१० मे १९५३
संध्याकाळी उंब्रज येथे भूदान दौऱ्यावर आलेल्या श्री. शंकरराव देव यांना भेटलो. त्यांनी सातारचा अनुभव सांगितला. त्या अनुभवाचे 'आय ओपनर' असे त्यांनी वर्णन केले. मी त्यांना या कामातील अडचणी सांगितल्या. काँग्रेसला समाजक्रांतीचे माध्यम बनवावयाचे असेल तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक जीवनांत त्याचे काही प्रतिबिंब दिसले पाहिजे. काँग्रेस कार्यकर्ते, कार्यकर्ते म्हणून वैयक्तिक जीवनांत वैयक्तिक रीत्या भूदानासाठी काय करतात याच्यावर या चळवळीचे या जिल्ह्यातील यश अवलंबून आहे. माझ्या अनुभवाने असा माझा विचार त्यांना सांगितला. मी व्यक्तीश: काय करावे असे मला वाटते तेही मी त्यांना सांगितले. त्यांचा सल्ला घेतला.
नंतर वहागावजवळ श्री. शंकरराव देव यांचे स्वागत केले. श्री. पांडुआबाच्या विहिरीजवळील झाडांच्या राईत या मित्रांची न्याहारी झाली. वातावरण मोठे प्रसन्न वाटले.
तेथून श्री. देव यांच्याबरोबर कराडपर्यंतचा प्रवास पायाने केला. वाटेत श्री. देवांचे बरोबर बऱ्याच दिवसांनी अनेक गोष्टींवर दिलखुलास चर्चा केली. देशातील आणि प्रांतातील परिस्थिती, संयुक्त महाराष्ट्र हे विषय प्रामुख्याने चर्चिले.
संध्याकाळी श्री. माने वाडीकरांचे घरी पुष्कळ उद्बोधक खाजगी चर्चा झाली. संध्याकाळच्या सभेत मी अक्षरश: भूमीहीन असलेमुळे संपत्तीदान करावयाचे ठरविले असून एक षष्ठांश उत्पन्नाचा हिस्सा देईन असे जाहीर केले. एकंदर ४२ एकर जमीन या सभेत मिळाली.
श्री. शंकररावजींना गावाच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यास गेलो. सुमारे अर्धा तास पुन्हा चर्चा झाली. मंत्रिमंडळ बनविताना झालेल्या घटनांचा अप्रत्यक्ष उल्लेख झाला. माझ्या आणि श्री. भाऊसाहेब हिरे यांच्या संबंधाचाही प्रश्न निघाला होता. ता. २३, २४, २५ च्या पुण्याच्या बैठकीत चर्चा करू असे म्हणून हा प्रश्न तेथेच सोडून दिला.
यशवंतरावांच्या चरित्र लेखनाच्या संदर्भात दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी रात्री गप्पागोष्टी होत असताना द्विभाषिकाचे मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे आल्याचा विषय सुरू असताना 'श्री. हिरे-चव्हाण' असा जो तिढा निर्माण झाला होता त्याबाबतचा तपशील त्यांनी ऐकवावा असा मी दोन-तीन वेळा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी ''हा एक सविस्तर बोलण्याचा विषय आहे. मीच केव्हातरी सविस्तर लिहीन म्हणतो'' असे सांगून या विषयाच्या खोलात शिरण्यापासून यशवंतराव अलिप्त राहिले. मी त्यांना खोलात ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक दिवस म्हणाले, ''झालं गेलं विसरून जावं. राजकारणात काही प्रसंग उद्भवतात. पण मतभेद उगाळीत बसण्यात अर्थ नसतो. मतभेद व्यक्त करावा पण तो तेवढ्यापुरता. महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील जाणत्यांनी हे पथ्य पाळलं तर तो एक आदर्श ठरेल. महाराष्ट्र आणखी मोठा होईल.''
यशवंतरावांनी १९४६ ते १९६२ या कालखंडाचं लेखन करून 'सागरतळी' हा दुसरा खंड पूर्ण केला असता तर या कालखंडातील, मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याच्या वेळची एक प्रमुख घटना म्हणून कदाचित या घटनेसंबंधीचा तपशील त्यांनी सावधानतेनं लिहिला असता. ओझरता का होईना या विषयाला स्पर्श झाला असता. पण ते घडायचं नव्हतं!