अमेरिकेसारखं राष्ट्र श्रीमंत असेल, फ्रान्ससारखं राष्ट्र श्रीमंत असेल, जर्मनीसारखं राष्ट्र श्रीमंत असेल पण श्रीमंतीच्या पलीकडे त्यांच्या मागे असलेली जी विकृती आहे. ती जोपर्यंत नाहीशी झालेली नाही, वसाहतवादावरती अजूनही त्यांना किती लोभ असतो, वर्णद्वेषामध्ये ते किती बरबटलेले आहेत आणि दुस-या राष्ट्रांमध्ये लक्षावधी टनांचे बाँब टाकताना ज्यांचे अंत:करण यत:किंचितही द्रवत नाही. – व्हिएतनामचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे. स्वातंत्र्याची केवळ एक दैदिप्यमान प्रेरणा, जागतल्या सर्वश्रेष्ठ, शस्त्र संपन्न अशा राष्ट्रापुढे नमू शकत नाही अशा प्रकाराचं उदाहरण असताना, जगाला एक उत्तम आदर्श घालून दिला बांगला देशाच्या संदर्भात भारतीय लोकांनी. एक कोटी अशा प्रकारचे निर्वासित आम्ही पोसले. आमचे लोक उपाशी राहिले. त्या बरोबर आमच्या राज्यकर्त्यांना, आमच्या या देशातील धुरीणांना दोषी धरण्यात आलं. आमच्या लोकांना उपाशी ठेवून दुस-याची पोट कशाला भरता ? ज्यांनी माणुसकीचा संदेश जगाला द्यायचा त्यांनी अमानुष बनावे, त्यांनी राक्षस बनावे अशा प्रकारची अपेक्षा सुध्दा ठेवणारे लोक या देशामध्ये होते. त्यामुळे आमची अर्थव्यवस्था कोसळली. आम्हांला प्रश्न निर्माण झाले. अन्नधान्याचे, वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराईचे. पण आम्ही माणुसाकीच्या आमच्या आमच्या प्राचीन परंपरेला जागलो. आणि जागपुढे एक मोठा आदर्श घालून दिला. इतका आदर्श घातला की त्या बांगलादेशामध्ये वैचारिक परंपरा न निर्माण झाल्यामुळे, म. गांधी आणि जावाहरलाल नेहरूंसारखं वैचारिक नेतृत्त्व न लाभल्यामुळे, अत्यंत हीन अशा प्रकारचं स्वरूप तेथील राजकारणाला आलं तर त्या राजकारणामध्ये सुध्दा नंतर आम्ही ढवळाढवळ केली नाही. नीहीतर बाकीच्या देशांचे इतिहास बघा. चिलीमध्ये कसं शिरता येईल क्यूबा मध्ये कसं शिरता येईल, कोरीयामध्ये कसं शिरता येईल, आफ्रिकेतल्या वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये कसं शिरता येईल. पाकिस्तानात कसं शिरता येईल, आणि भारतातसुध्दा कसं शिरता येईल. या उलाढाली मध्येच गुंतलेली ही साम्राज्यवादी राष्ट्रे लोकशाही समाजवाद वगैरे सगळ्या संकल्पनाचे बुरखे घेऊन वावरत असलेली पाहून आपल्याला आपण मागे आहोत या बद्दल दु:ख वाटून घेण्याचं काही कारण नाही. ऐहिकदृष्टया जरी आम्ही मागे असलो तरी नैतिक आणि धर्मभावनेच्या दृष्टीने आम्ही खरोखरच फार पुढे आहोत. आणि त्या मुळे बर्ट्रांडरसेल सारख्या तत्त्ववेत्त्याला, पाश्चात देशाला सांगावे लागले की तुमची आता भौतिक प्रगती पुरे झाली. तुमची विमाने आता पुरी झाली, तुमचे बाँब आता पुरे झाले. तुमच्या या भौतिकतेला आणि त्यातून नीतिमत्तेच्या -हासाला जर तुम्हाला खीळ घालायची असेल आणि नवा प्रकाश बघायचा असेल तर जरा पूर्वेकडे चला. बर्ट्रांड रसेल सारख्या तत्त्ववेत्त्याला असे सांगावं लागलं. आणि आजही तिकडचे तत्त्वज्ञानी भारताच्या तत्त्वज्ञानासंबंधी पुस्तके लिहितात आणि आवर्जून सांगतात की तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश हवा असेल, माणूसकीचा प्रकाश हवा असेल, निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर पूर्वेकडील आशियाई देशांकडे चला. आशियातील एक आशास्थान म्हणून भारताचं जे कर्तृत्त्व आहे हे या परिवर्तनाच्या दृष्टीने फार मोलाचं आहे असा विचार मी माझ्या भाषणाच्या प्रारंभीच मांडला होता. परिवर्तनाच्या दृष्टीने महत्त्वाचा विचार आहे. सगळ्या जगाची दृष्टी आमच्याकडे लागलेली आहे.
एक कसोटीचा दगड म्हणून. इथं लोकशाही घासली जाते. समाजवाद इथं घासला जातो व्यक्ति स्वातंत्र्य इथं घासलं जात आहे. धर्मनिरपेक्षता इथे घासली जात आहे. बाकीच्या देशांनी गुंडाळून ठेवलंय सगळं. फक्त शोभेसाठी म्हणून अक्षरांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये माणुसकीचा जिथे जिथे चक्काचूर करता येईल तिथे तिथे तो चक्काचूर करण्याचीच स्पर्धा लागलेली आहे. पण या देशामध्ये दारिद्र्य असताना, अज्ञान असताना, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा प्रकारच्या अनेक समस्या असताना सुध्दा हा प्रयोग यशस्वी करण्याची एक जिद्द आहे, सामान्य माणसामध्ये एक प्रकारचा त्याच्या बद्दल आत्मविश्वास आहे आणि म्हणून या प्रयोगाचं काय होणार आहे, याच्यातून काय निष्पन्न होणार आहे. याची काय फलश्रुती होणार आहे, याच्याकडे सगळया जगाचं लक्ष लागलेलं आहे. आमच्या राजकारणामध्ये सगळेजण लक्ष घालतात, रस घेतात, ते बिघडवण्याचाही प्रयोग करतात. सुधारण्याचाही प्रयत्न करणारे लोक आहेत. जगामध्ये आपल्याला मित्र नाही असे नाही इतके आम्ही दुबळे झालेलो नाही इतके एकाकी आज आपण पडलेलो नाही आफ्रिकेतील राष्ट्रे, मध्य आशियातील राष्ट्रे मोठया आशेने भारताकडे बघतात.