हा सगळा संस्थात्मक जो सांगाडा आहे, हा जर नीट चालायचा असेल तर त्याला महत्त्वाची अशा प्रकारची राजकीय संस्था म्हणजे पक्ष पद्धती. त्यामध्ये आपल्याला दुर्दैवाने गेल्या चाळीस वर्षात फारसे यश लाभले नाही. ज्या त-हेची पक्ष पद्धती इथे स्थिरावेल असे वाटले होते तशा प्रकारची पक्षपद्धती काही स्थिरावली नाही. घटनाकारांची तशी आशा होती, कारण प्रामुख्याने त्यांच्या डोळ्यासमोर जो आदर्श होता तो इंग्लंडमधल्या लोकशाहीचा होता. आणि इंग्लंडमध्ये प्रामुख्याने दोन पक्ष आहेत. आणि सत्तापालट आलटून पालटून हुजूर पक्षाकडे नाहीतर मजूर पक्षाकडे, मजूर पक्षाकडून पुन्हा हुजूर पक्षाकडे अशा प्रकारे शांततेने कायदेशीर पद्धतीने सुव्यवस्थित असा सत्तापालट दोनच पक्षांमध्ये होतोय. त्याप्रमाणेच आपल्या घटनाकारांना असे वाटले की, कालांतराने इथे पण भारतीय लोकशाहीचा रथ दोन पक्षांच्या चाकावरती स्थिरावेल आणि पुढे जायला लागेल. आता हा आशावाद व्यवहार्य होता की, अव्यवहार्य होता हा विचार करण्यासारखा भाग आहे. मला असे वाटते की, तो बराचसा अव्यवहारी होता. आणि भारतीय घटनाकारांनी ब्रिटिश लोकशाहीचा जेवढा सखोल अभ्यास केला होता आणि तिचा अनुभव घेतला होता तेवढा विचार युरोपमधल्या इतर देशांच्या पक्ष पद्धतींचा केला नव्हता. त्याचबरोबर या देशातला जो समाज आहे त्या समाजाच्या बहुरंगी रूपाचा जेवढा गंभीरपणे विचार करायला हवा होता तेवढा केलेला नव्हता. असे निदान आता पाठीमागे वळून पाहिल्यावरती वाटते. हा देश इतका अठरा पगड आहे. जगाच्या पाठीवरती असेल तेवढी सगळ्या प्रकारची विविधता या देशामध्ये आहे. की या इतक्या वैविध्याने परिपूर्ण असलेल्या समाजामध्ये समाजमन एकतर अ पक्षात नाहीतर ब पक्षात प्रतिबिंबित होईल या आशा वादाला ऐतिहासिक आणि व्यवहारिक आधार नाही. जॉर्ज बर्नार्ड शॉनी समाजवादाच्या संदर्भात म्हटले होते की, सगळा समाजवादी समाज पार्लमेंटमध्ये कायदे करून आपल्याला जन्माला घालता येईल असे मानणे म्हणजे जीवनाचा महासागर संसदेच्या प्याल्यामध्ये ओतता येईल अशी कल्पना करण्यासारखी आहे. दुथडी भरून वाहणारे हे जे जीवन आहे ते असं संसदेच्या टिनपाटामध्ये बसणार नाही. तसा हा भारतीय समाज विविध आहे, वर्धिष्णू आहे आणि त्याचा जसजसा विकास होईल तसतसे त्याच्यातले वैविध्य वाढत जात आहे. असा हा सगळा वैविध्यपूर्ण समाज दोन पक्षांच्या मार्फतच प्रतिबिंबीत होईल या आशेला मी म्हटले तसा ऐतिहासिक, व्यावहारिक किंवा तात्विक आधार नव्हता. म्हणून आपण जी निवडणूक पद्धत स्वीकारली त्या निवडणूक पद्धतीने अन्य देशामध्ये जरी कालांतराने द्विपक्ष पद्धतीचा उगम झाला. निदान व्हायला मदत झाली तसा आपल्याकडे चाळीस वर्षे आणि नऊ सार्वत्रिक निवडणुका होऊनही पक्षांची संख्या कमी कमी होत चालली आहे. आणि द्विपक्ष पद्धतीकडे आपला प्रवास चालू आहे असे म्हणण्यासारखी परिस्थिती अजिबात झालेली नाही. उलट पावसाळा आला की छत्र्या उगवतात त्याप्रमाणे निवडणुका आल्या की पक्षांच्या राहुट्या उभ्या राहतात. निवडणूक पद्धतीच्यामुळे पक्षांच्या संख्येमध्ये घट होईल हा आशावाद फोल ठरलेला आहे.