विरंगुळा - ५०

अमृतसर
१० फेब्रुवारी १९५५

''येथे येऊन पुरे दोन दिवस होऊन गेले. लिहायचे राहून गेले होते. मुंबईपासूनचा प्रवास सुखकर झाला. सोबत वसंतराव (दादा) आणि बॅ. जी. डी. पाटील होते. मामासाहेब देवगिरीकर आमच्या डब्यातच होते. त्यामुळे चर्चा, गप्पा आणि पत्त्यांचे खेळ यामध्ये वेळ केव्हा गेला समजले नाही.

ता. ८ ला (फेब्रुवारी) दुपारी अध्यक्ष श्री. ढेबर यांना भेटून राजीनाम्याबाबत दीड तासाच्यावर चर्चा केली. आमची भूमिका समजावून सांगण्याची पराकाष्ठा केली. मंत्रीपदे सोडून आम्ही काँग्रेसची व देशाची अधिक सेवा करू शकतो असेही सांगितले. परंतु फारसा उपयोग झाला नाही. त्यांनी वर्किंग कमिटीचा दृष्टिकोन मांडला. या प्रश्नाच्या पाठीमागे असणाऱ्या पं. नेहरूंच्या भावना सांगितल्या आणि काँग्रेसचा आदेश मानण्याखेरीज दुसरा मार्ग नाही असे सुचविले. मी त्यांना, मला लिहा असे सुचविले आहे. पाहूया काय करतात ते. मुंबई बाबतही आम्ही खूप बोललो. ते माझे समाधान करू शकले नाहीत.

ए. आय. सी. सी. ची बैठक कालपासून सुरू झाली आहे. राज्य पुनर्रचनेच्या प्रश्नामुळे वातावरणांत अधिक गंभीरता भासली. महाराष्ट्रातील परिस्थितीमुळे आणि मुंबईतील दंगलीमुळे कडक टीका करणारे लोक येथे अधिक भेटतात. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न सुलभतेने सुटण्याची शक्यता कमी असे हे वातावरण पाहिले म्हणजे दु:खाने कबूल करावे लागते. आमच्या प्रांतासंबंधीचे हे गैरसमज सर्व देशात फार खोलवर गेलेत. ते दूर करण्याचे प्रयत्न फार महत्त्वाचे व अगत्याचे आहेत.

दुपारी चहाच्या वेळी पंडितजींना भेटलो. दहा-पंधरा मिनिटे मुद्दाम बाजूला माझ्याशी अगत्यपूर्वक बोलले. माझ्या राजीनाम्यामुळे त्यांचा गैरसमज झालेला नाही असे दिसले. ते ''तुमची मनस्थिती आणि अडचण समजू शकतो'' असे म्हणाले. पण मुंबईच्या प्रश्नामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने अतिशय दु:खी दिसले. आम्ही मुंबई शहर राज्य का नाकारले हे त्यांच्या बुद्धीला अजूनही पटत नाही, असेही ते म्हणाले. वादग्रस्त प्रश्न शांततेच्या वातावरणांत थोड्या सावकाशीने सोडवावे लागतील आणि या पद्धतीने मुंबईचाही प्रश्न सुटेल असे ते म्हणाले. मुंबई महाराष्ट्रांत जाऊ नये अशी माझी भावना नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व बोलण्यावरून वर्ष दोन वर्षाच्या काळात योग्य संधी आणि वातावरण पाहून ते मुंबईचा निर्णय महाराष्ट्रास अनुकूल असा देतील असा विश्वास मला वाटू लागला आहे. द्विभाषिक राज्ये व्हावीत ही त्यांची प्रामाणिक भावना आहे. परंतु महाराष्ट्र व गुजराथ आजच्या परिस्थितीत एकत्र आणण्याचा प्रयत्न अवघड असेही त्यांना वाटते.

मी त्यांना सर्व पुढारी आणि पक्ष वगळून डायरेक्टली महाराष्ट्रीय जनतेला आवाहन करायची विनंती केली तेव्हा ते गहिवरून म्हणाले, ''हां जरूर मी तसे करीन. दंगे गुंड करतात. सर्व जनतेला कोण दोष देईल? महाराष्ट्रीय जनता शूर आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे.''