विदेश दर्शन - १६०

माझ्या भेटीमागे ही लांबवरची नजर आहे. हे सर्व काही एकाएकी घडणार नाही. जगातील अजब गुंतागुंतीची सावटे इथेही कधी कधी पडतात आणि संशयाची भुते या सावटात दिसू लागतात. म्हणून सावधानतेने, संयमाने, जपून पण प्रयत्नपूर्वक जाणिवेने हे संबंध वाढवावयाचे आहेत. भेटीची व चर्चेची ही पार्श्वभूमी आहे.

ता. २२ ला सकाळी प्रे. सुहार्तोंना भेटलो. 'ऑफिशियल प्लेस' हे अशा भेटीगाठी व सरकारी कामकाजासाठी वापरले जाते. ते राहतात दुसरीकडे कुठेतरी. विदेशमंत्र्यांच्या बाबतीतही तसेच आहे.

या भेटीच्या वेळी डॉ. मलिक हजर होते. प्रेसिडेंटची प्रकृति उत्तम दिसली. वागण्यात मोकळेपणा व स्नेह होता. इंदिराजींच्या प्रकृतीची चौकशी प्रथम क्षणीच त्यांनी करून जिव्हाळा दाखविला.

मी तीन मुद्दे स्पष्ट केले. १) अंतर्गत परिस्थिति, २) Nuances of our foreign policy as reflected in our initiatives regarding Pakistan and China. याच वेळी बांगलादेश-तपशील-विशेषत: फराक्काबद्दल. ३) Non-alligned summit कोलंबो येथे भरणारे - त्यातील प्रश्न - ऐक्याची गरज - मूलभूत तत्त्वांना चिकटून राहण्याची व परस्पर सहकार्याची आवश्यकता.

या संदार्भात इंडोनिशियाशी आर्थिक, तांत्रिक (टेक्निकल) क्षेत्रांतील सहकार्य कसे वाढेल याबाबत. याशिवाय एशियन व इंडोचायना यांचाही चर्चेत उल्लेख आला.

प्रेसिडेंटशी मी जवळ-जवळ २५ मिनिटे बोललो. त्यानंतर २०-२२ मिनिटे प्रसिडेंट बोलले.

निर्गुट परिषदेच्या सभासदत्वाच्या तत्त्वाबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी, मतभेद वाढतील अशा प्रश्नांची चर्चा टाळावी असे आपले मत व्यक्त करून आमच्याशी एकमत दाखविले. (परंतु त्यांच्या मनात Timor ची चर्चा टाळावी असे असावे). फिलिपाइन्स, थायलंडसारखे देश आपल्या धोरणात बदल करू इच्छितात. त्यांनी तसे बदलावे असे आपण प्रयत्न करीत आहोत असेही ते म्हणाले. तेव्हा अशा देशांना निदान आब्झर्वर म्हणून येऊ देणे इष्ट आहे. त्यात Non-alligned चा फायदा आहे. एशियन भाई भाई ही भावना या विचाराच्या मागे दिसली.

त्यानंतर खरी तपशीलवार चर्चा १० ते १ डॉ. मलिक यांचेशी केली.

I projected our foreign policy in it's broader perspective.
 
त्यांच्या मनात नाही म्हटले तरी खालील तीन गोष्टींच्या शंका स्पर्श करून जात असतील.

१) सोव्हिएट मैत्री, २) व्हिएटनाम वगैरे इंडो-चायनीज सोशॅलिस्ट स्टेटशी आमचे असलेले संबंध, ३) चीनशी संबंध सुधारण्यासाठी सुरू झालेल्या नव्या प्रयत्नांचा अर्थ व संदर्भ.