यशवंतरावांना या सुमारास कानपूरपासून अनेक ठिकाणांहून भाषणासाठी आमंत्रणे येऊ लागली होती. ती त्यांनी टाळली. मग ते व नेहरू दोघेही लडाख व आसाम लष्करी ठाण्यांच्या भेटीवर एकत्र गेले नेहरूंनी यशवंतरावांना सांगितले, की देशातल्या इतर ठाण्यांना भेट देऊन माहिती करून घ्या. तथापि मंत्रिमंडळाच्या आणीबाणीच्या उपसमितीपुढे तातडीच्या शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी अमेरिकेला एक मंडळ पाठवण्याचा विषय आला नेहरू यशवंतरावांना म्हणाले की, तुम्ही इथेच राहा व कृष्णम्माचारी यांना जाऊ दे. यशवंतराव यांच्या मनात पुन्हा एकदा शंका आली, पण त्यांना लगेच होकार दिला. लष्कराच्या तिन्हि दलांत नव्या संरक्षणमंत्र्यांच्या कारभाराबद्दल व वर्तनपद्धतीबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण होत होते. संसदेत त्यांना भक्कम पाठिंबा मिळत होता. नेहरूंनाही कळून आले की, लष्कराचा कारभार सुधारत आहे आणि त्याचे नितिधैर्य वाढले आहे. संरक्षणविषयक उत्पादन प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू झाल्यावर, पुन्हा एकदा पटनाईक यांचा अडसर तापदायक ठरणार असे वाटू लागले होते. त्यात मिग विमानांच्या उत्पादनाचा कारखाना हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता. पटनाईक यांनी तो ओरिसात नेण्यासाठी खटपट केली होती. ओरिसाच्या मागास भागात असा अधुनिक कारखाना काढला तर आवश्यक तो कुशल कामगारांचा व तंत्रज्ञांचा वर्ग उपलब्ध होणार नाही, असे संरक्षण खत्यातल्या तज्ज्ञांचे मत होते. मग यशवंतरावांनी जे. आर. डी. टाटा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. तिने सर्व तपसणी करून नाशिक इथे विमानाच्या सर्व भागांचे व उपकरणांचे उत्पादन करण्याची शिफारस केली. तरीही यशवंतरावांनी त्याचे इंजिन बनवण्याचा कारखाना ओरिसात कोरपूट इथे काढण्याचा आणि बाकीचे उत्पादन नाशिकला करण्याचा निर्णय घेतला. पटनाईक यांना हे आवडले नाही व त्यांनी नेहरूंकडे तक्रार केली. नेहरूंनी टाटा समिताच्या अहवालाचा हवाला दिला आणि सर्व भाग नाशिकला बनवण्याची शिफारस असताना, यशवंतरावांनी इंजिन कोरापूटला तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे पटनाईक यांच्या निदर्शनास आणले.
मुख्यमंत्री असतानाच अधिकारीवर्गाचा विश्वास संपादन करण्यात यशवंतराव यशस्वी झाले होते.
विश्वास द्यावा व घ्यावा असे त्यांचे सूत्र होते. हेच संरक्षणमंत्रिपदावर आल्यानंतर उपयोगी पडले. राम प्रधान डिबॅकल टु रिव्हायव्हल या पुस्तकात संरक्षण खात्यात निरनिराळ्या अधिका-यांच्या संबंधात यशवंतरावांनी स्वीकारलेले धोरण कसे यशस्वी झाले, याची उदाहरणेच दिली आहे. लष्करप्रमुख जनरल जे. एन. चौधरी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात यशवंतरावांकडे फायली गेल्यावर त्याबद्दल निर्णय घेण्यासाठी व त्यांवर सही करण्यासाठी ते विलंब लावत नसत व खळखळ करत नसत, असा अनुभव नमूद केला आहे. वेल्स् हॅन्गन या अमेरिकन लेखकाने आफ्टर नेहरू हू? असे पुस्तक ६२ साली प्रसिद्ध केले. त्यात त्याने यशवंतरावांच्या कामाचा झपाटा वर्णन केला आहे आणि म्हटले आहे की, आपल्या अधिका-यांकडून ते जितके काम करून घेण्यात यशस्वी झाले आहेत तितके दुसरे कोणी झाले नसेल. हे अधिकारी अधिक काम पडते अशी तक्रारही कधी करत नसत. माधवराव गोडबोले यांनी अपुरा डाव या त्यांच्या आठवणींच्या पुस्तकात म्हटले आहे की, यशवंतरावांचे कार्यालयातील टेबल नेहमी स्वच्छ असे. कारण संध्याकाळपर्यंतच्या फायली रात्री घरी वाचून त्यावर शेरे मारून, त्या दुस-या दिवशी सकाळी परत येत. एक दिवस त्या परत न आल्यामुळे गोडबोले यांना वाटले, यशवंतरावांची प्रकृती बरी नसावी. म्हणून चौकशी केली तेव्हा यशवंतराव म्हणाले, ना. सी. फडके यांनी त्यांचे आत्मचरित्र धाडले होते व त्यावर मत देण्याची विनंती केली होती. त्यामुळे रात्री बराच वेळ ते वाचण्यात गेला. हे अर्थात अपवादात्मक. काही अधिकारी तर आपण यशवंतरावांचे कुटुंबीय आहोत असे मानत. यांत राम प्रधान, माधवराव गोडबोले, शरद काळे, शरद उपासनी इत्यादींचा समावेश होतो. श्रीपाद डोंगरे हे त्यांच्या घरातल्यासारखेच होते. अशी इतरही नावे घेता येतील. गोडबोले यांच्या आठवणींच्या पुस्तकाच्या एका प्रकरणाचा मथळाच मुळी “माझे दुसरे घर’ असा आहे.
यशवंतरावांच्या या कार्यपद्धतीमुळे संरक्षण खात्याच्या सर्व थरांत नवे वारे निर्माण झाले तर ते साहजिक होते. मुख्यत: मेनन यांच्या कारकिर्दितील संशय, गटबाजी, आणि विनाकारण गुप्तता हे संपुष्टांत आले आणि सर्वांनाच मोकळे वाटू लागले. तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांची रोज सकाळी होणारी बैठक अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यास उपयुक्त ठरत असल्याचे प्रत्ययास येत होते. याच सुमारास खात्याच्या मागण्या लोकसभेत चर्चेला येणार होत्या आणि त्यासंबंधीचे यशवंतरावांचे भाषण हे लोकसभेतील त्यांचे पहिले भाषण होते. परीक्षेला जावे तशी आपण यासाठी तयारी केल्याचे यशवंतरावांनी सांगितले. लोकसभेत जाण्यापूर्वी नेहरूंचा फोन आला आणि पहिलेच भाषण असल्यामुळे आपण शुभेच्छा देत असल्याचे ते म्हणाले, आणि प्रत्यक्ष या भाषणाच्या वेळी ते हजर होते. यशवंतरावांची संसंदेतील भाषणे चार खंडांत प्रसिद्ध झाली आहेत. हे पहिले, तसेच इतर भाषणे वाचल्यावर पहिल्या प्रथम जाणवते ते हे की, त्यांत कोणतीही लपवाछपवी नाही. देशाच्या संरक्षणाची जी अवस्था होती, ती सभागृहाकडे ठेवण्यात काही कसूर होत आहे असे वाटण्यासारखे काही नव्हते. नंतरच्या भाषणांबद्दलही हेच म्हणता येईल. तरीही यशवंतरावांनी लेले यांच्याजवळ बोलताना सांगितले की, आपण रज्यपातळीवरील राजकीय जीवनातून आल्यामुळे लोकसभेत भाषण करताना आपल्याला संपूर्ण विश्वास वाटत नसे. शिवाय या पहिल्या भाषणाच्या आधी लोकसभेतील प्रश्नास उत्तर देताना यशवंतरावांकडून एका इंग्रजी शब्दाच्या उच्चारात चूक झाल्यामुळे सभागृहात हशा पिकला होता. त्यामुळेही त्यांना अवघडल्यासारखे वाटत असेल. पण नंतर हे सर्व मागे पडले आणि त्यांच्या भाषणात धिटाई दिसू लागली. शिवाय त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांत चांगल्यापैकी भाषण करता यावे या दृष्टीने खास प्रयत्न सुरु केले.