महाराष्ट्राला मुंबई हेच महत्त्वाचे बंदर आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक समुद्र किनार्यावरील राज्याला स्वतःचे असे एक चांगले बंदर आहे असे हिंदुस्थानच्या किनार्यावरील बंदरांकडे लक्ष दिले की दिसून येते. प्रत्येक राज्याला छोटे का होईना एक बंदर आहे. आपण विचार केला तर असे दिसून येईल की सौराष्ट्राला ओखा व कांडला बंदर आहे, त्रावणकोर-कोचीनला कोचीन बंदर आहे, तामिळनाडूला मद्रास बंदर आहे, आंध्रला विजगापट्टम बंदर आहे, ओरिसाला कटक बंदर आहे, बंगालला कलकत्ता बंदर आहे, पण महाराष्ट्राला मुंबईशिवाय दुसरे कोणतेही बंदर नाही, तेव्हा मुंबई महाराष्ट्राला का नाकारावी हे कळत नाही.
दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्राचे नवीन राज्य निर्माण होऊन नवीन संसार उभारला जाईल त्या वेळी महाराष्ट्राची राजधानी कोठे असावी हा प्रश्न निर्माण होईल आणि मुंबई महाराष्ट्राला दिली नाही तर हा वाद बंद न होता तो वाढीला लागेल. तेव्हा तीन कोटींच्या ह्या नवीन संसाराला आशीर्वाद देताना नवीन भांडण सुरू होण्याऐवजी हा संसार सुखाने कसा चालेल यासाठी मुंबई शहर महाराष्ट्राला दिले पाहिजे अशी आमची हाक आहे. राजकीय दृष्टया मुंबई शहर महाराष्ट्रापासून अलग करावयाचे तर ते कोठल्या तत्त्वावर करता या बाबतीत महाराष्ट्रीयांचे समाधान करावे म्हणजे महाराष्ट्रीयांवर जो आक्षेप घेण्यात येत आहे तो दूर करण्याची संधी त्यांना मिळू शकेल. कदाचित् असे म्हटले जाईल की मुंबई शहरातील उद्योगधंद्यासंबंधी काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत. अध्यक्ष महाराज, उत्तर देण्यासाठी म्हणून मी हे बोलत नाही पण मला असे म्हणावयाचे आहे की मुंबई शहरातील उद्योगधंदे बाहेर नेऊन त्यांची विकेंद्रीकरणाच्या तत्त्वावर वाटणी करावी अशी कोणाचीही इच्छा नाही. कोठलाही धंदा बाहेर नेऊन त्याची हेळसांड करावी अशी कोणाही महाराष्ट्रीय मनुष्याची इच्छा नाही आणि मी असे आश्वासन देऊ इच्छितो की, मुंबईचे उद्योगधंदे वाढविण्यात महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे कल्याण आहे. तेव्हा उद्योगधंद्याची हेळसांड करावी अशी एक टक्कादेखील आमच्या मनात शंका येत नाही याची त्यांनी खात्री बाळगावी. डॉक्टर गाडगीळ यांनी 'फ्यूचर ऑफ बॉम्बे' या नावाची जी पुस्तिका लिहिली आहे, त्यामध्ये असे म्हणण्याचा त्यांचा आशय होता असे कोठेही दिसून आलेले नाही. शब्दांवरून ह्या पुस्तिकेची तपासणी करावयाची तर त्यामध्ये कोठेही असा अर्थ दिसत नाही. मनुष्याचा अंतःकरणात काय आहे हे मला सांगता येणार नाही पण शब्दावरून व त्यांच्या अर्थावरून काय दिसते ते मी आपल्याला सांगितले आहे. तेव्हा मुंबईतील उद्योगधंद्याची मोडतोड करावी अशी कोणाचीही इच्छा नाही हे मी पुन्हा आग्रहपूर्वक सांगू इच्छितो.
मुंबई महाराष्ट्राला देणे किनार्याच्या किंवा बंदराच्या दृष्टीने कसे सयुक्तिक आहे हे मी सांगितलेच आहे. तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तरी मुंबई महाराष्ट्राला द्यावी असे आम्ही म्हणतो याला दोन कारणे आहेत. मुंबईमध्ये महाराष्ट्रीय माणसे जास्त आहेत हे एक कारण तर खरेच. मी असे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील माणसे जशी मुंबईवर अवलंबून आहेत तशी इतर भागातील माणसे मुंबईवर अवलंबून आहेत पण त्यामध्ये मोठा फरक आहे. महाराष्ट्रातील एक माणूस मुंबईमध्ये असला तरी त्याच्या मागे असलेले त्याचे कुटुंब देशावर असते. देशावरील जवळ जवळ १० माणसे त्याच्या रोजगारावर अवलंबून असतात. तेव्हा मुंबईतील १९ लाख लोकांचा हा प्रश्न नसून दीडदोन कोटी लोकांचा प्रश्न निर्माण होतो. एवढया मोठया लोकसंख्येच्या मनात आमचे भवितव्य काय आहे अशी ज्या वेळी शंका निर्माण होते त्या वेळी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मला वाटते. ह्या सर्व गोष्टींचा विचार करता एक मार्ग आपल्याला दिसू शकतो. इतरांच्या बरोबर मुंबईतील लोकांचा विचार झाला पाहिजे असे वाटते तर ह्या राज्यपुनर्रचना विधेयकात पंजाबचा अवघड प्रश्न सोडविण्यासाठी जी दृष्टी ठेवली आहे निदान ती तरी मुंबईसाठी का घेतली नाही? पंजाबमध्ये एक समाज दुसर्या समाजाबद्दल साशंक आहे असे गृहित धरले तरी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. अ समाज ब समाजाबद्दल साशंक आहे म्हणून त्यांना एकमेकांपासून काही वेगळे केले नाही. एक राज्य व एक कायदेमंडळ कायम ठेवून रीजनल कमिटीची जी सूचना केली आहे त्यामुळे त्या त्या विभागाकरिता जे प्रश्न निर्माण होतील ते ही कमिटी सोडवू शकेल अशी प्रथा पडली आहे; त्याप्रमाणे मुंबईकरिता महाराष्ट्राच्या विधिमंडळात छोटीशी समिती निर्माण करून मुंबईचा प्रश्न सोडविता आला असता. तेव्हा मुंबईचा प्रश्न बिकट आहे असे मला वाटत नाही. भीती किंवा संशय ह्यावर राज्यपुनर्रचनेचे काम आधारले जाऊ नये ही आशा मी व्यक्त करतो.