व्याख्यानमाला-१९८०-२

व्याख्यान पहिले व दुसरे - दिनांक १० व ११ मार्च १९८०

विषय - "महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारण : कालचे, आजचे व उद्याचे."

व्याख्याते - डॉ. जे. एम्. वाघमारे, प्राचार्य, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर.

व्याख्याता परिचय -

अर्वाचीन महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारणाच्या प्रक्रियांचा शोध ब्रिटीश आमदानीच्या आरंभ काळापासून घ्यावा लागतो. इंग्रजी विद्या, इंग्रजी न्याय व्यवस्था आणि वैचारिक प्रबोधन या तीन प्रमुख गोष्टींनी महाराष्ट्राची सामाजिक व राजकीय मानसिकता घडविली आहे. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पहिल्या पिढीने समाज जागृतीचे व सुधारणेचे कार्य हाती घेतले. दुस-या पिढीने समाजकारणाबरोबर राजकीय सुधारणांचा विचारही लोकापर्यंत पोहोचवला. १९ वे शतक संपेपर्यंत महाराष्ट्रात समाजकारण व राजकारण एकमेकांच्या हातात हात घालून वाटचाल करीत होते. पण पुढे त्याच्यात फाटाफूट झाली. गांधीयुगात मात्र राजकारणाला पुन्हा सामाजिक आशय प्राप्त झाला. दलितांच्या मुक्तिसंग्रामासाठी आंबेडकरांनी आक्रमक भूमिका घेतली. स्वातंत्र्य प्राप्तिनंतर सामाजिक सुधारणेची प्रक्रिया मंद झाली. सत्तास्पर्धेच्या राजकारणाने जातियतेसारख्या समाजविघातल गोष्टींना अधिक प्रोत्साहन दिले. त्यामुळे राजकारणाला आवश्यक असणारा सामाजिक आशय लुप्त होती की काय याची भीती निर्माण झाली. ज्यांना सत्तेत पाय रोबता आले त्यांच्यातून एक नवीन वर्ग उदयास आला. दलित, पीडित आणि शोषितांच्या पदरात कसलाच लाभ पडला नाही. शिक्षण प्रसाराबरोबर लोकांच्या अपेक्षा मात्र खूपच वाढल्या. लोकसंख्येच्या भरमसाठ बाढीबरोबर आर्थिक विषमतेची दरीही खूपच वाढली. त्यामुळे मराठी समाजजीवनावर खूप मानसिक ताण निर्माण झाले. परिणामतः महाराष्ट्राचे मन दुभंगले. महाराष्ट्राचे सामाजिक व राजकीय मनही उद्याचा अपेक्षित महाराष्ट्र घडविण्यासाठी समाजकारण व राजकारण एकत्रित आले पाहिजे. प्रामुख्याने तीन प्रश्नांची सोडवणूक करणे आवश्यक आहे. दारिद्र्य रेषेखालील करोडो लोकांच्या भाकरीचा प्रश्न, माणुसकीला नकार देणारा अस्पृश्यतेचा प्रश्न आणि लोकशाही मूल्यांच्या विरोधात उभा असलेला व सामाजिक विघटनाला जबाबदार असलेला जातीवादाचा प्रश्न. हे प्रश्न सोडविल्याशिवाय भारतीय लोकशाहीला उज्ज्वल भवितव्याची वाट सापडणार नाही.

नांव : डॉ. जे. एम्. वाघमारे

शिक्षण : एम्. ए., एल्एल्. एम्., पीएच्. डी.

जन्म : १९३४ साली. सामान्य शेतकरी कुटुंबात. लातुर, हैद्राबाद आणि पुणे येथे शिक्षण.

सध्या लातूर येथे राजर्षी शाहू महाविद्यालये प्राचार्य म्हणून काम करतात.

इंग्रजी भाषा आणि साहित्याचे नामवंत प्राध्यापक म्हणून २१ वर्षांची सेवा. श्री. छत्रपती शिवाजी कॉलेज, उमरगा, जि. उस्मानाबाद, डॉ. आंबेडकर कॉलेज औरंगाबाद आणि देवगिरी कॉलेज, औरंगाबाद या ठिकाणी अध्यापन कार्य त्यांनी केलेले आहे.

इंग्रजी, मराठी आणि हिंदीतील नामवंत वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्यिक विषयावर व्याख्याने दिलेली आहेत.

प्रतिष्ठान, लोकवाङमय, अस्मितादर्श, पूर्वा, समाजप्रबोधन पत्रिका, मनोहर, माणूस, मराठवाडा, क्वेस्ट इ. नियमकालिकातून त्यांचं लिखाण प्रसिद्ध झालेलं आहे.

‘अमेरिकन नीग्रो: साहित्य आणि संस्कृती’ हे त्यांचे पुस्तक १९७८ मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

‘The Problem of Identity in the Postwar American Negro Novel’ या विषयावरचा इंग्रजी साहित्यातला त्यांचा शोध प्रबंध मराठवाडा विद्यापीठाने १९८० साली पीएच्. डी. साठी मान्य केलेला आहे.

मराठवाडा विद्यापीठाच्या विधिसभा, विद्वतसभा, मानव्य विद्याशाखा, इंग्रजी अभ्यास समिती इ. मंडळाचे ते सभासद आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचेही ते सदस्य आहेत.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य, म. सा. प. लातूर शाखेचे अध्यक्ष, मराठवाडा विद्यापीठ प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष, विषमता निर्मूलन परिषदेचे अध्यक्ष, समाज प्रबोधन संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि इतर अनेक सामाजिक व शैक्षणिक संघटनांचे सदस्य या नात्याने ते काम करीत आहेत.