साहित्य लेखनामागील प्रेरणा व दिशा
यशवंतराव चव्हाण हे प्रतिभावंत साहित्यिक, प्रथितयश ललित लेखक, पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे राजकीय नेते, प्रभावशाली वक्ते अशा विविध गुणांनी सुपरिचित होते. त्यांना वाङ्मयीन संस्काराची प्रतिभेची देणगी मिळाली व त्यांची साहित्यिक जडणघडण झाली ती त्यांच्या आईमुळेच. बालपणी आईच्या मांडीवर झोपून त्यांनी अनेक ओव्या ऐकल्या. तसेच महाभारताचे कथासार आईने आपल्या ओव्यांतून त्यांना ऐकवले. तर गावात होणारे भजन, कीर्तन, प्रवचने, पौराणिक आख्याने यातून यशवंतरावांची भाषेविषयीची जाण सतत जागृत राहिली. पुढे ती गणपती उत्सवातून कविता, मेळ्याची पदे लिहिण्यापासून ते इतर लेख, बातम्या, कविता यांच्यातून प्रकट झाली. हा त्यांचा जणू छंदच बनला. "साहित्याकडे त्यांनी केवळ विरंगुळा म्हणून पाहिले नाही तर त्या साहित्यातून जीवनाचा आणि अवतीभोवतीचा अर्थ ते शोधत राहिले." साहित्य लेखन-वाचनातून ते राष्ट्र कार्याची ऊर्मी शोधत असत. भाषेवर ते मनापासून प्रेम करत. साहित्यविषयी चोखंदळ जाण बाळगत, शालेय जीवनापासून त्यांना साहित्य जीवनाचा छंद लागला. पुढे ते राजकारणात सहभागी झाले. अनेक राजकीय पदे सांभाळत असताना त्यांचा सर्व थरांतील लोकांशी संपर्क आला. त्यांच्याकडे असणा-या कर्तव्यदक्षता व कार्यतत्परता या गुणांमुळे त्यांचा राजकीय लौकिक देशात, परदेशात वाढत गेला. परिणामत: त्यांना अनेक समारंभात, संमेलनात, मेळाव्यात निमंत्रित केले जाऊ लागले. त्या त्या प्रसंगी यशवंतरावांनी जी भाषणे केली, ज्या चर्चेत सहभागी झाले ती भाषणे समयोचित तर होतीच त्याचबरोबर रोचक होती. अभ्यासपूर्ण होती. साहित्यविषयक केलेल्या भाषणातून त्याची प्रचिती येते त्याबरोबर त्यांची साहित्यविषयक आवड दिसून येते.
'वाचक' ही आपली साहित्यक्षेत्रातील प्राथमिक भूमिका तर यशवंतरावांनी अत्यंत निष्ठेने व चोखपणे अगदी बालपणापासून पार पाडलेली दिसते. कृष्णा-कोयना, सोनहिरा हा परिसर तसा निसर्गत: निसर्ग सौंदर्याचे वरदान ठरलेला. या रम्य परिसरात बालपणी त्यांनी घेतलेला साहित्य आस्वाद म्हणजे अक्षय आनंदाचा प्रवाहच होय. अशा कितीतरी आठवणी यशवंतरावांच्या संग्रही आहेत. त्यांच्या बालपणातील वाचनाचा हा स्वच्छंदी दिनक्रम त्यांच्या निर्व्याज साहित्यिक संस्कारास कारणीभूत ठरला. पुढे "राजकारणातील रूक्षपणा घालविण्यासाठी सतत वाचन करून नवीन ज्ञान आत्मसात करण्यावर त्यांचा भर होता. साहित्यावर त्यांचे खूप प्रेम होते. 'साहित्यप्रेमी यशवंतराव' हा यशवंतरावांच्या व्यकितमत्त्वाचा एक महत्त्वाचा आणि आकर्षक पैलूच समजला जातो. परंतु राजकीय कार्यक्षेत्रात सक्रिय प्रवेश केल्यानंतर त्यांना अनेक छंदांना मुकावे लागले. राजकारणात ह्यात घालवली तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व कधीच एकांगी बनले नव्हते. किंवा राजकारण हे आपले संपूर्ण जीवन आहे असे त्यांनी मानले नव्हते. कला, साहित्य, संगीत, खेळ, नाटय या सर्व क्षेत्रांची त्यांना आवड होती. परंतु त्यांच्या आवडीच्या एखाद्या छंदास जीवनाच्या धावपळीमध्ये मुकवे जरी लागले तरी त्यांना त्याची फारशी खंत वाटली नाही. लहानपणी त्यांनी रविकिरण मंडळातील कवीने प्रामुख्याने य. दि. पेंढारकर, गिरीश यांच्या काव्याने लळा लावला. त्या वयामध्ये त्यांच्यावर काव्याचे संस्कार झाले. या संदर्भात ते लिहितात, "कवी बनण्याचा छंद जसा मनाला लागला, तसा कथा-कादंबरी लिहिण्याचाही छंद लागला. काही कथा मी लिहिल्या आणि त्यावेळी 'लोकक्रांती'त एक दोन प्रसिद्धही झाल्या. एक कादंबरीही मनामध्ये योजिली. पण छंदाचा सांधा बदलून गाडी दुस-या मार्गावरून धावू लागली. तेव्हा ती कादंबरी कुठेतरी मागल्या स्टेशनवरच राहिली असावी." याचा अर्थ यशवंतरावांची गाडी साहित्याच्या रुळावरून राजकीय कार्याच्या रुळावर सांधा बदलून आली. याचा आपणास एवढाच अर्थ घेता येईल की वेळेअभावी कथा, कादंबरी, काव्य, नाटक या वाङ्मय प्रकारात त्यांनी फारशी साहित्य निर्मिती केली नाही, पण हा वाङ्मय प्रांत त्यांनी वर्ज्य मानला नाही. रसिक वाचक म्हणून कितीतरी कलाकृतींना त्यांनी आपला अभिप्राय चोखंदळपणे कळवला आहे. काही कथा, कादंबरी, नाटक, कविता इ. सारख्या वाङ्मयीन कलाकृतींना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत. पण त्या काळाचा महिमा लक्षात घेता मराठीतील साहित्य अभिरूची स्वप्नरंजनात गुंग होती. फडक्यांच्या प्रेमकथांबरोबरच खांडेकरांचा जीवनवाद रसिकांना स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारा होता. माडखोलकर आणि इतर असंख्य लेखक असले लेखन करत होतेच. यशवंतरावांच्या साहित्यिक प्रकृतीला ही भूमिका पटणारी नव्हती. दुस-या बाजूला मार्क्सवादी विचारांचा प्रभाव अनेक कवींच्या कवितेवर व लेखनावर दिसतो. कुसुमाग्रज, मुक्तिबोध, करंदीकर, नारायण सूर्वे, लालजी पेंडसे, काणेकर, अनिल यांसारख्या लेखकांनी कवींनी, मार्क्सवादी विचारांच्या अनुषंगाने जीवनाची एक नवी मांडणी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्वातंत्र्याची चळवळ चालूच होती. कष्टक-यांचे प्रश्न होते. शोषितांच्या व्यथा होत्या. या संबंधाच्या अनुरोधानेच जीवनातल्या सर्व प्रश्नांकडे यशवंतरावांसारखा ललित लेखक पाहात होता. ग्रामीणांच्या शोषणाचा मूलगामी विचार करणा-या विचारवंतांच्या परंपरेमध्ये यशवंतरावांचे नाव घ्यावे लागेल. त्यामुळे साहिजकच त्यांचे लेखन कथा, कादंबरी, काव्य, नाटक यासारख्या वाङ्मयप्रकारांमध्ये कमी आहे किंवा या वाङ्मयात ते फारसे भरीव कामगिरी करू शकले नाहीत. परंतु त्यामुळे त्यांना या वाड्मयप्रकारात लेखनापेक्षा वाचनावर अधिक भर द्यावा लागला.
यशवंरावांची साहित्य विचाराबाबतची भूमिका पाहताना असे आढळते की ते त्या वाङ्मयप्रकाराच्या आणि त्या त्या साहित्यकृतींच्या अंगभूत सौंदर्याचा विचार महत्त्वाचा मानतात. कविता हा साहित्याचा आत्मनिष्ठ प्रकार असून 'नवनिर्मिती' असल्याने तिच्या सौंदर्याला आणि बंदिस्तपणाला यशवंतराव महत्त्व देताना दिसतात. जीवनातल्या अनंत वेदनांना शब्दरूप देणा-या आणि अनेकांच्या भावनांना शब्दरूप देऊन आनंद निर्मिती करणा-या या काव्यप्रकाराबद्दल स्वत:ची भूमिका ते नम्रपणे व्यक्त करतात. याचबरोबर कवींच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाचाही विचार मांडतात.