त्याचप्रमाणे हा अवघड प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा हे विष कोणीतरी महादेवाने घेतले पाहिजे व ते पचविले पाहिजे." यशवंतराव महाराष्ट्र व मराठी माणसे यांच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहिले. त्यांची प्रगती, मराठमोठी भाषा, आणि महाराष्ट्रीयन संस्कृती जपण्याचे काम, संवर्धन करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. या संदर्भात जे म्हणतात, "मराठी भाषेचे राज्य यशस्वी करण्यासाठी, मराठी माणसांच्या मनात जो ज्ञानेश्वर आहे, जो रामदास आहे, जो तुकाराम आहे आणि त्यांच्या मनात जी मराठी माऊली आहे. त्या सर्वांना जागे करण्याचा, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी प्रयत्न करीन." यशवतरावांनी स्वत:च्या जीवननिष्ठेबाबतची आपली भूमिकाच येथे मांडली आहे. मानवता हीच त्यांच्या जीवनाची निष्ठा असल्याचे ते सांगतात. यशवंतरावांच्या मनात मराठी भाषा आणि महाराष्ट्र यांच्याबद्दल असलेली आस्था ठिकठिकाणी झालेल्या भाषणलेखनातून पाहावयास मिळते. मराठवाड्याबाबतची आपुलकीची भावना व जिव्हाळाही त्याच स्वरुपाचा आहे ते म्हणतात, "ह्या विभागांशी मराठी बोलणा-यांचे नाते अत्यंत जवळचे आहे. आमच्या एका मराठी कवीने या संबंधीची आमची भावना फार सुंदर रीतीने व्यक्त केली आहे. तो म्हणतो, मराठी बोलणारा माणूस जेव्हा मराठवाड्याकडे जायला निघतो तेव्हा माहेरला जायला निघालो आहे असे त्याला वाटते. मराठीतले उत्कृष्ट काव्य मराठवाड्यातल्या पैठणला लिहिले गेले आहे. एकनाथ, ज्ञानेश्वर ह्यांसारखे महाराष्ट्राचे मोठे संत त्या ठिकाणी होऊन गेलेले असल्यामुळे मराठवाड्याबद्दल महाराष्ट्रीयांना आपुलकी वाटते. थोडक्यात सांगावयाचे तर महाराष्ट्राचे अंत:करण ह्या भागाशी एकजीव झालेले आहे. अशी ह्या मराठवाड्याबद्दल भावना आहे." यशवंतरावांच्या ज्वलंत आणि अनुभवी विचारांचे वाहन असलेली मराठी भाषा व मराठवाडा यांचा अतूट संबंध या त्यांच्या विचारांतून स्पष्ट होतो.
महाराष्ट्राची विविधता व एकता
मुंबई आकाशवाणीच्या भाषणातून त्यांनी महाराष्ट्राच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर भागातील विविधतेतील एकतेची कल्पना दिली आहे. कविवर्य मुकुंदराज, ज्ञानेश्वर, नामदव, चक्रधर आदी संतांनी महाराष्ट्राच्या एकतेसंबंधी प्रयत्न केल्याची जाणीव ते करून देतात. महाराष्ट्राच्या विविधतेत समृद्धतेने कशी भर घातली आहे हे सांगताना ते म्हणतात, "उत्तरेस सातपुडा आणि पश्चिमेस सह्याद्री यांची उत्तुंग शिखरे व यांच्या उतरणीवरील घनदाट जंगले यांनी या भागास भव्योदात्त सौंदर्य प्राप्त झाले आहे. तर वर्धआ वैनगंगेच्या खो-यात जागोजाग असलेली जलाशये व पळसाच्या लाल फुलांनी डवरलेली राने मनाला प्रसन्नता आणतात. कोकणचा किनारा अथांग पश्चिम सागराचे दर्शन घडवितो, तर गोदेच्या पाण्याने पुनीत व समृद्ध झालेली मराठवाड्याची भूमी महाराष्ट्राच्या तेजस्वी भूतकाळाची व संस्कृतीची आठवण करून देते. नागपूरच्या परिसरात भारतातच केवळ नव्हे तर आशियात उत्तम म्हणून नावाजलेली संत्री पिकतात, तर रत्नागिरीकडे भारतात ज्याच्या तोडीचा दुसरा आंबा नाही तो हापूस आंबा अमाप पिकतो. विदर्भ मराठवाड्याच्या काळ्याभोर जमिनीत कापूस भरघोस फुलतो, तर नगर-सोलापूर कोल्हापूर भागात पिकणारा रसदार ऊस सर्वांचे तोंड गोड करतो. निरनिराळ्या भागांतील लोकांच्या बाबतीतही विविधता आहे. कोकणपट्टीतील माणसाचे अनुनासिक उच्चार ऐकून देशावरच्या माणसाला मौज वाटते तर खानदेश व-हाडचा माणूस एक विशिष्ट हेल काढून बोलू लागला की सांगली कोल्हापूरकडील माणसांच्या चेह-यावर स्मिताची रेषा न झळकली तरच आश्चर्य. पण या विविधतेतच महाराष्ट्रातील जीवनाचे सौंदर्य साठलेले आहे. अशी विविधता नसेल तर जीवन नीरस व रंगहीन होईल." या विविधतेने महाराष्ट्राच्या जीवनाला सौंदर्य प्राप्त होऊन एकत्रित जीवनाचे सामर्थ्य प्रतीत होते असे ते सांगतात. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी केलेल्या आपल्या या भाषणात महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एकजिनसीपणा, भाषिक ऐक्य, भौगोलिक एकात्मता व माणसामाणसांच्या मनाचा सांधा जोडण्यावर अधिक भर दिला आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याचे जे वर्णन केले आहे ते त्या त्या परिसरातील माणसांच्या वैशिष्टयांसह केले आहे. तसेच मराठी माणसांच्या चालीरीती, परंपरा, भाषेची उच्चारप्रक्रिया, भाषिक एकता इत्यादीची महाराष्ट्रातील एकता आपण अधिक मजबूत केली पाहिजे. सामाजिक व आर्थिक विकास करताना मतभेद निर्माण न होता ऐक्यास तडा जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विरोध विधायक असावा. तो आंधळा किंवा विरोधासाठी विरोध नसावा. वादामधून तत्त्वबोध व्हावा. अन्यथा त्या वादाला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून ममत्वाच्या भावनेने हे अंतर कमी करता येईल व महाराष्ट्राच्या ऐक्याला तडा जाणार नाही, म्हणून ते मतभेदातून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतात.