तीन आधारस्तंभ : लोकशाही, नियोजन व समाजवाद
यशवंतरावांनी 'राष्ट्रीय प्रगतीचे तीन आधारस्तंभ' या विषयावर १५ ऑगस्ट १९६१ रोजी भाषण केले होते. लोकशाही, नियोजन व समाजवाद हे आपल्या राष्ट्रीय प्रगतीचे आधारस्तंभ असल्याचे ते सांगतात. आपल्या राष्ट्रीय प्रगतीची भव्य इमारत आपणास या तीन स्तंभावर उभी करावयाची आहे. आपण स्वातंत्र्य मिळविले आहे. मिळवण्यापेक्षा ते टिकवून ठेवणे अवघड असते. केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून उपयोग नाही तर सर्वच पातळ्यांवर स्वातंत्र्य मिळवले पाहिजे. आजच्या स्वातंत्र्यदिनी भारताच्या प्रगतीची आपण शपथ घेतली पाहिजे. या देशातील थोर नेत्यांनी राजकारणाला नवे मूल्य प्राप्त करून दिले. राजकारण म्हणजे समाजपरिवर्तनाचे साधन आहे, असा सिद्धांत ते मांडतात. सामाजिक सुधारणा आमच्या राजकीय परंपरेचा अविभाज्य भाग बनल्या पाहिजेत. राजकारण हेच समाजकारण व्हावे अशी अपेक्षा ते करतात. देशातील आर्थिक व सामाजिक परिस्थितीत जी आव्हाने निर्माण होतात त्यांचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य राजकीय पक्षात निर्माण झाले पाहिजे.
"स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताची मूलभूत अशी जर कोणती गरज असेल तर ती राष्ट्रीय एकात्मतेची होय. पण त्याबरोबरच देशात लोकशाही राज्यकारभार प्रस्थापित करून देशाच्या आर्थिक जीवनात बदल घडवून आणणे आणि ज्यायोगे प्रत्येक नागरिकास विकासाची समानसंधी लाभेल आणि समानतेची, अनुभवाची, सहजीवनाची, सहानुभवाची भावना त्याच्या मनात निर्माण होऊन ती रूजू लागेल, वाढीस लागेल अशा प्रकारची समाजरचना घडवून आणणे याही स्वातंत्र्योत्तर काळातील आपल्या प्रमुख व निकडीच्या गरजा आहेत." असा विचार अहमदाबाद येथे ज्युनिअर चेंबर ऑफ कॉमर्स येथे आयोजिक परिसंवादात मांडला. या परिसंवादात त्यांनी काँग्रेसची ऐतिहासिक भूमिका मांडली. सत्तेवर आलेल्या पक्षावर न्यायसंस्थेची किंवा इतर कायद्याची बंधने घालून ती सत्ता अधिक लोकाभिमुख बनली पाहिजे. सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी असावी, तशी असली पाहिजे. "लोकशाहीमध्ये आज्ञा नाही. लोकशाहीमध्ये डायलॉग आहे. संभाषण आहे. विचारांची आणि मतांची देवाणघेवाण आहे. हे आपण विसरता कामा नये... 'देशामध्ये असलेली लोकशाही या देशाला एक मोठा नेता होता म्हणूनच आहे. यावर माझा पूर्वीही विश्वास नव्हता आणि आजही नाही. नेहरूनंतरही आम्ही या देशात लोकशाही टिकवली. नेहरूंनंतर आलेल्या कर्तृत्ववान पुढा-यांच्या मृत्यूनंतरही आम्ही या देशात लोकशाही टिकवू शकलो. असा या देशाला पुन्हा एकदा अनुभव आला आणि बाहेरच्या देशालाही आला. हिंदुस्थानचा हा एक मोठा विजय आहे असे आम्ही मानले पाहिजे.... 'घेतलेली निर्णय बदलू नयेत असे कोणी सांगितले? शेवटी निर्णय जे घ्यावयाचे असतात ते लोकांच्या हिताकरिता, लोकांच्या इच्छेला मान देऊन घ्यावयाचे असतात. निर्णय महत्त्वाचे ही लोक महत्त्वाचे असा प्रश्न निर्माण झाला, तर लोक महत्त्वाचे असेच मी म्हणेन. जेव्हा लोक आणि निर्णय यांच्यात संघर्ष निर्माण होतो तेव्हा लोक विजयी होतात असा इतिहास आहे.
म्हणून राज्य चालविण्यासाठी राज्यशक्तीच्या बाहेर जी माणसे असतात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा व पुण्याईचा फार उपयोग होत असतो. कारण ही माणसे ज्या परंपरा व शक्ती निर्माण करतात त्याचा उपयोग चालविण्यासाठी होत असतो." अस ते कार्यकर्त्यांना सांगतात. यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात अतिशय जबाबदारीचे काम केले. महाराष्ट्रात काय किंवा हिंदुस्थानच्या राजकारणात त्यांनी सहका-यांना विश्वासात घेऊनच पक्षातील उणिवांची चर्चा केली. राजकारणाकडे ते व्यापक दृष्टिकोनातून पाहतात. ते म्हणतात, "हे तख्त कोणा एका व्यक्तीचे नाही. कोणा एका धर्माचे नाही. कोणा एका वर्गाचे नाही. ते या देशातल्या चाळीस पंचेचाळीस कोठी लोकांचे तख्त आहे आणि त्याचे रक्षण हे तुमचे आमचे कर्तव्य आहे. तुमचे आमचे हे तख्त जोपर्यंत चंद्र सूर्य उगवत राहतील तोपर्यंत कायम राहिले पाहिजे. कारण ते आमच्या स्वातंत्र्याचे व लोकशाहीचे प्रतीक आहे. अशा त-हेची देशभक्तीची भावना आपल्या मनात फुलली पाहिजे, पेटली पाहिजे."