महर्षी व्यासांनी माणसांच्या गरजा, इच्छा, अपेक्षा आणि त्यांची योग्य मार्गाने पूर्तता करण्याबद्दल सखोल विचार केला होता, आणि तो किती तरी आग्रहाने मांडला होता. जनावरी प्रेरणांच्या आहारी जाणा-या माणसाला धर्माची दीक्षा का आणि किती आवश्यक आहे, हे सांगताना व्यास महर्षी म्हणताहेत, “उर्ध बाहूः विरोमी एषां। नचू किंचित श्रृणोति माम्। धर्मात अर्थः कामः च। स धर्म किम न सेव्यते” हात उंच उभारून मी ओरडून सांगते आहे तरी माझं कुणी ऐकत नाही, अरे समाजधारणा करणारा धर्मच तुमच्या सा-य़ा आर्थिक, मानसिक, भावनात्मक गरजा भागवू शकतो, त्या धर्माप्रमाणे तुम्ही का आचरण करत नाही?”
व्यक्ती, समाज आणि सृष्टीची धारणा करणारा धर्म, हा कर्मकांडांचा, मायावादाचा, रूढी परंपराचा किंवा “ब्रह्म सत्य, जगन् मिथ्या” म्हणणारा भ्रमिष्ट शिकवणुकीचा धर्म नाही. समाजधारणेसाठी खरा धर्म आवश्यकच आहे, हे धर्म ही अफूची गोळी म्हणून, अधर्मी, निधर्मी तत्वज्ञाने मांडणारांनी लक्षांत घेतलेले नाही, अंधश्रद्धा आणि श्रद्धा यांत जेवढे अंतर, तेवढेच अंतर रूढ धर्माचे प्रचलीत विकृत स्वरूप आणि ख-या धर्माचे स्वरूप यामध्ये आहे. समाजधारणेसाठी ख-या धर्माची आजही अत्यंत आवश्यकता आहे.
नागपूरकडील एक महापंडित विद्वतत्न भाऊसाहेब दप्तरी यांनी लिहीलेले एक पुस्तक माझ्या वाचनांत आले होते.
“धर्म-रहस्य” असे त्या पुस्तकाचे नांव आहे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच ‘धर्माची बौद्धीक चिकित्सा’ अशी टिपणी आहे त्या टिपणीमुळेच मी ते पुस्तक वाचले. लोकमान्य टिळकांनी ज्या सुमारास “गीतारहस्य” हा ग्रंथ लिहीला,त्याच सुमारास दप्तरीनी “धर्म-रहस्य” हे पुस्तक लिहीले आहे. त्यांत त्यांनी अत्यंत समर्पकपणे धर्माची उद्दीष्टे मांडून मनुष्य प्राण्याचे जगणे धर्माशिवाय शक्य नाही असे “निधर्मी” माणसालाही विचार करायला लावील अशा पद्धतीने विवेचन केले आहे. भाऊसाहेब दप्तरींनी आद्य शंकराचार्यांचा “ब्रह्म सत्य, जगन् मिथ्या” या सिद्धांतालाच आव्हान दिले असून, ब्रह्म जेवढे सत्य तितकेच जगही सत्य, ते मिथ्या नाही” अशी भूमिका फार समर्थपणे मांडली आहे. “धर्म-रहस्य” ग्रंथात त्यांनी धर्माची आवश्यकता सांगताना म्हटले आहे, “मनुष्य हा आनंद शोधणारा सुख शोधणारा प्राणी आहे. त्याची सारी धडपड, त्या सुखाचा, आनंदाचा शोध घेण्यासाठीच असते. परंतु ते सुख, आनंद म्हणजे नेमके काय हे त्याला कळतेच असे नाही. तात्पुरत्या सुखासाठी अनंतकाल दुःख भोगण्याचीही पाळी त्याच्या सुख वा आनंद या बाबतीतल्या अज्ञानामुळे येते. म्हणून खरे सुख, खरा आनंद म्हणजे काय? अत्युच आनंद कशात आहे व तो अत्युच्च आनंद कसा मिळवावा हे त्याला कुणीतरी समजून सांगितले पाहिजे, पटवून दिले पाहिजे. दुःख निर्माण न करणारे सुख कोणते? आणि ते कसे मिळवावे? हे समजून सांगण्यासाठीच धर्म आहेत. श्री. दप्तरी म्हणतात त्याप्रमाणे धर्माची लक्षणे दोन, पहिले “निश्रेयस् लक्षण” आणि दुसरे “चोदना लक्षण” सर्वश्रेष्ठ आनंद कशांत आहे हे समजून सांगणे व तो मिळवण्यासाठी माणसाला उद्युक्त करणे हीच धर्माची दोन उद्दीष्टे आहेत. म्हणून मानवी जीवनांत, मानवी समाजात धर्माची आवश्यकता आहे. या मूलभूत आवश्यकतेमुळे अगदी आदिवासीपासून ते प्रगत समाजातील लोकही कसला न कसला तरी धर्म पाळतात. धर्माचा हा सार्वजनिक संचार माणसाच्या सुख शोधण्याच्या स्वभावातच आहे.
समजा चार दिवसाचा एक उपाशी माणूस आहे तसेच एक उपाशी मूलही त्याच्या शेजारी कोमेजून गेले आहे. अशा माणसाला समजा एक गरम भाकरी कोठून तरी मिळाली आणि ती त्याने गपागपा खाल्ली, तर त्या भाकरीपासून त्या चार दिवसाच्या उपाशी माणसाला मिळणारा आनंद अवर्णनीय असणार, परंतु त्यापेक्षाही उच्च कोटीचा आनंद त्याला मिळणे शक्य आहे, कधी? तर त्या उपाशई माणसाने सगली एक भाकरी न खाता, त्यातली मिळणे शक्य आहे, कधी? तर त्य उपाशी माणसाने सगळी एक भाकरी न खाता, त्यातली अर्धी भाकरी त्या उपाशी मुलाला दिली तर त्या मुलाच्या डोळ्यातील आनंद पाहून त्या माणसाला जो आनंद होईल तो त्या पूर्ण भाकरी खाऊन मिळालेल्या आनंदापेक्षा उच्चतर आनंद आहे. हे समजून सांगण्साठीच धर्माची आवश्यकता आहे. दुसरे उदाहण असे देता येईल. समजा त्या चार दिवसाच्या उपाशी माणसापुढे तुपातल्या बुंदीच्या लाडूचे भरलेले ताट आणून ठेवले तर पहिला लाडू खाताना होणारा आनंद आणि दहावा लाडू खाऊन ढेकर देताना होणारा आनंद यांत फरक आहेच. पण पोट गच्च भरले तरी १२वा, १३वा, पंधरावा लाडू त्याने पोटांत कोंबला आणि मग भडा भडा उलटी झाली तर आनंदाऐवजी दुःखच मिळवले असे होईल. हेही समजून सांगायला धर्माची आवश्यकता आहे. त्यामुळे पुरोगामी पणाच्या नांवाखाली देवधर्म, श्रद्धांची टिंगलटवाळी करण्यापेक्षा, सर्व धर्मातील विकृत कर्मकांड, परहिताबद्दलची अनास्था, ढोंगी बडवेगिरी काढून टाकून ख-या आनंदमय धर्माचे रहस्य, सर्व धर्मात कसे उजळले जाईल, यासाठी प्रयत्न करणे, नवसमाजनिर्मितीला आवश्यक आहे.