शास्त्री मंत्रिमंडळाचे काम सुरू झाल्यावर यशवंतरावांनी अमेरिकेच्या भेटीबाबतचा तयार केलेला अहवाल नव्या पंतप्रधानांनी वाचला. यशवंतरावांची इंग्लंडची भेट ठरली होती. पण लालबहादूर शास्त्री यांनी त्या अगोदर रशियाला भेट देण्याची सूचना केली. त्याप्रमाणे यशवंतराव आपल्या खात्याच्या शिष्टमंडळाला घेऊन ऑगस्टमध्ये मॉस्कोला रवाना झाले. या वेळी त्यांच्याबरोबर वेणुताईही होत्या. मॉस्कोला पोचल्याचा दुसरा दिवस रविवार असल्यामुळे अधिकृत कार्यक्रम नव्हता. तेव्हा टॉलस्टॉयचे स्मारक बघण्याची इच्छा यशवंतरावांनी व्यक्त करावी हे त्यांच्या साहित्यप्रेमामुळे साहजिक होते. टॉलस्टॉयचे स्मारक व त्यांची समाधी पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. त्याच वेळी चेकॉव्हचेही स्मारक त्यांनी पाहिले. नंतरच्या काळात यशवंतरावांनी अनेक देशांना भेटी दिल्या तेव्हा तिथल्या साहित्यिक, कलावंत इत्यादींची स्मारके पाहण्यावर त्यांनी कटाक्ष ठेवलेला दिसेल. ते हॉलंडला गेले तेव्हा प्रख्यात परीकथा लेखक हॅन्स ख्रिश्चन अँन्डरसन याचे स्मारक त्यांनी पाहिले. तर फ्रॅन्कफर्ट इथे जर्मन कवी, नाटककार गटे याचा जन्म जिथे झाला ते घर पाहण्यास ते विसरले नाहीत. लंडनला गेल्यावर शेक्सपिअरच्या जन्मगावी जाऊन त्यांनी त्याच्या रिचर्ड द थर्ड या नाटकाचा प्रयोग पाहिला व तो अप्रतिम झाल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे.
सोव्हिएत युनियनचे संरक्षणमंत्री मार्शल मॅलिनॉव्हस्की व त्यांचे अधिकारी यांच्याबरोबर संरक्षणसाहित्य व भारतातील उत्पादनाची शक्यता या संबंधीची बोलणी सुरू झाली. ती चार-दिवस चालली. नंतर लेनिनग्राड व व्होल्गोग्राड म्हणजे जुने स्टालिनग्राड इत्यादी शहरातल्या युद्धस्मारकांना भेटी झाल्या. ९ सप्टेंबर रोजी सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष निकिता क्रुश्चॉव यांची भेट झाली. भारतास जी शस्त्रास्त्रे हवी होती ती रशिया देण्यास तयार असल्याचे मॅलिनॉव्हस्की यांनी सांगितलेच होते. पण यासाठी रशिया देऊ करत असलेल्या कर्जाची मुदत रशियाने सुचवली होती; त्यापेक्षा अधिक मुदतीची करण्याची यशवंतरावांनी मागणी केली होती. क्रुश्चॉव यांनी यातला सुवर्णमध्य काढून मुदत वाढवण्याचे मान्य केले. यामुळे एक मोठा प्रश्न सुटला. थोड्याच अवधीत क्रुश्चॉव यांना त्यांचे पद सोडावे लागले. त्यापूर्वीच भारताबरोबर करार झाला ही चांगली गोष्ट झाली.
रशियानंतर यशवंतरावांनी ब्रिटिश सरकारशी संरक्षणसाहित्याची मदत मिळवण्यासाठी इंग्लंडला ११ नोव्हेंबरपासून भेट दिली. मजूर पक्ष नुकताच सत्तेवर आला होता. पण त्यामुळे भारतास विशेष अनुकूल वातावरण निर्माण झाले नव्हते. यशवंतराव व पंतप्रधान हॅलॉल्ड विल्सन यांची भेट झाली. भारतास नौदलाची सुधारणा करायची होती. यासाठी जुन्या विनाशिका, पाणबुड्या इत्यादीची मागणी करण्यात आली होती. पण ब्रिटनचे संरक्षण खाते आणि स्वतः पंतप्रधान राजी नव्हते. एकंदरीत ही भेट यशस्वी झाली नाही. यशवंतरावांची पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांच्याशी बोलणी झाली तेव्हा आपले उच्चायुक्त जीवराज मेहता हेही त्यांच्याबरोबर होते. विल्सन यांनी जेव्हा विनाशिका, पाणबुड्या वगैरे देऊन भारतीय नैदल बळकट करण्याचे नाकारले तेव्हा जीवराज मेहता यांनी त्यांना, ते विरोधी पक्षाचे नेते असताना काय म्हणाले होते याची आठवण करून दिली. विल्सन तेव्हा म्हणाले होते की, आमच्या व हिमालयाच्या सीमा एकच आहेत. त्यावर विल्सन यांनी उत्तर दिले की, त्या वेळी मी तसे म्हणालो खरा, पण हिमालयाच्या संरक्षणासाठी तुम्हांला पाणबुड्या हव्यात, हे मला माहीत नव्हते. हे उपहासात्मक उत्तर जीवराज व आपल्याला अपेक्षित नव्हते असे जयंत लेले यांना दिलेल्या मुलाखतीत यशवंतराव म्हणाले. त्यांनी मग अशी ही पुस्ती जोडली की, पाश्चात्त्य लोकशाही देश भारताच्या प्रतिनिधीशी कसे वागत हे यावरून दिसून येऊ शकते. यशवंतराव असेही म्हणाले की, या मानाने अमेरिकनांचे वागणे अधिक बरे व मोकळेपणाचे होते. ते आपल्याजवळची सर्व माहिती मांडून मग आपले निष्कर्ष सांगत. ही माहिती व निष्कर्ष कदाचित चुकीचेही असतील. पण ते आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देत, नुसते ‘हो’, वा ‘नाही’, म्हणत नसत. ब्रिटन व अमेरिका यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे सोव्हिएत युनियनवर अवलंबून राहण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नाही.
भारतास या प्रकारच्या भूमिकेची कल्पना असल्यामुळे निराश होण्याचे कारण नव्हते. काही अवधीनंतर मात्र ब्रिटिश कंपन्यांनी भारतातच आधुनिक लढाऊ बोटी बांधल्या व अद्ययावत फ्रिगेटही बांधून दिली. पण ती मदत नव्हती; तर कंत्राट घेऊन हे काम केले गेले. यशवंतरावांना अँटली यांची जीवनकहाणी चांगली माहीत होती. आणि भारतात सत्तांतर करण्याचा निर्णय घेऊन अमलात आणणारे अँटलीच असल्यामुळे, त्यांच्यासंबंधी यशवंतरावांना आदर होता. अँटली यांच्या उपस्थितीबद्दल यशवंतराव नंतरी कौतुकाने बोलत असत. या मुक्कामात यशवंतरावांनी संरक्षणसाहित्याचे उत्पादन करणारे काही कारखानेही पाहिले.