यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-१९

काव्यविषयक विचार


जीवनक्षेत्रातील कोणत्याही नवप्रवृत्तींचा ताण जो प्रथमत: जाणवतो तो कवितेसारख्या लेखनप्रकारातूनच. या प्रकारामध्ये जुन्या अभंगओवीपासून नव्या मुक्तछंदांपर्यंत अनेक कवींनी काव्ये लिहिली. या काव्यविश्वातील अनेक कवींच्या कविता यशवंतरावांनी वाचल्या. काही कवींचा त्यांच्यावर प्रभाव पडला. विशेषत: रविकिरण मंडळातील अनेक कवींचे ते चाहते बनले. यामध्ये कवी यशवंत, य.दि. पेंढारकर, माधव ज्युलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन ) कवी गिरीश, घाटे, रानडे, सौ. रानडे, यांच्या कवितांनी त्यांना वेड लावले होते. या मंडळाच्या अगोदरच्या अनेक कवींच्याही कविता त्यांनी वाचल्या. तरीही यशवंतरावांनी आपल्या लेखनाच्या उमेदवारीच्या काळात अगदी अल्पसे काव्यलेखन केल्याचा उल्लेख क्वचितच सापडतो. यशवंतराव स्वत: कवी जरी नसले तरी काव्याचे रसिक, मर्मज्ञ, आस्वादक आहेत. त्यामुळे त्यांचे कवितेबद्दलचे विचारही त्यांच्या रसिकत्वाचे दर्शन घडविणारे आहेत.


यशवंतरावांनी काव्यप्रांतामध्ये आपली प्रतिभा लेखनाद्वारे फारशी दाखवली नाही. पण गणेश उत्सवाच्या वेळी येणा-या मेळाव्याच्या वेळी त्यांनी काही पदे, कविता लिहिल्याचा उल्लेख सापडतो. पण स्वतंत्रपणे काव्यवाङ्मय प्रकार म्हणून चर्चा केली नसली तरी चांगली कविता कशी असावी या विषयीचे विचार त्यांनी वेळोवेळी व्यक्त केले आहेत. त्यातून 'काव्य' या वाङ्मयाबद्दलची त्यांची मते लक्षात येतात. "केशवसुतांच्या काळात बांधीलकी असावी की नाही असा काही वाद नव्हता. पण उत्स्फूर्त बांधीलकी असलेला मराठीतील तो पहिला आधुनिक कवी म्हणायला हवा. त्यांच्या कित्येक कवितांचे संदर्भ हे आजही नवे वाटतात. भावी काळातही वाटत राहतील." केशवसुतांच्या काव्याविषयी आपले मत नोंदवून केशवसुतांच्या कविता का महत्वाच्या वाटतात याचा ते उल्लेख करतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच सामाजिक विचारांच्या बैठकीचे स्थान आहे. त्यांच्या अशा नवनिर्मितीमुळे मानवी जीवनाचा कायापालट होऊ शकतो. मानवी जीवन नवीन सुंदर रुप धारण करू शकते. सा-या जगाला नवीन व सुंदर रुप देणे हे प्रतिभेचे कार्य आहे ही व्यापक जाणीव केशवसुतांच्या कवितेतून व्यक्त झाली. म्हणून यशवंतरावांना केशवसुतांच्या कवितेविषयी विलक्षण प्रेम वाटू लागले आणि केशवसुतांच्या कवितेत ते अधिक रमलेले दिसतात.


यशवंतरावांना कवी व कवितेबद्दल मोठा आदर वाटत असे. नवोदित कवींच्या बाबतही त्यांना अपार कुतूहल असायचे. त्यांच्या काव्यवाचनाच्या मैफलीत ते रसिकतेने समरस होत. प्रसंगी आपली चिंतनगर्भ मते नेमकेपणाने मांडून उपस्थितांना चकित करत. "मनामध्ये कविता यावयाची पण पुष्कळदा ती कागदावर उतरत नसे. पण ज्यांच्या मनामध्ये कविता डोकावून जात असे, असे पुष्कळ विद्यार्थी त्यावेळी असायचे. ज्या तरुणांच्या मनामध्ये काव्य येत नसेल तो तरुण, तरुण नसला पाहिजे असे म्हटले तरी चालेल." या त्यांच्यावरील विवेचनावरुन त्यांची काव्यविषयीची अभिरुची लक्षात येते.