विरंगुळा - ४६

११ मे १९५३

रात्री श्री. दादासाहेब जगताप यांच्याकडे जेवणास गेलो. तेथे श्री. बाळासाहेब उंडाळकर फार दिवसांनी भेटले. ''तुमचा सर्व मोठेपणा तुमच्या आईच्या सद्गुणामुळे व पुण्याईमुळे आहे. असे मी शेकडो लोकांना सांगतोय ते तुम्हीही कबूल केले पाहिजे'' असे ते मला म्हणाले. हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. आईचे माझ्यावर किती उपकार आहेत.

सकाळी कराडहून निघून दोनच्या सुमारास मुंबईस पोहोचलो. बाबासाहेब बरोबर आहे. श्री. निंबाळकरांना बाबासाहेबांच्या प्लॅनसंबंधी बोललो. ता. १९ रोजी निश्चित करण्याचे त्यांनी कबूल केले आहे. याच विषयासंबंधी श्री. बाबूराव गोखले यांच्याशी चर्चा केली. निर्णय ता. २० ला घेऊ असे ठरले.
------------------------------------------------------------

सिकंदराबाद
१४-०१-१९५३

दुपारी पाच वाजता सिकंदराबादला पोचलो. बेगमपेठ स्टेशनवर उतरून परस्पर येथे आलो. हैद्राबादमधील हे ठिकाण हैद्राबाद शहरापासून तीन-चार मैलांवर आहे. जसे मुंबईत खार, अंधेरी वगैरे तसे हे हैद्राबादचे उपनगर आहे. येथील यजमान (होस्ट) हे एक मारवाडी व्यापारी आहेत. ते आम्ही कोणीतरी नबाब आहोत अशा थाटामाटात आमची व्यवस्था करीत आहेत. या वातावरणाने मी मात्र गुदमरून गेल्यासारखा होतो. बरोबरची मंडळी खूष आहेत.

संध्याकाळी आंघोळी करून शहरात चक्कर टाकून आलो. रात्रीच्या वेळी सर्वच शहरे सारखी दिसतात. त्या ठिकाणची वैशिष्ट्ये दाखविणारी स्थळे सोडली तर मोठ्या शहराचा तोंडवळा निदान रात्रीच्या वेळी तर एकसारखा दिसतो. चार कमानी आणि चार मिनार ही मात्र हैद्राबाद शहरातील मध्य वस्तीतील इस्लामी संस्कृतीची वैशिष्ट्यपूर्ण प्रतिके पाहिली म्हणजे वाटते की आपण एका इतिहास प्रसिद्ध, पूर्वी न पहिलेल्या शहरात आहोत.

रात्री ९ वाजता जेवण्यासाठी परत आलो. जेवणाला जाण्यापूर्वी तिळगूळ मिळाला. आज प्रवासाच्या सर्व धांदलीत संक्रांत असल्याची आठवणच आली नाही. मात्र कोण जाणे या १९५३च्या संक्रांतीला मला एकदम १९४३च्या संक्रांतीची आठवण झाली. बरोबर दहा वर्षांपूर्वी या संक्रांतीच्या संध्याकाळी ६च्या सुमारास मी बबनराव गोसावीच्या घरी गेलो होतो. त्याच्या घरी त्याच्या बायकोने संक्रांतीचा हळदी-कुंकवाचा समारंभ धामधुमीने साजरा केला होता. ते सर्व पाहिले आणि अनपेक्षितपणे त्यांच्याइथे बसल्या बसल्या मी आसवं ढाळू लागलो. मी असे का करतो ते त्यांना समजेना पण माझ्या मनाला यातना होत होत्या की लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला पत्नी कराड जेलच्या अंधाऱ्या कोठडीत कुठतरी बसली असेल? माझे दु:ख कुणाला समजू शकले नाही. मी त्यांची कशीतरी समजूत घातली. आज तो सर्व प्रसंग डोळ्यापुढे येऊन गेला खरे! निदान दहा वर्षांनी आज संक्रांत कितीतरी निराळ्या परिस्थितीत आणि आनंदाने पत्नीने साजरी केली असेल. आजचा तिचा सर्व दिवस मोठ्या गडबडीत गेला असेल असे मी मानतो.
------------------------------------------------------------