व्याख्यानमाला-१९७६-३८

हिंदू संहिता १९२० साली संमत करून विधवा विवाह, व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक सुधारणा, वारसा हक्क, दत्तक घेण्याचे स्वातंत्र्य, आंतरजातीय विवाह यांना मान्यता देऊन त्यांनी भारतापुढे आदर्श मांडला. शाहूंनी नवीन हिंदू संहिता संमत करून १९२० साली जे नवीन समाजरचनेचे कार्य केले, ते स्वतंत्र भारतातील नेत्यांना १९५२ सालच्या सुमारास नवीन हिंदू संहिता मान्य करून केले. यावरून शाहूंच्या नव आणि दूर दृष्टीची थोरवी कळते. ज्या काळी टिळक आणि त्यांचे सहकारी ह्यांनी हिंदूंच्या नवसमाजरचनेला (सुधारणेला) विरोध केला, त्या काळी शाहूंनी हे कार्य केले. शि. म. परांजपे यांच्या सारख्यांनी विधवा विवाहाच्या प्रश्नाची आणि अस्पृश्यता निवारणेची टिंगलच केली आहे. शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांना सुधारक म्हटले म्हणून त्यांना त्या कळी अपमान वाटत असे.

कायद्यापुढे प्रत्येक हिंदू समान मानून छत्रपतींनी वरिष्ठ जातींच्य़ा सर्व क्षेत्रातील मक्तेदारीला जबरदस्त तडाखा दिला. गरिबांना व दलितांना आपला उत्कर्ष करण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले. कोल्हापूर संस्थानात अभूतपूर्व अशी क्रांती झाली महारकीची गुलामगिरी बंद झाली. छत्रपतींच्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारे, सरकारी डाक नेणारे हे अस्पृश्यांपैकी महारच असत. त्यांचा माहूत माहरच होता. महाराजांचा ड्रायव्हर यल्लाप्पा महारच होता. सरकारचे चाबुकस्वार व कोचनमन हेही महारच होते. महाराजांचे निकटचे पहारेकरी हेही महारच असत.

महाराजांचे शिकारीतील सोबतीही महारच होते. कँपमधील महालक्ष्मीची पूजा करणारा पुजारीही महारच असे. महार मांगांपैकी हुशार लोक शिक्षक झाले, वकील झाले, अधिकारी झाले, नगरपालिकेचे सभासद व अध्यक्षही झाले.

संस्थानातील अस्पृश्य मुलांना इतर स्पृश्य मुलांबरोबर शाळेच्या इमारतीत बसवू लागले. शाळा, सरकारी इमारती खाजगी उपयोगासाठी दिलेल्या नसल्यामुळे त्यांत अस्पृश्यांना तुच्छतेने वागविण्याचा कोणालाही हक्क नाही असा हुकूम निघाला. शिक्षण संस्थांतून गरीब व दलितांना समतेच्या पायावर वागणूक मिळाली पाहिजे अशी शाहूंची अंत:करणपूर्वक इच्छा होती. अनुदान मिळणा-या सर्व खाजगी व सरकारी शाळांत अस्पृश्यांना जास्ती ममतेने व आदराने वागवावे असा हुकूम काढण्यात आला. ज्यांना हुकूम मान्य नसेल त्यांनी सहा महिन्याचे आत आपला राजीनामा पाठवावा अशी घोषणा जाहीर झाली. सर्व सरकारी रुग्णालयांना आज्ञा देण्यात आली की, तेथील डॉक्टर्स, परिचारिकांनी व नोकरांनी स्पृश्य रुग्णांची जोपसना व रोग निदान करण्याचेवेळी अस्पृश्य लोकांना आत नेऊन त्यांची तपासणी व काळजी घेतली पाहिजे असे फर्मान निघाले.

राज्यातील महसूल न्यायखात्यातील अधिका-यानी अस्पृश्यांबरोबर प्रेमाने, ममतेने व समतेने वागले पाहिजे. ज्यांना हा हुकूम मान्य नसेल त्यांनी एक आठवड्याच्या आत राजीनामा द्यावा. सर्व सार्वजनिक इमारती, धर्मशाळा, विश्रांतीगृहे, सरकारी अन्नक्षेत्र, नदीचे पाणवठे, सार्वजनिक विहिरी येथे कोण्त्याही मनुष्याचा विटाळ मानावयचा नाही, अशी ही आज्ञा निघाली. महाराजांनी महार, मांग, रामोशी, बेरड या चार जातींची हजेरी बंद केली. ह्या समाजापैकी ज्यांना शिक्षा झाली होती त्यांनाच काही काळ हजेरी ठेवली. सर्व भारतात अशी नवसमाज रचना व्हावी की ज्यात सामाजिक असमता नाही. सामाजिक अन्याय होणार नाही, असे त्यांचे हे ध्येयधोरण होते.

एकदा असे घडले की, गंगाराम कांबळे नावाच्या गृहस्थाने कँपमधील विहिरीवरून पाणी घेतले म्हणून मराठ्यांनी त्याचेवर चोरीचा आळ घातला व त्याला खूप मारहाण केली. शाहू छत्रपती त्यावेळी दिल्लीत होते. ते परत आल्यावर कांबळेने आपल्या पाठीवरचे वळ महाराजांना दाखवले. ते पाहून छत्रपती संतापाने बेहोश झाले व ज्या मराठ्यांनी त्याला जनावराप्रमाणे मारले होते त्यांना बोलावून त्यांची शाहूंनी चाबकाने पाठ फोडली. हे उदाहरण लक्षात घेतले म्हणजे अन्याय करणा-याची ते जातपात ओळखत नसत असे यावरून स्पष्ट होते.

समाजसुधारकांच्या कार्यात व शाहू व फुले यांच्या कार्यात महत्त्वाचा फरक आहे. तो हा की, सुधारकांना माणसाची समानता हा प्रश्न कधीही धसास लावला नाही. तो प्रश्न शाहू व फुले यांनी धसास लावला. मानवाची समानता पारमार्थिक वा धार्मिक क्षेत्रात संतांनी समान मानली तरी माणसाची सामानता सामाजिक क्षेत्रात प्रस्थापित करण्याचे भानगडीत ते पडले नाहीत. मनुष्यधर्माने वागावे असे ते दयेच्या पोटी म्हणत असत. मनुष्य धर्म वा मानव धर्म हा शब्द आता गुळगुळीत झाला आहे. त्यामुळे काही वेळा लोकांची फसगत होते. आताची समाजरचना ही कोणाच्या दयेवर अवलंबून नाही, ती समान अधिकारावर अवलंबून आहे. आता मनुष्यधर्माने वागावे असे भोंगळपणे वा भूतदयेपोटी बोलून चालणार नाही. मानवाची प्रतिष्ठा, मानवाचे स्वातंत्र्य व मानवी समानता ही मान्य केली तरच खरा मनुष्य धर्म वा मानव धर्म पाळला गेला आहे असं समजले पाहिजे. मला जे हक्क आहेत ते माझ्या धर्म बांधवांना व देश बांधवांना मिळालेच पाहिजेत, असे शाहू छत्रपती व म. फुले यांचे तत्त्वज्ञान सांगते.