यशंवतरावांनी राष्ट्रीय एकतेस अतिशय महत्त्व दिले. ही एकती टिकविण्यासाठी राष्ट्रीय एकतेस बाधा येईल अशी कोणतीही गोष्ट बोलण्यातून व कृतीतून आढळल्यास ती विष म्हणून बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशाच्या एकतेची भावना टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्याचा आणि एकतेचा विचार त्यांनी अनेक वेळा मांडला ते म्हणतात, "या राज्यावर एक जबरदस्त हल्ला करून त्याचे स्वातंत्र्य, त्याची मूल्ये धोक्यात आणण्याचा शत्रूकडून जो प्रयत्न चालला आहे त्याचा निकराने प्रतिकार करण्यासाठी आपले जवान मृत्यूला सामोरे जात आहेत... सगळे लोक मरण्यासाठी तयार होतील या भावनेने ते आज येथे लढत आहेत." यशंवतराव संरक्षणमंत्री असताना त्यांनी या विषयांवर विचार मांडले. हुशार, बुद्धिमान माणसे आघाडीवर लढत आहेत अशावेळी आपण मुर्दाड होऊन चालणार नाही. स्वातंत्र्याचे आणि देशाचे प्रेम तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे. लढाईसाठी ज्यावेळी देश तयारी करतो त्यावेळी मनगट लोखंडासारखेच बळकट करावे लागते. त्याचप्रमाणे मनही लोखंडासारखेच बळकट करावे लागते. असा आत्मविश्वास लोकांच्यात निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात.
ऐक्याची शक्तिशाली सुंदरता
देशाची हाक आली म्हणून यशवंतराव संरक्षणपद स्वीकारल्याचे सांगतात. केवळ मोठे पद मिळते म्हणून मी जात नाही. जाताना १९ नोव्हेंबर १९६२ रोजी महाराष्ट्राचा निरोप घेताना ते म्हणाले, " मी देशाच्या सेवेसाठी जात असताना माझ्याबरोबर सह्याद्रीचा निधडेपणा, कृष्णानर्मदेची सखोलता, वैनगंगेची विशालता,कोकणचा कष्टाळूपणा आणि पैठणची भाविकता घेऊन जात आहे... 'या मातीतच मी प्रथम रांगलो आणि रंगलो, पुढ हीच गड्यांनो माती माझ्या रक्तामध्ये चढे'.... तसेच भारत परचक्र परतवून लावल्याशिवाय मी राहणार नाही. ह्या कामी सह्याद्री आपल्या छातीचा कोट करील." प्रसंग पडला तर जान देण्याच्या भावनेने यशवंतरावांनी ही जबाबदारी स्वीकारल्याचे ते सांगतात. भारतावरील कोणत्याही आक्रमणाची त्यांना भीती नाही. त्यांना भीती वाटते ती, "तुमचे आमचे मन दुबळे बनले की काय? तुमचे आमचे मन दुफळीने फुटून जाईल की काय? ते होता कामा नये. एवढी शक्ती जर आपण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये निर्माण करू शकलो तर दुनियेतल्या लोकांची, विमानांची किंवा अॅटमबाँबची शक्तीच काय पण इतर कोणतीही शक्ती हिंदुस्थानचा पराभव करू शकणार नाही." असा विश्वास ते व्यक्त करतात. देशातल्या प्रत्येक माणसाच्या मनात आपल्या देशाच्या स्वातंत्र्याबद्दल जाज्वल्य प्रेम, जाज्वल्य भक्ती आहे. कितीही संकटे आली, कितीही आपत्ती आल्या, कितीही बिकट प्रश्न निर्माण झाले तरीही या जाज्वल्य देशप्रेमातून निर्माण झालेली आपली राष्ट्रीय एकता आपण टिकविली पाहिजे. अखंडित अबाधित राखली पाहिजे. असा विचार त्यांनी औरंगाबादच्या जाहीर सभेत मांडला.
प्रत्येक मानवाच्या मनात एकजिनसीपणा निर्माण होऊन सद्भावना निर्माण होणे महत्त्वाचे असते. सर्वांचे मनगट एका सामर्थ्याने बांधले गेले पाहिजे. "समाजाच्या जीवनात मैत्री आणि शांतता टिकवायची असेल तर त्यासाठी मनगटात शक्ती असली पाहिजे. केवळ प्रेमाची भाषा बोलून किंवा शांततेची घोषणा करून समाजात मैत्री आणि शांतता निर्माण होणे अवघड आहे. त्यासाठी चांगल्या मूल्यांची शक्ती आणि सत्प्रवृत्तींची जोपासना करावी लागेल. देशातल्या मानवजातीच्या रक्षणाकरिता शांतता निर्माण करावी लागेल. ज्यामुळे अपमान होईल, अभिमान नाहीसा होईल, दुस-याच्या दडपणाखाली वागावे लागेल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य हिंदुस्थानातील व्यक्तीला करता येणार नाही. हिंदुस्थानात ज्या ज्या वेळी संकटे निर्माण होतील तेव्हा त्या संकटांना तोंड देणारे सुपुत्र भारतात निर्माण झाले पाहिजेत. जीवनामध्ये जे उत्कृष्ट आपल्याजवळ आहे ते आपण देशासाठी व समाजासाठी दिले पाहिजे. दान द्यावयाचे असेल तर उत्कृष्ट गोष्टींचे दान देणे, याला दान म्हणत नाहीत. यशवंतरावांच्या मनात देशभक्तीची भावना किती तीव्र होती हे त्यांच्या अशा काही वक्तव्यांवरून सहज स्पष्ट होते. त्यांचे मन मोकळे होते. जे वाटले तेच बोलत. एखाद्या कामाची सुरुवात ही शंका-कुशंकांनी करू नये असे त्यांना वाटत होते. ते गृहमंत्री व संरक्षणमंत्री असताना प्रत्येक निर्णयात त्यांनी कणखरपणा दाखविला. अनेक प्रश्नांची उकल करून घेण्यासाठी आवश्यक असणारा समजतदारपणाही त्यांनी दाखवला. एखाद्या प्रश्नाच्याबाबत कधीही मनाचा हेकटपणा दाखवला नाही. सदैव देशाच्या विशालतेचा व प्रगत स्वप्नांचा त्यांनी ध्यास घेतला होता.