यशवंतरावांच्या राजकीय जीवनांत काँग्रेसपासून अलग होण्याचाहा तिसरा प्रसंग निर्माण झाला होता. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापनेच्या वेळीं तत्व मान्य पण कामाची त-हा अमान्य, असं घडलं. पुढे राँयवादी गटांत असतांनाहि राँय यांचे विचार मान्य, पण काँग्रेसमधून बाजूला होऊन दुसरा पक्ष स्थापन करण्याचा त्यांचा हेतु अमान्य, असा निर्णय त्यांना करावा लागला आणि शेतकरी कामकरी पक्ष म्हणून वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या वेळींहि वैचारिक व्दंव्दांत न सांपडता त्यांनी निर्भेळ द्दष्टिकोनच स्वीकारला. महाराष्ट्रांतल्या बारा जिल्ह्यांसाठी स्थापन होणारा पक्ष हा अखिल भारतीय काँग्रेसला पर्यायी पक्ष ठरुं शकत नाही हेंच या वेळीं त्यांनी प्रभावीपणें प्रतिपादन केलं. खेर यांच्या धोरणाबद्दल मतभेद आहेत, नाराजी आहे हें त्यांना मान्य होतं पण त्यासाठी मुख्य प्रवाहापासून अलग होण्याच्या विचाराला त्यांनी या वेळीं बैठकींत ठामपणानं विरोध केला. पक्ष स्थापनेसाठी बोलावलेल्या बैठकीला त्यामुळे निश्चित असा निर्णय त्यावेळीं करतां आला नाही. कारण यशवंतरावांचा विचार मान्य असलेले कांही आमदारहि त्यांत होते. या बैठकीनंतर मोरे जेधे गट आणि चव्हाण गट असे आमदारांमध्ये दोन गट निर्माण झाले आणि मोरे जेधे गटांन त्यापुढच्या बैठकीला चव्हाणांना निमंत्रित करण्याचंच टाळलं. यशवंतरावांचा आपल्याला कांही उपयोग नाही, असाच विचार त्यांनी केला असावा. यामुळे दोन्ही गटांच्या स्वतंत्र बैठकी पुढच्या काळांत सुरु झाल्या. यशवंतरावांनी नव्या पक्षामध्ये महत्वाचं स्थान स्वीकारावं असा प्रयत्नहि झाला, परंतु यशवंतरावांनी तें मानलं नाही. त्यांच्यापुढे प्रश्न कोणा एका व्यक्तीच्या मोठेपणाचा किंवा मानमरातबाचा नव्हता. प्रश्न होता मूलभूत ध्येयाशीं प्रामाणिक रहाण्याचा. १९३० मध्ये त्यांनी काँग्रेसचं बोट, मनांत एक निश्चित ध्येय ठेवून आणि कार्यक्रमाची आखणी करुनच धरलं होतं. स्वातंत्र कशासाठी यासंबंधांतहि त्यांचे विचार पक्के होते. काँग्रेसमध्ये राहून जे लढे केले त्याच्या ब-यावाईट परिणामाची कदर त्यांनी कधी केली नव्हती. खेर यांचं धोरण त्यांना मान्य नव्हतं, मनांत नाराजी होती, पण ता नाराजी व्यक्त करण्यासाठी, लोकशाही पद्धतीनं काम करणा-या काँग्रेस पक्षावरील विश्वासाला तडा जाऊं द्यावयाचा काय, हा त्यांच्यासमोर प्रश्न होता.
खेर यांच्या कामाच्या पद्धतीत बदल घडवायचा तर काँग्रेसमध्ये राहूनच आणि समर्थपणांन तो बदल घडवून आणतां येईल याची त्यांना खात्रीहोती. कारण बदल घडवावा या विचाराचे आमदार बहुसंख्येनं होते. या शक्तीचा विधायक मार्गानं उपयोग करतां येणं शक्य आहे, अशी खात्री ते देत होते. शंकरराव मोरे यांना ही भूमिका कांही अंशी मान्यहि होती, परंतु मंत्रिमंडळांतील गुजराती मंत्री आणि गुजराती आमदार यांच्यबद्दल त्यांना विश्वास नव्हता. त्यामुळे यशवंतरावांची भावना मान्य असली तरी राजकारणांत केवळ सद्भावनेची कास धरुनच विचार करावा यासाठी त्यांचं मन तयार नव्हतं. मोरे यांचा स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास दांडगा, व्यासंग मोठा होता. काँग्रेसची सत्ता उच्च आणि बुरसटलेल्या, प्रतिगामी लोकांच्या हातांत केंद्रित झालेली आहे याचा ते अनुभव घेत होते, आणि त्यामुळेच अशा लोकांची संगत सोडून बहुजन समाजाच्या कल्याणासाठी, बहुजन समाजांतील नेत्यांनीच उठाव करुन एकत्र आलं पाहिजे या विचाराशीं ते केंद्रित झाले होते. याउलट काँग्रेसच्या ध्येय धोरणांत आणि प्रत्यक्ष कृतींत बदल घडवायचा तर बहुजन समाजांतल्याच लोकांनी मोठ्या संख्येनं काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हाच उपाय आहे, असा यशवंतरावांचा दावा होता. खेर मोरारजी प्रणित विचाराला तिथे अवसरच रहाणार नाही अशी परिस्थिति निर्माण करायची तर लोकशाहीच्या मार्गांन तें घडवतां येईल, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
१९४८ च्या जानेवारींत म. गांधींचा वध झाला त्या वेळीं काँग्रेसचीं मंत्रिमंडळं निरनिराळ्या राज्यांत स्थापन झालीं होतीं. महाराष्ट्रांतील काँग्रेस पक्ष त्यापूर्वी अभेद्य होता. श्री. केशवराव जेधे हे प्रांतिकचे अध्यक्ष होते. मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. प्रांताध्यक्ष आणि मुख्य मंत्री हे दोघे एकविचाराचे असतील, तर पक्षाची संघटना मजबूत रहाते. दुर्दैवानं महाराष्ट्रांत या दोन प्रमुखांमध्ये मतभेद सुरु झाले होते. या परिस्थितीचा आणि महाराष्टांतील एकूण काँग्रेस संघटनेचा विचार करावा आशीच परिस्थिती त्या वेळीं निर्माण झाली होती. कारण शेतकरी कामकरी पक्ष या नव्यानं जन्मास आलेल्या पक्षाकडे आणि समाजवादी पक्षाकडे, काँग्रेसमधील कांही प्रमुख नेते व कार्यकर्ते आकर्षिले गेले होते. काँग्रेसचं ऐक्य कायम रहायचं तर या दोन्ही पक्षांना शह देण्याचा विचार करणं जरुर होतं आणि याच प्रमुख उद्देशानं ३० मार्च १९४८ ला मुंबईला तांबे यांच्या आरोग्यभवनांत महाराष्ट्रांतील काँग्रेसजनांची एक बैठक आयोजित करण्यांत आली. काँग्रेसचे आमदार व कार्यकर्ते मिळून सुमारे ७५ निमंत्रित याबैठकीला उपस्थित होते.