यशवंतरावांनी नाट्यवाङ्मयाचा आस्वाद विविध प्रकारे घेतला संहितेपासून ते रंगमंचावरील प्रत्यक्ष प्रयोगापर्यंत नाटकाचा त्यांनी एक रसिक या नात्याने आस्वाद घेतला. नाटक रंगमंचावर डोळ्यांसमोर पात्र-प्रसंगाच्या साहाय्याने साकारते. मनोमंचावर वा रंगमंचावर त्याचे एक दृक श्राव्य स्वरुप उलगडले जाते. 'नाटक' या वाङ्मयप्रकाराचे हे स्वरुप व त्याची वैशिष्टये, त्यातील विविध घटक, नाटकाचा इतिहास परंपरा यांचा यशवंतरावांनी अखिल भारतीय ४३ व्या मराठी नाट्य संमेलन ( २५ मार्च १९६१) मध्ये व मराठी रंगभूमीची अखंड परंपरा ( मराठी नाट्यपरिषद ४७ वे अधिवेशन, नांदेड, दि. ३१.१.६५) या दोन लेखांमध्ये विस्ताराने चर्चा केली आहे. नाट्यवाङ्मयाच्या इतिहासात महत्वाचे टप्पे आहेत व त्यात बरीच स्थित्यंतरेही होत गेली आहेत याचाही उल्लेख त्यांनी आवर्जून केला आहे. नाटक ही जशी एक कला आहे तसा तो एक वाङ्मयप्रकार आहे. या दृष्टीनेही यशवंतरावांनी नाटकाच्या स्वरुपाचा विचार केला आहे. यशवंतरावांचे हे विचार नाट्यशास्त्रकार भरतमुनी यांच्या विचारांशी जुळणारे आहेत. भरतमुनींनी 'क्षमार्तानां, शोकार्तानां, दु:खार्तानां, तपस्वितानां विश्रामजननं लोक नाट्यमे तन्मयाकृतम्' असे म्हणून 'लोकविश्राम' म्हणजेच जनरंजन हे नाट्याचे प्रयोजन मानले आहे. आजही यशवंतराव प्रबोधनाची भूमिका मांडतात. 'नाट्य' ही कला अधिकाधिक समाजजीवनाशी संवादी असते. "लोकरंजन आणि लोकाराधन या नाट्याचे स्थान फार महत्वाचे आहे." असा नाट्यवाङ्मयाचा उल्लेख ते करतात.
यशवंतरावांनी नाट्यवाङ्मयविषयक चिंतनात जीवनमूल्यांना महत्वाचे स्थान दिले आहे. नाट्यवाङ्मयासारख्या साहित्यकलेतून चिरंतन जीवनमूल्यांची जोपासना केली पाहिजे. मानवी जीवनात जी शाश्वत सत्ये असतात त्याची जाणीव नाटकाच्या कथानकातून व्हावी अशीही त्यांची अपेक्षा होती. आदर्श मूल्यांची जपणूक झाली पाहिजे. त्यासाठी रंगभूमी अधिकाधिक लोकभिमुख झाली पाहिजे असा त्यांचा अट्टाहास होता. ते म्हणतात. "नाटक जीवनाचा जितका खोल वेध घेईल. तुम्हा आम्हाला त्रस्त करणा-या प्रश्नांना जितक्या यशस्वीपणे हात घालील तितके ते तुम्हा आम्हाला जवळचे वाटणार आहे." मराठी नाटकातून सामाजिक प्रश्नांची मांडणी व्हावी हा त्यांचा दृष्टिकोन होता. यशवंतरावांनी नाटक आणि समाजजीवन यांचे संबंध सूक्ष्मपणे शोधले आहेत. नाटकातील विषय समाजाच्या तत्कालीन जीवनाला स्पर्श करणारे असावेत. सामाजिक प्रश्नांचा ऊहापोह करण्याची रीत नाटककारांनी स्वीकारावी असा नाटककारांबद्दल त्यांचा विचार होता. त्या त्या काळात जी श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली त्यामध्ये तत्कालीन सामाजिक समस्यांचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य, बालविवाह, पुर्नविवाह, दुराचार यासारखे असंख्य प्रश्न नाटकाचे विषय झाले. सामाजिक जीवनाच्या व्यथा वेदनेला स्पर्श करण्याचे सामर्थ्य नाट्यवाङ्मयात निर्माण व्हावे. तसेच जीवनविषयक चिंतनाला चालना देण्याचे सामर्थ्य नाट्यकलाकृतीत असणे गरजेचे आहे म्हणून काळाबरोबर उत्पन्न होणारे नवे नवे प्रश्न नाट्यरुपाने मराठी वाङ्मयात मांडले गेले आहेत व येथून पुढेही मांडावेत. आपले जीवन, आपला समाज जसजसा बदलत जाईल त्याप्रमाणे रंगभूमीही बदलत जाणे अपरिहार्य आहे, असे यशवंतरावांना वाटते.
२५ मार्च १९६१ मध्ये दिल्ली येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय ४३ व्या मराठी नाट्य संमेलनामध्ये स्वागताध्यक्ष म्हणून यशवंतराव चव्हाण होते. या संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी केले. अध्यक्षा सप्रसिद्ध अभिनेत्री दुर्गाबाई खोटे या होत्या. या संमेलनामध्ये यशवंतरावांनी मराठी नाट्यवाङ्मयाचा ऐतिहासिक परामर्श घेतला. शिवाय नव्या नाटकाविषयी बोलताना त्यांनी मराठी रंगभूमीवरील नव्या बदलाचे स्वागत केले आहे. नाट्य रचनेचे नवे तंत्र, नव्या विचारांचा दर्शनासाठी नव्या नाटककारांची मराठी रंगभूमीला असणारी आवश्यकता यशवंतरावांनी वेळोवेळी प्रतिपादन केली आहे. पौराणिक संगीत नाटकाचा इतिहास सांगताना ते लिहितात, "तंजावरास भोसले राजांनी मराठी नाटके लिहिली आणि करविली. १८४३ साली विष्णू अमृत भावे यांनी सांगलीकरांच्या प्रेरणेने पौराणिक नाटकांचा नवीनच प्रयोग करून दाखविला. यानंतर अनेक पौराणिक नाटक कंपन्या जन्माला आल्या. " त्यापूर्वीही नाटक रंगभूमीचे काही प्रयत्न झाले पण ते ललित तमाशा गोंधळ कळसूत्री बाहुल्या, कीर्तने, भारूडे अशा लोकरंगभूमीच्या प्रकारातून व्यक्त झाले. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, यांच्या वाङ्मयातून त्यांचे उल्लेख आहेत. पेशव्यांच्या काळात होनाजी बाळा, राम जोशी, अनंत फंदी, सगनभाऊ, प्रभाकर, परशुराम यांच्यासारख्या शाहिरांनी लोकनाट्याच्या द्वारा समाजाचे रंजन केले. लोकरंगभूमीची अशा प्रकारे लोकशाहिरांकडून जोपासना होत असतानाच मराठी नाट्यक्षेत्रामध्ये पौराणिक, भाषांतरित, रुपांतरित नाटके निर्माण झाली. संस्कृत व इंग्रजी वाङ्मयाच्या अध्ययनाने मराठी नाट्यास स्फूर्ती व प्रोत्साहन मिळाले असले तरी त्याला आज जे बाळसेदार स्वरुप प्राप्त झालेले दिसते ते मराठी वळण लागल्यानंतरचे आहे. संख्येच्या दृष्टीने मराठी नाटके विपुल नसली तरी त्यात वैचित्र्य, विविधता आणि नाट्यगुण भरपूर प्रमाणात आहेत. मराठी नाट्यसृष्टीत मानवी मनाच्या सूक्ष्म भावभावनांचे आणि मानवी जीवनातील विविध घटनाप्रसंगाचे रम्य चित्रण पाहावयास मिळते. काही काळ मराठी नाटकांची दृष्टी देवदानवांच्या अतिमानुष व अमानुष लीला पाहण्यातच दंग झाली होती हे खरे. तथापि केवळ शंभर सव्वाशे वर्षांच्या अवधीत मराठी नाटकांचे स्वरुप इतके पालटले आहे की भविष्यकाळात सामाजिक जीवनातील समस्या सोडविण्याला आणि मानवी मनातील गुंतागुंतीचे सूक्ष्म धागे उकलण्यात आज मराठी नाटककार गुंतलेले दिसतात. बाह्यसौंदर्यापेक्षा मानवी मनात दडलेली सौंदर्यस्थळे हुडकण्याची मराठी नाटककारांची आजची धडपड जितकी कौतुकास्पद आहे तितकी मराठी नाट्यसृष्टीच्या प्रगतीच्या दृष्टीने ती अत्यंत समाधानाची आहे, असे मत यशंतराव व्यक्त करतात.