व्याख्यानमाला-१९९५-९६-४९

प्रत्येक कुटूंब, प्रत्येक गांव, प्रत्येक राष्ट्र भौतिक सुविधांच्या बाबतीत स्वयंपूर्ण संपन्न करण्यासाठीची शक्ती आज विज्ञान तंत्रज्ञानांत आहे. गांधीजींच्या ग्रामस्वराज्यातील स्वयंपूर्णता आता अशक्य नाही. पण माणसाचे मन षड्रिपूंच्या विळख्यातून बाहेर आले नाही तर मात्र हेच विज्ञान सा-या जगाची राखरांगोळी करू शकेल. आजच जगाच्या पाठीवरील “युनोमध्ये व्हेटो वापरणा-या राष्ट्रांनी” सारी पृथ्वी मोजून २५ वेळा जाळून काढता येईल, इतक्या अणूबाँबचे साठे करून ठेवले आहेत.

युरोपची पाश्चात्य संस्कृतीची मानसिक गुलामगिरी, आता आपण टाकून दिली पाहिजे. आणि मी पहिल्या भाषणांत सांगितल्याप्रमाणे चिरंतन ठरलेली जीवनमूल्ये पुन्हा आचार विचारांत आणली पाहिजेत. हे पाश्चात्य लोक जगज्जेते आहेत. विद्या, सत्ता, संपत्तीचे डोंगर त्यांनी उभे केलेत. विज्ञानाच्या आघाडीवर तर त्यांनी खूप मोठा पल्ला गाठला आहे. हे सर्व खरे असले तरी व्यक्ती, समाज व सृष्टी उध्वस्त करणारी त्यांची संस्कृती ही एक राक्षसी संस्कृती आहे. आणि या युरोपीयन लोकांना मानवी समाज चालवणेचा अनुभव किती? हजार पाचशे वर्षाचा. गेल्या हजार पाचशे वर्षांचा या युरोपीयन मंडळींचा इतिहास खोलांत जाऊन तपासला तर, त्यांच्या गो-या गोमट्या चेह-याआड दडलेला कसाई, भस्मासूर, बकासूर आपल्याला दिसेल. नुकतेच माझ्या वाचनांत एक पुस्तक आले. त्याचे नांव “पिपल्स हिस्ट्री ऑफ अमेरिका” असे आहे. आणि त्यांत गेल्या ५शे वर्षात जग जिंकण्यासाठी या युरोपीयनांनी काय काय अत्याचार केलेत याचा त्यात खरा इतिहास आहे. कोलंबसने अमेरिक भूमीवर पाय ठेवल्यानंतर या युरोपीयन लोकांच्या टोळधाडी अमेरिकेत सुरू झाल्या. शंभर एक वर्षानंतर त्या देशांत वसाहती करण्याची मोहीम सुरू झाली. अमेरिकत ही मोहीम होती. त्याप्रमाणे आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड इकडेही अशा मोहिमा सुरू झाल्या. आशिया खंडात व्यापारी कंपन्या स्थिरस्थावर झाल्या. अमेरिकेचा परराष्ट्र मंत्री जॉन फॉस्टर डल्लेस यांने जे पुस्तक लिहीले आहे त्याचा काल मी उल्लेख केला आहे. जॉन फॉस्टर डल्लेस त्या पुस्तकात युरोपने जग कसे जिंकले ते सांगतो आहे. तो म्हणतो मिशनरी, मर्चंट आणि मिलिटरी हा त्रिशूल वापरून युरोपीयनांनी जग जिंकले प्रथम मिशनरी परक्या मुलुखांते जात. अत्यंत चिकाटीने तिथल्या स्थानिक लोकांचा विश्वास मिळवीत. त्या देशांतील खडान् खडा माहिती काढीत. धर्मप्रचाराच्या नावाखाली त्या देशांत काही “पंचस्तंभीय” लोक निर्माण करीत.

नंतर व्यापारी कंपनीतर्फे “मर्चंट” त्या मुलुखांत जात, सा-या आर्थिक नाड्या अभ्यासून आपल्या हाती घेत. तिथेच पैसा जमवून तिथेच तैनाती फौजा उभ्या करीत. तिथल्या राजे लोकांत गट, तट, भांडणे पेटवून देत आणि त्याचा फायदा घेऊन आपले “कवायती” सैन्य आणून तो मुलुख जिंकून घेत.

“अमेरिकेतील लोकइतिहास” हे पुस्तक वाचताना या युरोपीयन लोकांनी तिथल्या स्थानिक लोकांशी केलेला आमानुष व्यवहार पाहून मन चिडून जाते. अमेरिकेतील स्थानिक “रेड इंडियन” लोक हे आदिवासी निसर्गपुत्रच. सडे बांध्याचे, तांबूस रंगाचे, अति साधे भोळे, अत्यंत आदरातिथ्यशील. गो-या लोकांच्या बोटी आल्या, कपडे घातलेले, कधीच न पाहिलेले विचित्र लोक मोठे कुतुहल, आश्चर्य, नवख्या लोकांना भीतिपोटी हाकलून द्यावे, असे नाही त्यांना वाटले. त्यांना ते पाहूणे वाटले. कुठून तरी आले. कुठेतरी निघून जाणार. त्यांच्या मनांत पाहुणचाराच्या कल्पना आल्या. आपल्याजवळ होते नव्हते ते सारे त्यांनी पाहुणचार म्हणून त्यांना दिले. मध, केळी, पक्षी. पण या पाहुयांनी त्या लोकांचा अंदाज घेतला. बोटीवर घेऊन पकडून ठेवले. त्यांचे आक्रमक हेतू उघडे झाले. युरोपीयनांनी त्यांना गुलाम केले. अमेरिका म्हणजे सोन्याचा देश अशी त्यांची कल्पना, त्या सोन्यासाठी स्थानिक लोकांना नद्या, नाली, डोंगरापर्यंत शेते खणायला लागले. पाहुणे त्यांना जिंकायला आले होते. त्यांना हाकलायला आले होते. त्यांचा देश कब्जात घेऊन तिथेच कायमचे रहायला आले होते. हे त्या वनवासी इंडियनांच्या उशीरा लक्षात आले आणि मग त्यांचा स्वाभिमान जागा झाला. त्यांनी प्रतिकार केला, आपल्या साध्या तिरकामट्यांनी काठ्याकु-हाडींनी, बंदुकीचा मुकाबला केला. आणि मग युरोपीयनांनी आपले लढाऊ सैन्य, हत्यारे, तोफा आणून रेड इंडियनांच्या विरुद्ध युद्धच पुकराले. त्यांच्या वस्त्या जाळायच्या, बायकामुलांच्या कत्तली करायच्या, डोंगरमाळावर पळून गेलेल्यांच्या शिकाही करायच्या, असा वंशसंहार तीनशे वर्षे चालला. अमेरिकेची विशाल भूमी कब्ज्यात घेताना किती रेड इंडियनांच्या कत्तली केल्या? ते पुस्तक म्हणजे तीन कोटी लोकांची, शेवटची वस्ती जाळण्याची घटना १९११ साली घडली. आणि रेड इंडियनही बहाद्दूर, त्यांनी मरण पत्करले, वंशसंहार पत्करला पण यरोपीयनांची गुलामी पत्करली नाही.