देशांत निर्माण होणा-या निरनिराळ्या फुटीर प्रवृत्तींना आपण आपल्या तात्विक भूमिकेवरुन विरोध केला पाहिजे व या प्रसंगीं धैर्यानं, प्रसंगीं निश्चयानं व आत्मविश्वासानं पुढे पाऊल टाकलं पाहिजे. कोणत्याहि कारणानं आपण काँग्रेसला व आपल्या सरकारला कमजोर होण्यास प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष मदत करूं, तर आपण आपलं स्वातंत्र्य धोक्यांत आणूं. म्हणून जातीयतेचं उच्चाटन करण्याकरिता, आर्थिक समता स्थापन करण्याकरिता व उत्पादन वाढवण्याकरिता काँग्रेस संघटना मजबूत केली पाहिजे, सरकारच्यामागे जनशक्ति उभी केली पाहिजे. महाराष्ट्रांत बुद्धिभेद करण्याचे जे निरनिराळे प्रयत्न चालू आहेत त्यांपासून जनतेनं सावध राहिलं पाहिजे. कारण हे प्रयत्न देशाचा घात केल्याशिवाय रहाणार नाहींत.
महाराष्ट्रांत कुणी अराजक माजवण्याचा, बेशिस्त वर्तन करण्याचा, जातिभेद अगर वर्णद्वेष फुलवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला उघडपणानं विरोध करण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्रांतील कुठल्याहि पक्षोपपक्षांशीं द्वेष-बुद्धीनं अगर वैरभावानं वागण्याचा काँग्रेसचा केव्हाहि हेतु नव्हता व नाही. काँग्रेसशीं निष्ठावंत राहून काँग्रेसच्या शिस्तीप्रमाणे काँग्रेस-जनांनी वागावं असं आमचं आवाहन आहे. काँगेसबद्दल ते अनुदारपणा, अप्रीति निर्माण करतील अगर बाहेरून किंवा आंतून काँग्रेस – संघटना दुर्बल करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या प्रयत्नांना विरोध करणं हें हिंदी स्वातंत्र्याच्या दृष्टीनं आमचं कर्तव्य होईल.”
तांबे-भवनांतील ही सभा त्या काळांत चांगलीच गाजली. या पत्रकावर ज्यांच्या सह्या होत्या ते सारे महाराष्ट्रांतील वजनदार काँग्रेस-कार्यकर्ते होते. ही सभा आणि पत्रक पाहून केशवराव जेधे बरेच रागावले. शेतकरी-कामकरी पक्षाशीं त्यांची आंतून जवळीक झालेली होतीच; पुढे तर त्यांनी प्रांतिकच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि शेतकरी-कामकरी पक्षांत उघडपणें ते दाखल झाले. काँग्रेस-संघटनेच्या प्रमुख प्रवाहापासून फुटून बाहेर निघण्यास यसवंतरावांनी भाऊसाहेब राऊत यांच्या निवासस्थानीं झालेल्या बैठकींत एकाकी विरोध केला होताच; या बैठकीनं त्यांनी आपल्या विचाराच्या साथीदारांची एक भक्कम फळी महाराष्ट्रांत काँग्रेस अंतर्गत उभी केली आणि पुढच्या काळात शेतकरी-कामकरी पक्षाबरोंबर जाहीरपणानं सामना दिला, काँग्रेस-संघटनेविषयीचं इमान त्यांच्या ठिकाणीं कसं उत्कटतेनं वसत होतं याचा पडताळा त्या काळांत या निमित्तानं येऊन गेला.
त्या काळांत महाराष्ट्रांत काँग्रेस तरली ती यशवंतरावांच्या विधायक विचारामुळेच तरली हा इतिहास आहे. मोरे यांच्या आवाहनाप्रमाणे, यच्चयावत् बहुजन-समाजानं काँग्रेसशीं काडीमोड घेतली असती, तर कुणी सांगावं, कदाचित् महाराष्ट्राच्या समाजमनांतून तेव्हाच काँग्रेस उखडली गेली असती ! ग्रामीण भागांतल्या, बहुजन-समाजांतल्या सुशिक्षितांना ती किमया करून दाखवतां येणं शक्यहि होतं; पण काँग्रेसच्या, देशाच्या भल्यासाठी असं कांही घडूं नये असाय संकेत असावा. नव्या पक्षांत सामील होऊन या पक्षाचा प्रमुख बनण्याची संधि यशवंतावांच्या राजकीय आयुष्यांत नियतीनं हिसकावून घेतली ती त्यामुळेच! यशवंतराव यांच्या मूलगामी विचार कसा वास्तव होता, हें पुढच्या काळांत म्हणजे १९६० मध्ये, शेतकरी-कामकरी पक्षांतले बहुसंख्य कार्यकर्तें जेव्हा चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भराभर काँग्रेसमध्ये दाखल झाले त्या वेळीं सिद्ध झालं.
यशवंतरावांना वगळून १९४९ च्या दरम्यान महाराष्ट्रांत शेतकरी-कामकरी पक्षाची स्थापना म्हणजे येथील काँग्रेस-पक्षाला आव्हान ठरलं. बहुजन-समाजांतले मुरब्बी नेते बाजूला गेले. मोरे-जेधे आदींनी रागावून काँग्रेसचा त्याग केला. महाराष्ट्रा-काँग्रेसचे नेते शंकरराव देव हे त्या वेळीं दिल्लींत घटना-समितीच्या कामांत मग्न होते. दुसरे नेते काकासाहेब गाडगीळ हे केंद्रीय मंत्री या नात्यानं दिल्लींतच होते. दत्ता देशमुख, मोरे, जेधे, तुळशीदास जाधव, र. के. खाडिलकर हे सारे एक झाले आणि या सर्वांनी काँग्रेसला आव्हान दिलं. मोरारजीभाई आणि दत्ता देशमुख यांच्यामध्ये पुढे कांही चर्चा झाल्या, परंतु मोरारजीभाई यांनी दत्ता देशमुख यांना साथ दिली नाही. उलट त्यांना दुखवलं. त्यामुळे रागावून ते कम्युनिस्ट पक्षांत दाखल झाले. नाना पाटीलहि त्यांनाच येऊन मिळाले. अशी सर्वत्र फाटाफूट निर्माण झाली.