व्याख्यानमाला१९७३-७

व्याख्यान दुसरे - दिनांक : १३-३-१९७३

विषय- “ भारतीय समाजवाद कांही विचार ”

व्याख्याते - प्रा. मा. प. मंगुडकर, पुणे.

अध्यक्ष महाशय आणि मित्रहो, नामदार यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने आज ही व्याख्यानमाला सुरू होत आहे हे मी जेव्हा प्रथम ऐकले तेव्हा मला मनापासून आनंद झाला. त्याची दोन-तीन कारणे मी सांगू इच्छितो. माझी अशी प्रामाणिक ( इच्छा ) श्रध्दा आहे की नामदार यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनामधील ज्या प्रेरणा आहेत, ज्या प्रेरणांच्यामुळे त्यांचे सर्व जीवन घडविलेले आहे. त्या प्रेरणा मूलभूत अशा तीन प्रकारच्या आहेत. त्यांच्या जीवनाताल एक मध्यवर्ती महत्वाची प्रेरणा म्हणजे समाजामध्ये जो दुबळा घटक आहे, या घटकाबद्दलची अथांग सहानुमूती अंत:करणामध्ये असणे ही आहे. दुसरी प्रेरणा म्हणजे ज्ञानाबद्दल त्यांना विलक्षण आकर्षण आहे. आणि तिसरी प्रेरणा म्हणजे आपल्या कल्पनाप्रमाणें व श्रध्दांप्रमाणे केवळ समाजामधल्या घटनांचा अन्वयार्थ लावणे येवढाच त्यांचा प्रयत्न नसून, समाजजीवन आपल्या कल्पनाप्रमाणे व निष्ठाप्रमाणे बदलण्याची तीव्रतर इच्छा त्यांच्यापाशी आहे. या तीन प्रेरणांच्यामुळे त्यांचे जीवन मुख्यत: घडविलेले आहे. बट्रांड रसेल हा २० च्या शतकातला फार मोठा विचारवंत आहे. मी तर त्यांना २० च्या सॉकेटिसच मानतो. चांगल्या जीवनाची कल्पना मांडताना त्यांनी म्हटले आहे. “ Good life is one, which is inspired by love and guided by knowledge” ज्या जीवनामध्ये दीनदुबळ्याबद्दल अथांग प्रेम आहे, आणि जीवनाचे मार्गदर्शक ज्ञान ही आहे, ते जीवन चांगलं आहे, बर्ट्रांड रसेल यांच्या चांगल्या जीवनासंधंधीच्या कल्पनेचा एक चांगला, उत्तम आविष्कार म्हणजे नामदार यशवंतरावजीचे जीवन आहे. तिसरी गोष्ट मुख्यत: बर्ट्रांड रसेल व कार्ल मार्क्स या विचारवंतांबद्दलची आहे. त्यांनी असे सांगितले आहे की. ‘ Philosophers have interpreted the world problem. To change it.’ आतापर्यंत जगामध्ये जे मोठमोठे विचारवंत झाले ते केवळ जगाचा अन्वयार्थ लावण्यामध्येच मशगुल झालेले होते. मुख्य प्रश्न हा केवळ जगाचा अन्वयार्थ लावण्याचाच नाही तर आपल्या तत्त्वाने आपल्या कल्पनांप्रमाणे जग बदलू पहाणे हा महत्त्वाचा भाग आहे. या तीन मूलभूत प्रेरणांचा एक चांगला आविष्कार म्हणजे यशवंतरीवजी चव्हाण यांचे जीवन होय. या प्रेरणा घेऊन आपली ही व्याख्यानमाला सुरू केली आहे. नकळत आपण या व्याख्यानमालेव्दारे या मूल्यांची जोपासना करीत आहोत. आणखी एक गोष्ट सांगून मी नंतर माझ्या विषयाकडे वळतो. यशवंतरावजीच्या जीवनामध्ये मला आणखी एक गोष्ट दिसते ती ही आहे की समाजामध्ये सतत वेळोवेळी नव्या सामाजिक आणि आर्थिक शदक्तींचा उद्य होत असतो किमान समाजजीवनामध्ये हे अटळ असतं. त्या शक्तीचे स्वरूप समजावून घेणे व त्याप्रमाणे ध्येय धोरणात बदल करणे हे आवश्यक असतं.