ब्रिटिशांनी या ठिकाणी आणलेल्या शिक्षण पद्धतीवर आपण कितीही कठोरतेने टीका केली तरी तिचे ऐतिहासिक महत्व कमी होणार नाही. मेकॉलेच्या शिक्षणविषयक टिपणाच्या आधारावर १८३५ सालीच ब्रिटिशांची या ठिकाणची शैक्षणिक आणि पर्यायाने सांस्कृतिक नीति निर्धारित झाली. राज्यकारभारासाठी त्यांना इंग्रजी जाणणा-या कारकुनांची आवश्यकता होती ही गोष्ट खरी असली तरी त्यांच्या शिक्षणपद्धतीने या ठिकाणी नुसते कारकुनच निर्माण केले नाहीत. कोणतेही शिक्षण नसते. मर्यादित अर्थाने ज्याला आपण शिक्षण म्हणतो. तेवढ्यापुरतेच ते मर्यादित नसते. ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये ते दिले जाते. त्याच्यावरच ते परिणाम करीत असेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्याला आपोआपच एक सामाजिक आशय प्राप्त होतो. ब्रिटिश अमदानीमध्ये ज्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी मिळू शकलं त्या प्रकारचं शिक्षण आमच्या देशात पूर्वी कधीही मिळालेलं नव्हतं. “स्कूल” नावाची संकल्पना व संस्था आमच्या देशात त्याकाळी अस्तित्वात नव्हती. “पाठशाला” आणि “मदरसे” येथे होते, नाही असे नाही. त्याठिकाणी एकीकडे केवळ धर्मग्रंथांचे अध्ययन-अध्यापन केलं जात होतं आणि दुसरीकडे केवळ व्यावहारिक पातळीवर उपयोगी पडणारं जुजबी शिक्षण दिलं जात होतं. पाठशाला ह्या मंदितार, धर्मशाळेत, मठात किंवा खाजगीमालकीच्या वाड्यात भरत असत. मदरसे हे दर्गा किंवा मशिदीच्या इमारतीत चालत असत. आमच्या देशात त्याकाळी दिलं जाणारं शिक्षण धार्मिक स्वरुपाचं किंवा मर्यादित अर्थानं निव्वळ व्यवहारी स्वरूपाचं होतं. जे होतं तेही सर्व समाजाला मिळत नव्हतं. सर्व जातीधर्मातील लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे हा विचार या ठिकाणच्या समाजव्यवस्थेला खरं तर मंजूरच नव्हता. शिक्षण हे राजकर्त्यांची जबाबदारी असते हा विचारही या ठिकाणी अस्तित्वात नव्हता. शिक्षणाचाच अभाव असल्यामुळे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा विचार आमच्या समाजव्यवस्थेच्या मनात येणे शक्यही नव्हते. आणि परंपरेने अनेक शतकांपासून चालत आलेला दैववाद किंवा कर्मवाद येथील जनमानसात एवढा खोलवर रुजला होता की त्याची पाळं-मुळं खणून काढणं शक्य नव्हतं. येथील बहुजन समाजाजवळ अज्ञान हीच जणू “अनंताची” ठेव होती. दारिद्र्य आणि अज्ञान हीच आमच्या संस्कृतीची उपलब्धी होती.
इंग्रजांनी जे शिक्षण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. त्यातून आम्हाला तीन महत्वाच्या गोष्टी प्राप्त झाल्या. त्या म्हणजेः इहवादी जीवनदृष्टी, सामाजिक समता आणि व्यक्तीस्वातंत्र्य. वस्तुतः या तिन्हीही गोष्टी आमच्या समाजिक किंवा सांस्कृतिक परंपरेतून पूर्णतः लोप पावल्या होत्या. भौतिक जीवनाचे प्रतिपादन करणारा लोकायती विचार या ठिकाणी फारसा विकसित होऊ शकला नव्हता. कुठल्याही समाजव्यवस्थेमध्ये भौतिकवादीदृष्टी ही स्वभावतःच एक विमोचक शक्ती म्हणून काम करीत असते. कारण ती दैववादी विचाराच्या विरोधात. उभी राहून माणसाच्या पुरुषार्थाला आव्हान देत असते. निसर्गावर आणि सभोवतालच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी व भौतिक जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी माणसाला व समाजाला ती प्रवृत्त करीत असते. अज्ञान व अंधपरंपरेत खोलवर रूतून बसलेल्या आजच्या समाजपुरुषाला इंग्रजी शिक्षणामुळे इहवादी दृष्टी प्राप्त झाली. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये भौतिकवादाला अनन्य साधारण मूल्य असल्यामुळेच पाश्चात्य देशांमध्ये भौतिकशास्त्रांचा विकास होऊ शकला आणि परिणामतः ते देश संपन्न व समृद्ध होऊ शकले ही गोष्ट अव्वल इंग्रजी अमदानीतच आमच्या लक्षात आली. इंग्रजांनी आमच्या देशात जी शिक्षणप्रणाली आणली तिने सामाजिक समता, सामाजिक न्याय व व्यक्तीस्वातंत्र्य या गोष्टीविषयीही आमच्या मनात नवीन जाणीवा निर्माण केल्या. स्त्री शूद्रांना सामाजिक विषमतेच्या बंदिवासात डांबून ठेवणा-या भारतीय समाजाला समता व स्वातंत्र्याची जाणीव झाली.
ब्रिटिश राज्यसत्तेला भारतात सार्वत्रिक शिक्षणाची उपलब्धता करून देता आली नाही ही वस्तुस्थिती आहे. तशी तिची इच्छाही नव्हती. पण जे काही शालेय शिक्षण ब्रिटिशांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिले ते उपयोगीच होते. ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी या ठिकाणी चालविलेल्या शाळा ख्रिश्चन धर्मप्रचारकाच्या व धर्मांतराच्या हेतूने जरी काढलेल्या होत्या तरी त्यांच्या कार्यामागची प्रेरणा ही मानवतावादी होती. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आमच्या समाज सुधारकांनी शिक्षण प्रसाराचे पवित्र कार्य हाती घेतले होते हे आम्हाला विसरता येणार नाही. त्याचा परिणाम केवळ साक्षरते पुरताच झाला नाही. त्याच्या आधाराने समाज सुधारणेची व सांस्कृतिक परिवर्तनाची मूळाक्षेही आम्हाला गिरवता आली. आणि मग थोड्याच काळात समाज सुधारणेची भाषा आम्हाला अवगत झाली.