१९ नोव्हेंबर देशाच्या राजकारणाचा धामधुमीचा दिवस. महाराष्ट्रात साहेब १९४६ पासून ज्या सभागृहाचे सभासद झाले त्या सभागृहाचा निरोप आज घेणार आहेत तर दिल्लीमध्ये संरक्षण खात्यामध्ये खळबळजनक घटना घडत आहेत. साहेबांनी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी साहेबांचे वारस म्हणून मारोतराव कन्नमवार यांची निवड झाली. दिल्लीत याच तारखेला सरसेनापती थापर तेजपूरहून राजधानीत पोहोचले. त्यांनी आपला राजीनामा नेहरूजींना सादर केला. नेहरूजींनी राष्ट्रपती राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांच्या सल्ल्याने सरसेनापतीपदी जनरल चौधरी यांची नेमणूक केली. प्रकृतीच्या कारणास्तव थापर यांना दीर्घ रजेवर पाठविलं. ले. ज. कौल राजीनामा देऊन मोकळे झाले. विधिमंडळाच्या सभागृहात साहेब सभागृहातील सदस्यांचा निरोप स्वीकारीत आहेत. विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळप यांनी साहेबांच्या अभिनंदनाचा ठराव मांडताना आपले विचार व्यक्त केले.
म्हणाले, 'यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कार्यकुशलतेनं या सभागृहाला उच्चतम पातळीवर नेऊन पोहोचविलं त्याबद्दल त्यांचे हे सभागृह अभिनंदन करीत आहे. या सभागृहाचे कर्णधार आणि राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी वंचितासाठी आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षाकरिता जी धोरणं राबविली त्याची दखल इतिहास तर घेईलच; पण हे सभागृह त्यांचे चिरकाल ॠणी राहील. राज्याचे हित सांभाळताना या सभागृहात त्यांना बुद्धीची जी कसरत करावी लागली, कामकाज करताना बौद्धिक चातुर्य वापरून एक आदर्श लोकशाहीचा पायंडा या सभागृहात निर्माण केला त्यामुळे त्यांना या सभागृहाचं व जनतेचं प्रेम मिळालं व ते आदरास पात्र ठरले आहेत.''
एकामागून एक वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. साहेब हे एका पक्षाचे नेते म्हणून दिल्लीस जात आहेत असे नाही. तमाम मराठी माणसांचे व महाराष्ट्राच्या शूरत्वाचे प्रतिनिधी म्हणून दिल्लीत जात आहेत. मराठी जनता मन, तन, धन आणि जात, भेद, पंथ विसरून एकसंध होऊन एकदिलाने साहेबांच्या पाठीशी उभी आहे. सभागृहाचे वातावरण मंत्रमुग्ध झालेलं. साहेबांप्रती भारावलेलं. अशा वातावरणात आचार्य अत्रे बोलावयास उभे राहिले. साहेबांप्रती आपल्या भावना व्यक्त करताना अत्रे साहेबांना 'माझे प्रिय मित्र' म्हणताच सभागृहात हशा पिकला.
अत्रे पुढे म्हणाले, ''मी यशवंतरावांना परमप्रिय मित्र म्हणणार त्या वेळी सभागृहातील प्रत्येक सदस्य खळखळून हसणार याची मला कल्पना होती. १९४६ साली त्यांची माझी मैत्री झाली. मध्यंतरीच्या काळात म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीकरिता आम्ही वैचारिक लढाई लढलो. मी ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो तो समाज कावेबाज समाज म्हणून ओळखला जातो तर यशवंतराव ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्या समाजाची दंडेलशाही समाज म्हणून ओळख आहे. पण मी यशवंतरावांना विरोध करताना कधी कावेबाजपणा केला नाही आणि त्यांनीही कधी दंडेलशाही केली नाही. आम्ही दोघेही बुद्धीच्या पातळीवर लढलो. बुद्धीच्या पातळीवर बुद्धीच्या डावपेचानं या माणसानं आम्हाला लोळवलं. समाजजीवनात मनुष्य कामचा कन्सिस्टंट राहू शकत नाही व राजकारणात तर शक्यच नाही. ज्याला हृदय आहे तो नेहमी बदलत राहील. दगडच काय तो जसाच्या तसा राहू शकेल.''
साहेबांच्या कर्तृत्वाविषयी बोलताना अत्रे म्हणाले, ''देशावरील संकटाचं शिवधनुष्य यशवंतरावांनी पेललं आहे. मराठी जनता आपल्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत साथ देण्यास मागे हटणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मी त्यांना शब्द देत आहे.''