बेचाळीस सालचे आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन यामुळे प्रजासमाजवादी पक्षात अनेकजण राहिले होते. पण स्वातंत्र्य आले आणि संयुक्त महाराष्ट्र नंतर आला तेव्हा प्रजासमाजवादी पक्षातल्या काही जणांना काँग्रेस पक्षात सामील व्हावेसे वाटले. या पक्षातही दुफळी माजण्याचे प्रकार अगोदरपासून घडले होते. यामुळे काही जण कम्युनिस्ट पक्षात गेले. दुसरी दुफळी पडली तेव्हा डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली वेगळा पक्ष स्थापन झाला. यावरून हे दिसून येईल की, शे. का. पक्ष व प्रजासमाजवादी या दोन्ही पक्षांची फुटीची परंपरा जुनी होती. त्या मानाने कम्युनिस्ट आणि जनसंघ यांच्यात फाटाफूट होऊन काँग्रेसचा आश्रय घेणा-यांची संख्या दुर्लक्षित करावी अशी होती. शे. का. व प्रजासमाजवादी या दोन पक्षांतच ही फाटाफूट कां झाली व त्यांतले काही जण काँग्रेसमध्ये कां दाखल झाले, याची चिकित्सा करणे अधिक युक्त होईल. तसेच प्रजासमाजवादी पक्षातले जे कम्युनिस्ट पक्षात गेले त्यांच्याबद्दल टीकेचा सूर न निघण्याचे कारण शोधायला हवे. बरे, काँग्रेसमध्ये शे. का. पक्षातून आलेल्या बहुतेकांना मंत्रिपदे मिळाली असेही म्हणता येणार नाही. यशवंतराव मोहिते काही वर्षे राज्यमंत्रीच राहिले होते. समाजवाद्यांपैकी विठ्ठलराव गाडगीळ यांना मंत्रिपद काही वर्षांनी मिळाले व तेही केंद्रात. शिवाजीराव पाटील यांना महाराष्ट्रात राज्यमंत्रिपद मिळण्यास काही वर्षे लागली.
मराठा समाज बळकट करण्याचे यशवंतरावांचे प्रयत्न या पक्षांतराच्या मागे होते असे म्हणताना, राजकीय वास्तवाचा विचार केला पाहिजे. काँग्रेसमध्ये शे. का. पक्षातून बरेच जण आले, ते मराठा होते हे खरे. पण त्या पक्षातच मराठा लोकांचा मुख्य भरणा होता. प्रजासमाजवादी पक्षातून काँग्रेसकडे वळलेल्यांत काही मराठा होते. या स्थितीत मराठा समाजाचा आपला पाया मजबूत करण्यासाठी खास प्रयत्न यशवंतरावांनी केले हे विधान अतिव्याप्त म्हटले पाहिजे. शिवाय महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या जागृत व सक्रिय झालेल्या बहुजनसमाजातील मराठा लोकांची संख्या अधिक होती. तेव्हा त्यांचा भरणा काँग्रेसमध्ये अधिक होणे हे तेव्हा साहजिक होते. नंतरच्या काळात काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली तेव्हाही मराठा आमदार, खासदारांची संख्या अधिक होती, कारण तेच राजकारणात अधिक प्रमाणात होते. तथापि आता महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती बदलत आहे. ज्यांना इतर मागासलेल्या जाती म्हणतात, त्यांच्यात राजकीय जागृती होत असून तेही सत्तेत भागीदार होऊ पाहत आहेत. शिवाय दलितही जागृत आहेत. ते संघटित मात्र नाहीत. अशा वेळी स्वातंत्र्योत्तर काळात शंकरराव देव इत्यादींनी दूरदृष्टी दाखवली नाही तशी आता मराठा नेतृत्वाने इतर मागास जाती व दलित यांच्याबद्दल न दाखवून चूक करू नये.
राज्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्यात यशवंतराव यशस्वी होऊ लागले असताना, ६१ साली भावनगर इथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळी कार्यकारिणीच्या काही जागा मतदानाने भरायच्या होत्या, त्यांत यशवंतरावांना दुस-या क्रमांकाची मते मिळाली तर इंदिरा गांधी पहिल्या क्रमांकावर होत्या. या विजयामुळे अखिल भारतीय काँग्रेस संघटनेच्या पातळीवर यशवंतरावांना स्थान प्राप्त झाले. पुढील काळात ते काँग्रेसच्या संसदीय मंडळाचे (पार्लमेंटरी बोर्डाचे) सभासद म्हणून नियुक्त झाले. हे मंडळ लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करत होते.
काँग्रेस पक्षात यशवंतराव या प्रकारे एकेक पायरी वर चढत असताना, ६२ सालच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला अभूतपूर्व विजय मिळाला. विधानसभेच्या २६५ जागांपैकी काँग्रेसला २१४ जागा मिळाल्या. निवडणुकीच्या प्रचाराच्या बाबतीत यशवंतरावांनी नवा पायंडा पाडला. त्यांनी एक प्रचारसमिती स्थापन केली. तिने उमेदवार व तिचे प्रचारक यांना उपयोगी पडतील अशा लहान लहान पुस्तिका तयार केल्या. तसेच महाबळेश्वर इथे कार्यकर्त्यांचे शिबिर घेऊन प्रचाराची दिशा ठरवण्यात आली. हे सर्व वेगळे होते. प्रचारसमितीची मुख्य जबाबदारी भाऊसाहेब नेवाळकर यांच्याकडे होती तर कलापथकासाठी ग. दि. माडगूळकर यांनी कवने केली. शिबिरांची ही कल्पना यशवंतरावांच्या पक्ष घडवण्याच्या विचारांची निदर्शक होती. कार्यकर्त्यांनी केवळ नेत्यांच्या जयजयकारावर न भागवता, लोकांपुढील प्रश्नांची चर्चा प्रचारात करावी हा हेतू होता. या शिबिरात उत्सवीपणाला रजा दिलेली असे. कार्यकर्त्यांना मन मोकळे करून बोलण्याची मुभा होती आणि त्यांच्या प्रश्नांना यशवंतराव, त्यांचे मंत्री व काही नेते उत्तरे देत. केवळ शिबिरातच नव्हे, तर यशवंतरावांच्या दौ-यातही कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अनेकदा प्रश्नोत्तराचा वा शंकासमाधानाचा कार्यक्रम होई. सातारा, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांतले अनेक कार्यकर्ते खोचक व मर्मभेदक प्रश्न विचारण्यात तरबेज होते. मेळाव्यातील त्यांचे प्रश्न व यशवंतरावांची उत्तरे हे सर्वच ऐकण्यासारखे असे.