२ एप्रिल १९५३ ला सभागृहापुढे आलेल्या गोवधबंदी विधेयकावरील चर्चेस सरकारतर्फे उत्तर देताना ते सभागृहास उद्देशून म्हणाले, ''या प्रश्नाचा विचार करताना कृपा करून धार्मिक, सांस्कृतिक त्याचप्रमाणे मनात घडलेले राजकीय प्रश्न उभे करू नका. या प्रश्नाचा आर्थिकदृष्टीने विचार करून घटनेमध्ये ४८ वे कलम घालण्यात आले आहे त्याकडे सभागृहाचे लक्ष वेधून आर्थिक दृष्टिकोनातून या प्रश्नाचा विचार करावयास हवा असे त्यांनी सभागृहास सांगितले व हे विधेयक मांडणारे ज्या विचारसरणीचे प्रतीक म्हणून या सभागृहापुढे मांडतात ती विचारसरणी इतिहासजमा झालेली आहे, असे आग्रही प्रतिपादन करून पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्‍न या पद्धतीने यशस्वी होणार नाही. हिंदुस्थानात गाईचे स्थान उच्च राखावयाचे असेल आणि ती खर्‍या अर्थाने गोमाता व्हावी असे सन्माननीय सभासदांना खरोखरीच वाटत असेल, तर हा मनुष्य मुसलमान धर्माचा आहे की इतर कोणत्या धर्माचा आहे, हे लक्षात न घेता गाईबद्दल त्याग करण्याची भूमिका आपण त्यांच्या मनात निर्माण केली पाहिजे. गाईची सर्व प्रकारे जोपासना करून तिच्या दुधाबद्दल आवड निर्माण करणे आणि तिच्या रक्षणाची जबाबदारी घेणे किती जरुरीचे आहे ही भावना समाजाच्या सर्व थरापर्यंत निर्माण केली तर गोपालनाचा प्रश्न आपण यशस्वी रीतीने सोडवू आणि शेतीच्या क्षेत्रातही गाईचे जे महत्त्वाचे स्थान आहे ते पुन्हा परत मिळवून देऊ. असे सांगून या विधेयकाला सरकारतर्फे विरोध केला. शेवटी गोवधबंदी फेटाळण्यात आले.''

यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री झाले तेव्हा मुंबई येथे त्यांचा भव्य सत्कार झाला. सत्काराची भाषणे कशी स्तुतिसुमने उधळणारी असतात ते आपण जाणताच. एका वक्त्याने सांगितले की, यशवंतराव म्हणजे पुन्हा जन्म घेतलेल शिवाजीराजे आहेत, दुसरा म्हणाला की, ते शाहूराजे आहेत, तिसर्‍याने त्यांना नेपोलियन ठरविले. मग यशवंतराव सत्काराला उत्तर देऊ लागले. ते म्हणाले, ''मला आज शिवाजीराजे, शाहूराजे व नेपोलियन ठरविण्यात आले. मी एवढा मोठा नाही हे सांगण्याची गरज नाही! तथापि एक गोष्ट मला सांगितली 'पाहिजेच!' मी इतका मोठा नाही असे न समजण्याइतका मी छोटा देखील नाही!'' या पहिल्याच वाक्याने यशवंतरावांनी सभा जिंकली. पारिजातकचे झाड हलवावे आणि खाली फुलांचा सडा पडावा त्याप्रमाणे यशंतरावांच्या भाषणांची पाने फडफडली तर सुंदर सुभाषितांचा सडाच पडेल. थबथबलेल्या मधाच्या पोळ्यातील मध ठिबकेल.

यशवंतराव चव्हाण राजकीय नेते म्हणून सुविख्यात होते. लोकशाहीच्या समृद्धीला वक्तृत्वाची अमोल देणगी लाभली तर विचारांचे बावन्नकशी सोने कसे बनते याचे यशवंतराव हे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्याकडे सत्ता आली तशी गेलीही. पुन्हाही आली तरी  सत्तेपलीकडे असणारे यशवंतरावांचे दिलखुलास मर्मग्राही मार्मिक वक्तृत्व हा त्यांच्या शैलीचा अभिजात गुणच होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हायला पाह्यजेल हाय ! यासारखी वाक्ये त्यांनी कॉईन(coin) केली होती. त्याचे अनुकरण महाराष्ट्रातील अनेक मातब्बर नेत्यांनीही केले होते, हे सर्वश्रुत आहे.

सारांश, सत्तेच्या गादीवर बसूनही सत्तेने न ग्रासलेले, डावपेचाच्या जंगलात घुसूनही सरळ विचारांची सवय न सुटलेले आणि केंद्रात संरक्षण, गृह, परराष्ट्र, अर्थ, विरोधी पक्षनेते आदी खात्याच्या रुक्ष फायलीत रात्रंदिवस जागूनही जीवनाकडे पाहण्याची निखळ रसिक नजर न गमावलेले यशवंतराव हे आश्चर्यच होते. जी रसिकता अशा सत्त्वपरीक्षेतून सहीसलामत बाहेर निघते, जी अस्मिता राजकारणाच्या भुयारी वळणात कैकदा वाकून व वाकावे लागूनही पुन्हा एखाद्या स्प्रिंगसारखी पीळदार उरते, ती नजर शासकीय आचारउपचारांनी मुळीच मंदावत नाही. ती रसिकता, ती अस्मिता व ती नजर मुळचीच मोठया जीवाची मानण्याखेरीज गत्यंतर नाही.