यशवंतरावांनी आपल्या भाषणात, सरकारने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाचा उल्लेख केला. त्या अहवालात म्हटले होते की, देशात १ कोटी ४० लक्ष जनावरे अशी आहेत की, ज्यांचा उत्पादनाच्या दृष्टीने किंवा शेतीच्या दृष्टीने काही उपयोग नाही. त्यांच्यासाठी कडबा व इतर वस्तूंसाठी शंभर कोटी रुपये खर्च होतात. तेव्हा जे लोक गाई व इतर जानावरे पाळतात त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार महत्त्वाचा असल्याचे सांगत असताना, यशवंतरावांनी घटनेतील संबंधित कलमही आर्थिक बाजूचा विचार करूनच स्वीकारले गेले होते, हे स्पष्ट केले. जनसंघाने हे विधेयक ५३ साली मुंबई विधानसभेत आणले होते. जनसंघ हा स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारा असला तरी गाईच्या संबंधात त्याने सावरकरांचे विचार झुगारले होते. सावरकरांनी गाय ही माता नसून उपयुक्त प्राणी असल्याचे मत व्यक्त करणारा लेख लिहिला होता. जनसंघाने ५३ साली गोवधबंदीची मागणी करणारे विधेयक आणले असले तरी महाराष्ट्रात त्यावरून आंदोलन झाले नाही. नंतर पंधरा वर्षांनी मात्र उत्तरप्रदेशात ते झाले. दोन राज्यांतल्या सामाजिक परिस्थितीचा हा परिणाम म्हटला पाहिजे.
डिसेंबरच्या १७ तारखेला संत फतेसिंग यांनी चंदिगड पंजाबचीच राजधानी करावी आणि हरयाणात जे पंजाबी भाषी भाग असतील ते पंजाबमध्ये सामील करावेत या मागणीसाठी उपोषण सुरू केले आणि २७ तारखेपर्यंत या मागण्या अमान्य झाल्यास आत्मदहन करण्याचेही त्यांनी जाहीर केले. आणखी सात शिखांनीही तोच मार्ग पत्करला. मग फतेसिंग यांना काही आश्वासन देऊन उपोषण सोडण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी, जयप्रकाश नारायण इत्यादींचे प्रयत्न सुरू झाले. पण उपोषणाच्या धमकीमुळे यशवंतरावांनी वाटाघाटीस नकार दिला. तेव्हा लोकसभेचे सभापती सरदार हुकुमसिंग हे अमृतसरला गेले व त्यांनी फतेसिंग यांच्याबरोबर बोलणी सुरू केली. उपोषण थांबल्याशिवाय चौकशी आयोग नेमला जाणार नाही, असे यशवंतरावांनी हुकुमसिंग यांना स्पष्टपणे सांगितले होते. हुकुमसिंग यांच्या मध्यस्थीला यश येऊन, संत फेतेसिंग व इतर सात जणांचे उपोषण थांबले.
या पाठोपाठ दिल्लीतील पोलिसांच्या आंदोलनाचा प्रश्न उपस्थित झाला. किंबहुना, यशवंतराव गृहमंत्री होण्यापूर्वीच पोलिसांत असंतोष वाढत होता आणि त्यांच्यात काही शिस्त राहिली नव्हती. असंख्य पोलिस त्यांची कामे करत नव्हते आणि दिलेले आदेश पाळत नव्हते. पोलिसांच्या या असंतोषाचा फायदा लोहिया व त्यांचा संयुक्त समाजवादी पक्ष घेत होता. असंतोषाची परिणती पोलिसांचा मोर्चा यशवंतरावांच्या निवासास्थानाशी येण्यात झाली आणि ते घोषणा करत राहिले. मग यशवंतरावांनी त्यांच्यापुढे भाषण करून कामावर हजर राहण्यास सांगून, कोणालाही शिक्षा न करण्याचे आश्वासन दिले. पोलिस निघून गेले, पण पुढा-यांनी त्यांना आंदोलन चालवण्यासाठी चिथावणी दिली. यामुळे धोक्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसल्यावर, यशवंतरावांनी लष्कर बोलावले आणि आठशे पोलिस आंदोलकांना अटक झाली. मग शांतता प्रस्थापित झाली. त्यानंतर पोलिसांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येऊन काही मागण्या मंजूर झाल्या. या रीतीने यशवंतरावांनी गृमंत्रिपदाची सूत्रे घेतल्यानंतर महिनाभरातच एवढी संकटे उभी राहिली होती, पण त्यांनी ती यशस्वीपणे हाताळली.
या वातावरणात ६७ सालची सार्वत्रिक निवडणूक आली. इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध कामराज व इतर काही नेते एक झाले होते. काँग्रेसच्या मध्यवर्ती संघटनेतील दुही लोकांना दिसून आली होती. राज्य पातळीवरील अनेक मंत्रिमंडळे अंतर्गत भांडणे व भ्रष्टाचार यांमुळे लोकांच्या मनातून उतरलेली होती. त्यातच धान्याची तूट, महागाई इत्यादींचा परिणाम सत्ताधारी या नात्याने काँग्रेसला भोगावा लागणे अपरिहार्य होते. डॉ. लोहिया यांनी बिगर-काँग्रेसवादाचा आपला सिद्धान्त वा वेळी मांडला. ते सांगत होते त्याप्रमाणे काँग्रेसविरोधकांची युती झाली नाही, पण विरोधक अधिक संघटित होऊन निवडणुकीत उतरले होते. काँग्रेसचे काही नेते स्वतः किंवा आपल्या हस्तकांच्या करवी केंद्रांत काँग्रेसच्या हाती सत्ता राहील पण इंदिरा गांधी पंतप्रधानपदावर येणार नाही, असा प्रचार करत होते. मुंबईत याचा प्रत्यय येत होता. स. का. पाटील यांच्या गटातले काही, पाटील पंतप्रधान किंवा गृहमंत्री होणार आणि इंदिरा गांधी व यशवंतराव यांना निवृत्त व्हावे लागणार, अशी हवा तयार करत होते. मुंबईच्या काही वृत्तपत्रांत याचे अप्रत्यक्षपणे दर्शन होत होते. अशा वेळी यशवंतराव मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश यांच्या काही मतदारसंघांत प्रचारसभा घेऊन मुंबईत आले असता मी त्यांची भेट घेतली होती. मुलाखतीला प्रसिद्धी द्यायची नाही, अशी त्यांची अट होती. त्यांनी सांगितले की, उत्तर भारतात काँग्रेसची परिस्थिती कठीण झाली असून काही राज्यांत काँग्रेसची मंत्रिमंडळे येतील की नाही, याची शंका आहे. केंद्रात काँग्रेसला सरकार स्थापन करता येईल, पण लोकसभेतील जागा ब-याच कमी होती. याचा परिणाम इंदिरा गांधी व तुम्ही यांची सत्तास्थाने जाण्यात होईल काय? असे विचारले असता यशवंतरावा म्हणाले की, मुंबईतून पसरलेल्या बातम्यांवर विसंबणे बरोबर नाही. निवडणुकींतर पराभव झाल्यामुळे काँग्रेसच्या जुन्या नेत्यांच्या विरुद्ध वातावरण तापेल, आणि काँग्रेस पक्षात या नेत्यांवर टीकास्त्र सुटून त्यांचे आसन डळमळीत होईल. यशवंतरांचे हे निदान अचूक ठरले.