळता, वैनगंगेची भव्यता, कोकणाचा करारीपणा आणि पैठणची भाविकता राहणार आहे.''
राजेरजवाड्यांना हेवा वाटावा असा निरोप लोकशाहीमध्ये मुंबईकरांनी साहेबांना दिला. सह्याद्री बंगल्यापासून थेट विमानतळापर्यंत दुतर्फा रस्त्यावर मुंबई जनता मानवी साखळी करून चौकाचौकात साहेबांच्या जयजयकाराच्या घोषणा देत आहे. मुंबईतील पोलिसांना जनतेला आवर घालता घालता नाकीनऊ येऊ लागले. बळवंतरावांचा हा कृषिपुत्र भारतमातेच्या संरक्षणाकरिता, आपल्या मातेच्या आशीर्वादाच्या शिदोरीवर शत्रूशी दोन हात करण्याकरिता दिल्लीला निघाला. भारताच्या क्षितिजावरील एक उगवता सूर्य व देशाच्या भावी पिढीचा नेता म्हणून देशानं साहेबांची दखल घेतली.