यशवंरावांनी विचाराचं आपलं हें सूत्र पुढेहि कायम ठेवलं. कराडवासीयांनी मुख्य मंत्री झाल्याबद्दल १४ नोव्हेंबरला त्यांचा सत्कार अभूतपूर्व झाला. सारी कराडनगरी तर सत्कारासाठी लोटली होतीच, शिवाय सातारा, सांगली, कोल्हापूर या शहरांतून आणि ग्रामीण भागांतून हजारो लोक या समारंभाला उपस्थित राहिले. कराडला त्या दिवशी यात्रेचं स्वरुप प्राप्त झालं. विविध संस्था व व्यक्ति यांच्यातर्फे देण्यांत आलेल्या हजारांवर पुष्पहारांचा स्वीकार यशवंतरावांना केला. सारं शहरच उत्साहित झालं होतं, आनंदलं होतं.
व्दैभाषिक राज्याचा निर्णय होऊन यशवंतराव मुख्य मंत्री होईपर्यंतचे अगोदरचे वर्ष-सहा महिने महाराष्ट्रांतील शिव्याशापांचा वर्षाव त्यांनी झेलला होता. टीका सहन केली होती. कांहीनी त्यांना विश्वासघातकी ठरवलं होतं. त्याच यशवंतरावांच्या सत्कारासाठी कराडनगरी लतापल्लवांनी आता फुलली होती. रस्तोरस्तीं कमानी उभ्या होत्या. यशवंतराव हे या नगरीला परके नव्हते. तिथेच लहानाचे मोठे झाले. पण आताचं मोठेपण हें आगळं होतं. या मोठेपणाचा आनंद तमाम शेतकरी समाजाच्या डोळ्यांतून ओसंडत राहिल्यानं निर्भेळ आनंदाचं तें चालतं-बोलतं दृश्यस्वरुप तिथे प्रगट झालं.
कराडप्रमाणे सांगलींल्या नागरिकांनीहि त्यांचा असाच प्रचंड सत्कार करुन नगरपालिका व जिल्हा लोकलबोर्डा तर्फे त्यांना मानपत्र दिलं. कराड आणि सांगली या दोन्ही ठिकाणीं त्यांनी व्दैभाषिकाचा अर्थच समजावून सांगितला. व्दैभाषिक मुंबई राज्याबाबत संसदेनं केलेल्या निर्णयामुळे नव्या युगाला प्रारंभ होत असून हा निर्णय लो.टिळक, म. गांधी यांच्य उदात्त शिकवणूकीचं प्रतीक आहे. कांही छोट्या गटांच्या इच्छेनुसार लोकसभेचा निर्णय बदलूं शकणार नाही, तो निर्णय बदलण्याचं सामर्थ्य फक्त राष्ट्राला म्हणजे लोकसभेलाच आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
यशवंतराव मुख्य मंत्री झाले होते, परंतु त्याचा अर्थ स्वतः यशवंतरावांनीच सांगितला, “ मी मुख्य मंत्री झालों याचा अर्थ, पुरोगामी वृत्ति भारतांत काम करूं लागली असा आहे. कुणी कोणत्याहि उच्च ठिकाणीं जाऊं शकतो हें यावरून सिद्ध झालं आहे. बहुजन-समाजाला शिक्षणाचा लाभ करून देणारे महात्मा फुले व शाहूमहाराज झाले नसते, स्वातंत्र चालवतांना मातीचं सोनं बनवणारे म. गांधी नसते, समाजवादाचा साक्षात्कार घडवून देणारे पं. नेहरू झाले नसते, तर देवराष्ट्र या गावचा यशवेतराव गुराखीच राहिला असता. भारतांत साचलेल्या नव्या शक्तीचीच ही किमया आहे. नवी किमया कार्यान्वित करण्यासाठीच आता झटलं पाहिजे.
“ नवं राज्य विशिष्ट परिस्थितींत निर्माण झालं आहे. जीं आंदोलनं झाली तीं पाहून राष्टीय विचार परंपरेंत ज्याची वाढ झाली आहे त्यांच्यांत उदासिनता, निराशा निर्माण झाल्याशिवाय राहिली नाही. पण झालेल्या चुका विसरून जाऊं या. काळ बदलतो आहे. त्या काळाची जाणीव नसेल, तर आपण आपलं काम पार पाडूं शकणार नाही. भाषिक राज्याची चळवळ भावनेचा प्रश्न बनवला गेल्यांनं भाऊ-भाऊ होते ते वैरी बनले. आता पुन्हा आपण भाऊ-भाऊ म्हणून नांदायला लागलों आहोंत. मराठी मायबोलीचा दूर असलेला मराठवाडा आता एकत्र आला आहे. कृष्णा, भीमा, कोयना यांच्या काठचा सर्व प्रदेश एका राज्यांत आला आहे. मुंबई कुणीं हिरावून नेलेली नाही. सोमनाथाची सेवा करणारा काठेवाडी भाऊ आमच्यांत आला आहे. विशाल मुंबई राज्य ही इतिहासाची नवी घटना आहे. ही जबाबदारी पार पाडली नाही, तर दुदैंवाचा नवा फेरा येणार आहे.
“ विरोधी मित्रांनी पुन्हा एकदा विचार करावा. लोकसभेच्या निर्णयानंतर लोकशाहींत आपल्या सर्व मर्यादा संपतात. लोकसभेचा सर्व निर्णय मानला पाहिजे. कोणत्या रस्त्यानं जायचं यासाठी भांडत बसलों, तर गाव बाजूलाच राहिल. राज्याच्या आकाराच्या वादासाठी आपणं डोकीं फोडलींत तर डोकींच शिल्लक रहाणार नाहीत. भारताच्या निष्टेला मीं माझं शिर एकदा वाहिलेलं आहे. दुस-या निष्ठांसाठी आता मी शिर आणूं कुठून ? देशांत झपाट्यानं आर्थिक व सामाजिक बदल होऊं लागले आहेत. आपण प्रयत्न केला नाही, तर पुरोगामी विचारांचा प्रवाह जोरांनं पुढे जाईल. दारिद्र व अज्ञान दूर करण्याची शक्ती आपल्यांतआणायची आहे. त्यासाठी क्षणाक्षणानं आणि कणाकणानं राबावं लागणार हे. दोन सख्ख्या भावांचं, नव्हे जुळ्या भावांचंहें राज्य म्हणजे संस्कृतीचा पवित्र संगम आहे.