या ग्रंथालयास महाराष्ट्र राज्यातील 'अ' वर्गातील सर्वोकृष्ट शहरी-सार्वजनिक ग्रंथालय म्हणून सन १९८८-८९ सालचा महाराष्ट्र शासनाचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार' ही मिळालेला आहे.

या ग्रंथालय कक्षास जोडूनच पूर्वबाजूस ८० बाय २४ फूट आकाराचे कालादालन आहे. ग्रंथप्रदर्शने व इतर विविध प्रकारच्या उपक्रमासाठी त्याचा उपयोग करण्यात येतो. हे सारे तळमजल्यावर आहे. वरच्या मजल्यावर यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाचे भव्य सांस्कृतिक केंद्र आहे. नाट्यगृह ११८ बाय १६७ फूट या मापाचे असून त्याची उंची ३४ फूट आहे. आत एक ६७ बाय २६ फुटाची बाल्कनी आहे. नाट्यगृहात एकूण ९२८ बैठक व्यवस्था आहेत. नाट्यगृहाच्या पुढील बाजूस ५६ बाय १९ फुटाचे फॉयर असून त्याचप्रमाणे बाल्कनीतही त्या मापाचे फॉयर आहे. नाट्यगृहाचे स्टेज ६७ बाय २६ फुटाचे आहे. नाट्यगृहाच्या मागच्या बाजूस उपहारगृह व ११५ बाय २५ फुटाचे ओपन टेरेस आहे. साऊंड, लाईट आदींच्या सर्वप्रकारच्या आधुनिक सोयी तेथे करण्यात आलेल्या आहेत.

या स्मृतिसदनाच्या प्रवेशद्वारी यशवंतरावांचा पूर्णाकृती पुतळा नगरपालिका पदाधिकारी, कर्मचारी यांच्या आर्थिक सहकार्याने बसविण्यात आला आहे. तसेच स्मृतिसदनाचा विस्तीर्ण परिसर अनेक वेगवेगळया फुलझाडांनी सुशोभित असून आसपासच्या संपूर्ण जागेत नयनरम्य हिरवळ आहे.

कर्‍हाडचे सांस्कृतिक लेणे ठरलेल्या या स्मृतिसदनाचा आठ फेब्रुवारी १९८७ रोजी विश्ववंद्य विचारवंत आणि प्रखर बुध्दिवादी व रॉयवादी विचारसरणीचे प्रज्ञावंत मा. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदरावजी पवार यांचे शुभहस्ते उदघाटनाचा सोहळा संपन्न झाला. या उदघाटन समारंभाच्या निमित्ताने मा. ना. अभयसिंह राजेभोसले व मा. आमदार सादशिवराव मंडलिक यांची उपस्थिती लक्षणीय होती.

या उदघाटन समारंभानंतर गेल्या १५-१६ वर्षात नाटकांचं वेड असलेल्या कर्‍हाडच्या नाटयरसिकांना अनेक उत्तमोत्तम नाटकांचा लाभ आणि ग्रामीण परिसरातील लोकांना उत्तम लोकनाटयांचा लाभ आणि बृहन्महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांची भाषणे, सामाजिक प्रबोधनाच्या परिषदा, साहित्यिक-सामाजिक विषयांवरील परिसंवाद, चर्चासत्रे, ग्रंथप्रदर्शन, जागतिक किर्तीच्या जादूगाराचे जादूचे  प्रयोग, याशिवाय श्री. अनुप जलोटा, श्री भीमसेन जोशी यासारख्या उत्कृष्ट गायकांच्या मैफली, भक्तिगीते, राष्ट्रीय एकात्मतापर यासारख्या विविध लोकरंजन आणि लोकप्रबोधनपर कार्यक्रमांच्या उपयोजनामुळे हे सांस्कृतिक स्मृतिसदन आतापर्यंत अभिरुचीसंपन्न कार्यक्रमास मुकलेल्या कर्‍हाडच्या श्रोतृवृंदास लाभल्यामुळे यशवंतरावांच्या व्यापक जीवनदृष्टीच्या हेतूने साफल्य, मा. नगराध्यक्षांच्या चाणाक्ष आणि चतुर कलाप्रेमी दृष्टीमुळे सर्वांना त्याचा लाभ झालेला आहे व होत आहे.

कर्‍हाड नगरपालिकेने केवळ नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे एवढेच पाहिल नाही, तर त्याचबरोबर इथे एक सुंदर स्मारक असावे, इथे एक चांगले नाट्यगृह असावे, इथे चांगले वक्ते यावेत, साहित्यिक विचारवंत-कलावंत यावेत यासाठी जे केलेलं आहे ते जनतेने जीवन फुलविण्यासाठी, समृद्ध बनविण्यासाठी उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून केलं आहे. तसेच नगरपालिकेस कायमस्वरूपी काही प्रमाणात उत्पन्न मिळेल याची तरतूद करून ठेवली आहे. मात्र संयोजकांनी हे स्मृतिसदन कर्‍हाडवासी व परिसरातील जनता यांच्यावर सुसंस्कार होतील, भारतीय सांस्कृतिक नीतिमूल्यांचे जतन - संवर्धन होईल असेच कार्यक्रम आयोजित होतील, याची सदैव दक्षता घेणे जरुरीचे आहे असे वाटते.