दै. नवा काळचे संपादक आपल्या अग्रलेखात म्हणतात की,

समर्थ रामदासांसारख्या महान योग्याला स्तुतिसुमनांचा वर्षाव करावा लागला अशी शिवाजी महाराज ही विभूती होती. समर्थ रामदासांनी म्हटले आहे की,

शिवरायाचे कैसे चालणे। शिवरायाचे कैसे बोलणे ।
शिवरायाची सलगी देणे। कैसे असे ॥

समर्थ रामदास इतके निहायत प्रसन्न झाले होते की, शिवरायाचे चालणे, बोलणे, आपुलकीने वागणे अशा प्रत्येक गोष्टीचे त्यांनी कौतुकाने कीर्तन केले आहे. संयुक्त महाराष्ट्रात नेते अनेक झाले, पण ज्यांचे चालणे आणि बोलणे, सलगी देणे फार फार वेगळे होते. आजही आम्हाला डोळयांनी दिसतात असे फक्त यशवंतराव! यशवंतरावांनी आम्हाला प्रेम दिले. आम्हाला त्याचे नवल वाटायचे. ज्या वृत्तपत्राचा पांच हजारही खप नाही त्या वृत्तपत्राच्या संपादकाला आज कोण मोजतो? पण यशवंतराव फार प्रेमाने वागले आणि आम्ही आश्चर्यचकित झालो. एकदा सरळ त्यांना विचारले, यशवंतरावांचा धाक होता पण न विचारण्याइतका नव्हता. आम्ही विचारले, ''नवा काळचा पांच हजारही खप नसताना आपण आपुलकीने व मानाने का वागविता?” यशवंतरावांनी उत्तर दिले, ''ज्या घरांशी मैत्री जोपासायची असे मी मनोमन ठरविलेले आहे, त्यात तुम्ही आहात! मी रोजचा हिशोब करणारा राजकारणी नाही, मी महाराष्ट्राचे आगामी पंचवीस वर्षांचे चित्र रंगविणारा कलाकार आहे!'' असे हे बोलणे, असे त्यांचे वागणे आणि अशी सलगी देणे.!

एकदा यशवंतरावांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अग्रलेख लिहिला. त्यात म्हटले होते की, यशवंतराव जाणीवपूर्वक शिवरायांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्‍न करतात. यामुळे ते शिवरायांची स्मृती जागवितात. तथापि शिवरायांचा सर्वात महान गुण त्यांच्यात नाही. शिवरायांनी प्राणांची किंमत देणारी हिंमत क्षणोक्षणी धरली. यमदूताच्या सावलीतच ते जगले. अफजलखानाच्या भेटीसाठी गेले तेव्हा वाघाच्या जबडयात त्यांनी मानच दिली नव्हती का? शाहिस्तेखानाच्या वाड्यात शिरले तेव्हा आगीतच शिरले नव्हते का? औरंगजेबाच्या दरबारात त्यांनी पाऊल टाकले तेव्हा मृत्यूलाच त्यांनी आव्हान दिले नाही काय? तळहातावर प्राण घेऊन शिवाजीराजे पराक्रम गाजवीत राहिले. याउलट यशवंतरावांच्या शब्दकोशात हिंमत हा शब्दच नसावा! मृत्यूचा धोका सोडाच, पण सत्तापद जाण्याचा धोकाही ते कधी पत्करत नाहीत. यशवंतरावांचे सावध राजकारण यशस्वी आणि कल्याणकारी आहे.

यशवंतरावांचे बळ वाढले.

दै. 'नवशक्ती' चे संपादक आपल्या अग्रलेखात म्हणतात, बुलढाणा मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीत संघटना काँग्रेसचे उमेदवार बॅ. निकम यांचा सपशेल पराभव करून काँग्रेसचे उमेदवार प्राचार्य यादव शिवराम महाजन हे दणदणीत बहुमताने निवडून आले. २७६ मतांनी आपली अनामत रक्कम वाचली एवढेच समाधान सिंडिकेट काँग्रेसला फार तर मानता येईल. या निवडणुकीला आणि याच वेळी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीलाही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने मोठे महत्त्व होते. राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सिंडिकेट काँग्रेसला अनपेक्षित विजय मिळाला होता आणि ते यश सिंडिकेटने महाराष्ट्र काँग्रेसच्या आमदारात फाटाफूट करून मिळविले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीतही अशीच फाटाफूट आपण करू अशी सिंडिकेटची समजूत होती. सिंडिकेटने काँग्रेस आमदारांपैकी सात-आठ लोकांना फोडले असावे असे दिसते. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सिंडिकेटचा उमेदवार पडलाच आणि काँग्रेसचे आठही उमेदवार विजयी झाले. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाचा हा निर्विवाद विजय आहे. महाराष्ट्रात पाय रोवण्याआधी सिंडिकेटची जी काही स्वप्ने असतील ती अर्धीअधिक तरी निकालात निघावीत, असेच हे निर्णय आहेत.

महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला तर तो यशवंतरावांचा आणि विजय झाला तर तो इंदिरा गांधींचा असे ज्यांना भासवायचे असेल त्यांनी खुशाल तसे भासवावे, पण महाराष्ट्र काँग्रेसवर आणि सर्वसामान्य मराठी मनावर यशवंतरावांची पकड आहे हेच या निवडणुकीने सिद्ध केले आहे. यशवंतराव गृहमंत्री असले तरी त्यांना तेथे कोंडीत पकडण्याचे राजकारण अनेक बाजूंनी नित्यत: खेळले जात असते. सीमाप्रश्नापासून नक्षलवाद्यापर्यंत त्यांच्यावर टाकण्यात येत असलेले डाव ते मोठया चातुर्याने दूर करीत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचे बळ कमी झाले असते तर ती घटना यशवंतरावांच्या विरुद्धच वापरण्यात आली असती. या बुलढाणा पोटनिवडणुकीतील आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतील यशाने यशवंतरावांचे बळ वाढले आहे.