यशवंतरावांचा आपल्या वाणीवरील ताबा विलक्षण होता. खरे सांगायचे असेल तर तो लोकोत्तर आहे. मोजके, मृदु, मुद्देशीर बोलण्यात ते अग्रेसर होते. आपले मत ठामपणे मांडताना ते प्रतिपक्षावर वाणीचे जखमी प्रहार करत नव्हते. मुद्याने मुद्दा खोडून, ते वस्तुस्थितीने विरोध हाणून पाडत. प्रांजळपणाने प्रतिपक्षाचा ग्राह्यांश पटकन मान्य करत. वादे वादे शीर्षभंगापर्यंत ताणण्यापेक्षा तत्त्वाचा भाग पदरात पाडून बाकी फोलपट भर्रदिशी फेकून देत. यशवंतराव सर्व विषयांवर बोलत. सर्व प्रसंगी बोलत. सर्व ठिकाणी बोलत. कोणता विषय वा कोठले व्यासपीठ त्यांना वर्ज्य नव्हते. सामान्य खेडूतांच्या सभापासून ते असामान्य पंडितांच्या परिषदांपर्यंत त्यांनी भाषणे केली. त्या त्या श्रोतृवृंदाच्या पातळीवर जाऊन सर्वांना समजेल असे मिठ्ठास भाषण ते करत. त्यात मुद्दा बळकट, मत निश्चित, मनसुबा संशयातील असे, पण त्यात कोठेही टवाळखोरपणा नसे. दुसर्‍याची उणीदुणी काढण्याचा प्रयत्‍न नसे की प्रतिपक्षाला खिजवण्याचा हेतू नसे. स्वत: हरतर्‍हेची सुष्टदुष्ट टीका धैर्याने सोसत असतानाही कर्माने त्यांचा बदला घेण्याचा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. शब्दांनी केलेल्या जखमा जन्मभर झोंबत राहतात इतकी तीव्र जाणीव ठेवून बोलणारा हा बहुधा एकुलता एक वक्ता असावा. पराभूत परिस्थितीतही त्यांच्या वाणीला चीड, द्वेष, राग यांचा संसर्ग झालेला कधी दिसला नाही, की विजयी वातावरणात त्यांच्या वाणीमध्ये अहंकार, उन्माद, हेटाळणी यांचा स्पर्श जाणवला नाही. हे सर्वांची अंत:करणे काबीज करण्याचे यशवंतरावांचे अमोघ साधन होते. वृत्तीने सत्त्वधीर, विचारांनी सात्त्विक, वागणुकीने साधे, व्यवहाराला सरळ होते.

यशवंतरावांच्या आयुष्याचा प्रवास ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरू झाला ती लक्षात घेतली तर त्यांनी कितीतरी मोठी झेप घेतली होती हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आयुष्याचा प्रवास कधी एकला चलो रे हे गीत ओठावर खेळवीत, कधी साथीदारांचा काफिला बरोबर घेऊन करावा लागतो. समोरचा मार्ग खाचखळग्यांनी आणि चढ-उतारांनी परिपूर्ण असतो. त्या मार्गाला छेद देऊन तशाच प्रकारचे इतर लहानमोठे मार्ग मागेपुढे जात असतात. जेव्हा असे चौरस्ते पुढे येतात तेव्हा मनात संभ्रम निर्माण होतात. कोणत्या मार्गाचा अवलंब करावा? अशा पेचप्रसंगाच्या वेळी नियती हात वर करून कोणत्या मार्गाने पुढे जायचे आणि कोणते मार्ग टाळायचे हे इशार्‍याने सांगत असते. पण तिची भाषा सांकेतिक, संदिग्ध असते. हे इशारे लक्षात घेण्याइतका चाणाक्षपणा अंगी असावा लागतो. यशवंतरावांच्या अंगी तो भरपूर प्रमाणात होता. पण केवळ चाणाक्षपणावर काम भागत नाही. पुढे जाण्यासाठी अवतीभोवती प्रेरणा शोधाव्या लागतात. खडतर वाटेवर चालण्याचा निर्धार सातत्याने टिकवावा लागतो आणि मजल - दरमजल करत इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रयत्‍नांची शिकस्त करावीच लागते. यशवंतराव आयुष्यातील सर्व आव्हानांना हसतमुखाने सामोरे गेले. त्यांनी चेहरा कधी म्लान होऊ दिला नाही.

यशवंतरावांनी आपल्या आयुष्यात जे यश संपादन केले त्याच्या मागचे रहस्य काय? प्रयत्‍न आणि सतत उद्योग. ते आज आपल्यात नाहीत, वस्तुत: हा नियतीचा खेळ आहे. त्यांच्या बोलण्यात नियती हा शब्द अनेकदा यायचा. पं. नेहरू यांच्या भाषणातून  डेस्टिनी हा शब्द बर्‍याचदा येत असे. नियतीचे संकेत लक्षात घेण्याचा सतत प्रयत्‍न ते  करत असत. यशवंतरावही नियतीची भाषा समजून घेण्याचा प्रयत्‍न करत होते. पण ते दैववादी नव्हते. माणसाच्या जीवनाला बरेवाईट वळण देण्याचा प्रयत्‍न आपण करतच असतो. पण बर्‍याचदा एखादी अदृश्य शक्ती त्या वळणाला कारणीभूत ठरते, या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता. ती अदृश्य शक्ती त्या वळणाला कारणीभूत ठरते, या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता. ती अदृश्य शक्ती म्हणजेच नियती. कधी हाताने तर कधी हाकेने नियती माणसाला खुणावत असते. इशारे देत असते. एखाद्या गोष्टीसाठी ती माणसाला प्रवृत्त करते, ती कधी रोखते तर कधी टोकते. नियतीचा हात या नावाचा एक लेख यशवंतरावांनी लिहिलेला आहे. त्या लेखात त्यांनी नियतीच्या संकेतावर बरेच भाष्य केले आहे. त्यांच्या स्वत:च्या आयुष्यात कितीतरी बर्‍यावाईट घटना घडल्या., परंतु अवतीभवतीच्या परिस्थितीशी संवाद साधत त्यांनी पुढची वाट मनातला आशावाद ढळू न देता सुरू ठेवली. प्रेरणा मिळत गेल्या, साथीदारांचा काफिला वाढत गेला, विचारांची दिशा स्पष्ट होत गेली. मग पायाखालच्या वाटेने त्यांना एका क्षितिजापासून दुसर्‍या क्षितिजापर्यंत आणून सोडले. धोक्याची वळणेही आली., पण अशा प्रसंगी नियतीने सिग्नल उभा करून त्यांना सावध केले. सिग्नल पडला की पुढे जायचे. तारतम्य आणि सतत सावधानता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक व्यवच्छेदक लक्षणे होती. सावधानता आवश्यक आहेच., पण कधी कधी तिची जागा साहसाला देणे आवश्यक ठरते. यशवंतरावांच्या आयुष्यात तसे झाले असते तर देशाच्या इतिहासाला वेगळे वळण लाभले असते. नियतीला ते मंजूर नव्हते असे म्हणता येईल का?