प्रे. सुकार्नोंना तू ओळखतेस. मुंबईस आपले ते पाहुणे होते. सह्याद्रीवरचा खाना कदाचित् तुला आठवत असेल. विलक्षण कर्तृत्वाचा पण काहीसा कारस्थानी आणि अहंकारी गृहस्थ होता. स्वभाव पाऱ्याशी स्पर्धा करेल असा चंचल होता. त्यांच्या खाजगी जीवनासंबंधी आपणास काही कर्तव्य नाही; पण मी हे सर्व राजकीय नेता म्हणून तो कसा होता या संदर्भात लिहीत आहे.
नवीन राष्ट्र म्हणून इंडोनेशियाला घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पण पुढे अहंकारामुळे त्या राष्ट्राच्या जीवनात अनेक संकटे त्यांनी निर्माण केली.
कम्युनिस्ट (चायनीज फॅक्शन) पक्षाचे महत्त्व वाढवून ठेवले.
सैन्याच्या सर्व शाखांत हे लोक सर्व थरांत घुसले होते. चायनाच्या मैत्रीला अवास्तव महत्त्व देऊन यू. एन्. सभासदत्वावर बहिष्कार टाकला.
१९६२ ते ६५ अखेर आमचे संबंध फारच दुरावले होते. १९६५ च्या संघर्षामध्ये पाकिस्तानला मदतीसाठी नेव्ही पाठविण्यापर्यंत मजल गेली होती.
आंतरराष्ट्रीय संबंधातल्या चुकीच्या निर्णयाची किंमत द्यावीच लागते. ६५ मध्ये अंतर्गत क्रांति झाली. कम्युनिस्टांशी हातमिळवणी केलेल्या अधिकाऱ्यांनी अवेळी उठाव केला आणि तो फसला. सुकार्नोंचा डाव हुकला आणि ते थोर राजकीय जीवन करुणास्पद झाले. संपले.
तेव्हा आजचे प्रेसिडेंट सुहार्तो यांनी बाजी मारली. हे नेतृत्व अधिकारावर आले. लक्षावधी कम्युनिस्ट अनुयायांची कत्तल झाली. देश दुसऱ्या टोकाला गेला. तेव्हापासून कठोर साम्यवाद, चीनविरोध हे परराष्ट्र-धोरणाचे सूत्र बनले. ते आजतागायत आहे.
स्वाभाविकच घडयाळाचा लंबक दुसऱ्या टोकाला गेला. कम्युनिझमविरोधी तत्त्वज्ञान व यू. एस्. ए. आदि पश्चिमी राष्ट्रांची मांडलिकी (?) स्वरूपाची मैत्री या दिशेने वारे वाहत आहे.
१९६६ पासून सावकाशपणे आणि सावधानतेने आपल्या राष्ट्राशी त्यांचे संबंध सुधारू लागले. आज ते बऱ्या अवस्थेत आहेत. त्यांच्या आमच्यामध्ये संघर्षाचे प्रश्न नाहीत. कॉन्टिनेंटल सेल आणि सागरांतर्गत सीमांचा प्रश्नही तडजोडीने सुटल्यामुळे एक प्रकारचे मैत्रीचे व मोकळेपणाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इस्लामचे महत्त्व जास्त असले तरी तो कडवा नाही. बाली सारख्या एका बेटावर २० लाखांपेक्षा जास्त हिंदू आहेत. त्यांच्या संस्कृतीशी शासनाची सहानुभूती आहे. हे नवे संबंध अधिक मजबूत व अर्थपूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत राहणे ही आमच्या विदेशनीतीची दृष्टी राहील.
आग्नेय आशियामध्ये इंडोनेशियाचे प्रमुख स्थान आहे. पॅसिफिकमधून हिंदीसागरामध्ये येण्याच्या मार्गावरील प्रवेशद्वार असल्यासारखे ते वसले आहे. अशा राष्ट्राशी दृढ मैत्रीचे व सहकाराचे संबंध असणे आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.