या निवडणुकीचं मतदान २ मार्च १९५७ ला सुरू झालं आणि ११ मार्चला संपलं. मतदानाच्या तारखा काँग्रेस-पक्षाला सोयीच्या ठरतील अशाच पद्धतीनं निश्चित करण्यांत आल्या आहेत, असा विरोधकांचा आरोप होता. यशवंतराव चव्हाण हे या निवडणुकींतील एक प्रमुख उमेदवार होते आणि त्यांच्या निवडणुकीचं मतदान पहिल्याच फेरींत होणार असल्यानं सा-या महाराष्ट्राचं आणि दिल्लीचंहि लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं.
कराड मतदार-संघांतच ही अटीतटीची निवडणूक झाली. यशवंतरावांना पराभूत करण्यासाठी समितीनं आपली सर्व शक्ति पणाला लावली; परंतु अखेर या निवडणुकींत यशवंतराव विजयी झाले. त्यांना मिळालेलीं मतं आणि विरोधी उमेदरावाचीं मतं यांमध्ये फक्त ६०० मतांचा फरक होता. तेवढींच अधिक मतं मिळवून ते विजयी झाले; परंतु त्यांचा विजय हा अखेर महाराष्ट्राचाच विजय असल्याचं इतिहासानं सिद्ध केलं.
यशवंतरावांच्या या विजयाचा अर्थ वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळा लावला जाण्याची अहमहमिका मग सुरू झाली. या निवडणुकीच्या अगोदर आणि प्रत्यक्ष निवडणूकप्रचारामध्ये यशवंतरावांची बदनामी करण्याचं कांही शिल्लक उरलेलं नव्हतं. या बदनामीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी यशवंतरावांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब केलेलं असल्यानं स्वत: यशवंतरावांना आपला विजय, हा द्वैभाषिकाला मिळालेला कौल आहे, असं वाटणं स्वाभाविक होतं. मुंबईच्या कांही वृत्तपत्रांनीहि हाच अर्थ जनतेला सांगितला. यशवंतरावांचा विजय म्हणजे हिंसक आंदोलनावर लोकशाहीनं मिळवलेला विजय आहे, असंहि सांगितलं गेलं.
यशवंतरावांच्या विजयामुळे अन्य ठिकाणच्या काँग्रेस-उमेदवारांमध्ये फार मोठी आशा निर्माण झाली. इतर मतदार-संघांमध्येहि मतदार काँग्रेसच्या बाजूनंच कौल देतील अशी त्यांची वेडी आशा होती. कारण तेवढीच आशा त्यांच्याजवळ उरली होती; परंतु पश्चिम महाराष्ट्रांतील सर्व मतदार-संघांतील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले तेव्हा या मंडळींची आशा धुळीला मिळाली.
या निवडणुकीच्या प्रत्यक्ष निकालानं महाराष्ट्रांतील काँग्रेस-नेत्यांना तर धक्का बसलाच, परंतु काँग्रेसच्या भल्या-भल्या प्रतिष्ठित उमेदवारांना समितीच्या सामान्य उमेदरावांनी पराभूत केल्याचं पाहून समिति-नेत्यांच्या आश्चर्यालाहि पारावार उरला नाही. समितीचे अध्यक्ष एस्. एम्. जोशई हे पुण्यांतले काँग्रेसचे समर्थ उमेदवा, सरदार बाबूराव सणस यांचा पराभव करून विजयी झाले. पुणें शहरांत या निवडणुकींत काँग्रेसला एकहि जागा मिळाली नाही. विष्णुपंत चितळे यांनी काँग्रेसचे मंत्री बू साठे यांचा पराभव केला, तर जयंतराव टिळक यांनी सौ. नलिनीबाई शिंदे यांना पराभूत केलं. लोकसभेसाठी पुण्यांतून काकासाहेब गाडगीळ हे काँग्रेसचे ज्येष्ठ उमेदवार उभे होते. पोर्तुगीजांची शिक्षा भोंगत असलेले ना. ग. गोरे हे त्याच वेळीं तुरूंगांतून सोडले गेले होते. या निवडणुकींत गोरे यांनी गाडगीळ यांचा पराभव केला. पोपटलाल शहा हे पुण्यांतील काँग्रेसचे जुने पुढारी, त्यांचा पराभव वि. ना. शिवरकर या रारजकीय क्षेत्रांतील एका नवख्या उमेदवारानं केला.
पुणें शहर हें महाराष्ट्रांत राजकीयदृष्ट्या मोठंच जागृत शहर. या शहरानं समितीच्या बाजूनं आपला कौल संपूर्ण दिला होता. यावरूनच महाराष्ट्रांत काँग्रेसची अवस्था अन्यत्र काय झाली असेल हें लक्षांत येऊं शकतं. केंद्रीय मंत्रिमंडळांत असलेले महाराष्ट्राचे त्या वेळचे दोन प्रतिनिधि हरिभाऊ पाटसकर आणि जगन्नाथराव भोसले हेहि पराभूत झाले. नौशीर भरूचा आणि प्रेमजीभाई आसर हे त्यांच्या विरूद्धचे दोन्हीहि समितीचे उमेदराव तुलनात्मकदृष्ट्या राजकारणाच्या क्षेत्राला अपरिचित असेच होते. तरी पण समितीची जी हवा निर्माण झालेली होती त्यामध्ये कित्यकजणांना विजयाचा टिळा लागला.
पश्चिम महाराष्ट्रांतील मतदारांनी मालोजीराजे नाईक-निंबाळकर, मुस्ताफा फकी, गणपतराव तपासे, बू साठे या मंत्र्यांचा पराभव केला. भाऊसाहेब हिरे हे या निवडणुकींत विजयी झाले, परंतु पी. के. सावंत, नानासाहेब कुंटे यांना पराभव पत्करावा लागला. मुंबई वगळतां पश्चिम महाराष्ट्रांत काँग्रेसला फक्त ३३ जागा मिळाल्या, तर समितीनं १०२ जागा जिंकल्या. मुंबईतील २४ जागांपैकी काँग्रेसला १३ जागा जिंकतां आल्यामुळे मुंबई प्रदेश-काँग्रेसची प्रतिष्ठा कांहीशीं शिल्लक राहिली. समितीनं मुंबईंत ११ जागा पटकावल्या होत्या. अशा प्रकारे मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रांत काँग्रेस ४६ आणि समिति ११३ असं बलाबल निर्माण झालं.