त्यासंबंधी खूप तपशीलाने बोललो. आमच्या विदेशनीतीच्या रचनेत 'बाय-लॅटरलियन ऍण्ड सेल्फ रिलायन्ट नॅशनॅलिझम' यांचे किती महत्त्वाचे स्थान आहे ही तत्त्वसूत्री स्पष्ट केली. एशियन देशांनी म्हणून नव्हे, तर यातील प्रत्येक देशाने आशियातील या समाजवादी देशांशी मैत्रीचे-विश्वासाचे बंध निर्माण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे असे प्रतिपादिले.
अंतर्गत परिस्थिति-पाकिस्तान-बांगलादेश, यू. एस्. ए., यू. एस्. एस्. आर. हे सर्व ओघाने आलेच. Emphasized the common task of working out a frame work of economic and technical co-operation. दीड तासांपेक्षा जास्त बोललो.
डॉ. मलिक यांनी या सूत्रबध्द परंतु सर्वस्पर्शी मांडणीबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचे निवेदन केले. विशेषत: अमेरिका, पाकिस्तान व काबूल येथील भेटीच्या तपशीलाच्या संदर्भात त्यांनी विषय मांडला.
मी त्यांना विचारले होते की, श्री. भूत्तोचे चीनबाबत काय निदान आहे. मलिकांच्या मते चायनाबाबत भूत्तोची 'असेसमेंट' काहीशी बदलली आहे. अंतर्गत वादामुळे चीनची प्रगति काहीशी मंदावली आहे. त्यामुळे ते आक्रमक राजकीय पवित्रे टाकणार नाहीत आणि साऊथ-ईस्ट एशियनने चीनची भीति धरू नये.
अशी काहीशी चीनची वकिली केली परंतु माओनंतर आर्मी आणि पक्ष यांचे मिश्र सामुदायिक नेतृत्व चीनमध्ये येईल व ते रशियाशी जुळते घेण्याचा प्रयत्न करील अशी भूत्तोची 'असेसमेंट' आहे.
डॉ. मलिकच्या मते या 'असेसमेंट' च्या संदर्भात आशियामध्ये संपूर्ण चीनवर आधारलेली, भूत्तोचे धोरणाला, तो आता नवे 'ऑप्शन्स' शोधण्याच्या मार्गात असला पाहिजे. या सूत्राला धरूनच, अफगाणिस्तानशी संबंध सुधारण्याच्या धोरणाला अधिक अर्थ प्राप्त होतो असेही ते म्हणाले.
चीनशी आपले संबंध सुधारण्याची आपणाला घाई नाही असे ते वारंवार बजावून सांगत होते.
अमेरिकन फोर्सेस्ची साऊथ आशिया आणि हिंदी महासागरातील हजेरी राष्ट्रीय हिताला विरोधी आहे अशी आपली भूमिका त्यांनी मांडली.
चीन-अमेरिका एकमत असेल, पण ते स्वत:चे हितसंबंध लक्षात घेऊन विचार करतात म्हणून हे एकमत आहे असे आपण डॉ. किसिंजरला सांगितल्याचे ते बोलले. अर्थात् याची अंमलबजावणी करताना यू. एस्. ए. शी. 'कॅन्फ्रॉन्ट्रेशन' करावयाचे नाही. पण आपली विचारदृष्टि या बाबतीत स्वच्छ आहे असे ते आग्रहपूर्वक सांगत होते.
या चर्चेनंतर 'फॉर्मल' चर्चा बंद केल्या व पुढील दोन-तीन दिवस आम्ही एकत्रच प्रवास करणार आहोत, तेव्हा बाकीचे विषय वा राहिलेला तपशील 'इन्फॉर्मली' या प्रवासात बोलू असे ठरले.
मोठा हुषार माणूस आहे. बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. वागणूक फार मैत्रीची व अगत्याची होती. दुपारी त्यांचेकडे जेवण झाले. त्यानंतर आम्ही डेलिगेशनमध्ये तपशील बोललो. थोडी विश्रांति मिळाली.
उद्या सकाळी हिंदी समाजाचे कर्ते लोक व शाळा यांना भेट द्यावयाची आहे. नंतर दुपारी बालीस प्रयाण, पुढचे बालीमधून लिहीन.