आर्थिक विषयावरील ठराव तडजोड होऊन कार्यकारिणीने एकमताने संमत केला असला, तरी राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या बाबतीत मतभेद झाले. जगजीवन राम व संजीव रेड्डी यांतून निवड करायची होती. यापैकी जगजीवन राम यांच्या बाजूने इंदिरा गांधी व फकरुद्दिन यांनी मत दिले तर बाकीच्या पाचांनी रेड्डी यांची निवड केली. बाबूजी स्वतःचे नाव असल्यामुळे तटस्थ राहिले. त्यांचे नाव इंदिरा गांधींनी सुचवले होते. सकाळच्या ठरावाच्या चर्चेत वेळ गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या आपल्या सहका-यांशी चर्चा करण्यासाठी, यशवंतराव मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भेटले आणि मग महासमितीतील सहका-यांशी त्यांनी चर्चा केली. आता उशीर झाला असून रेड्डी यांच्या ऐवजी दुस-यास मत देणे शक्य नाही, असे मत पडले. तुम्ही ठरवले ते आम्हांला मान्य असल्याचे सर्वांनी यशवंतारवांना सांगितले. एकदंर रागरंग पाहता निवड सहज रीतीने होणार नसल्याची अटकळ आल्यामुळे, यशवंतरावांनी फकरुद्दिन यांना इंदिरा गांधींशी बोलून बैठक लांबणीवर टाकण्याचे प्रयत्न करावे असे सुचवले. मग इंदिरा गांधींनी यशवंतरावांना बोलावून घेतले. त्यांनी विचारले की तुम्ही रेड्डींना मत देणार आहांत, हे खरे काय? यशवंतराव म्हणाले, खरे आहे. कारण रेड्डी आपल्याकडे आले होते व तुम्ही त्यांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मग मी त्यांना होकार दिला. तथापि आजची बैठक पुढे ढकलण्याची कल्पना फकरूद्दिन यांच्यातर्फे तुम्हाला सुचवली होती. पण इंदिरा गांधी म्हणाल्या, आपण अशी सूचना अध्यक्षांना करणार नाही. वाटल्यास तुम्हीच ती करा. यास यशवंतरावांनी नकार दिला आणि तिथेच निकाल कसा लागणार हे स्पष्ट झाले.
यानंतरचे यशवंतरावांचे विवेचन लेले यांना दिलेल्या मुलाखतीत आहे. यशवंतरावांचे म्हणणे असे होते की, इंदिरा गांधींनी प्रथमच जगजीवन राम यांची उमेदवारी, कार्यकारिणीतील समतोल बिघडतो म्हणून अमान्य केली. मग आयत्या वेळी त्यांनी मत बदलले. आपल्याला हवे त्याप्रमाणे लोकांनाही मत बदलायला लावण्याची त्यांची सवय आहे आणि हे आपल्याला मान्य नव्हते. आपल्या मतामुळे संसदीय मंडळातील मतदानाचे पारडे कोणत्या बाजूस फिरणार हे अवलंबून होते. तथापि पंतप्रधानांना हटवण्यासाठी एक गट तयार झाला होता व आपण त्यात सामील झालो अशातला काही भाग नव्हता. मोरारजीभाईंनीही असा गट नव्हता व काही कट केलेला नव्हता, अशीच ग्वाही दिली आणि यशवंतरावांना ते मान्य होते.
जगजीवन राम मंत्रिपद सोडण्यास कसे तयार झाले, या प्रश्नावर यशवंतरावाचं मत असे की, ही एक खेळी होती. पुन्हा जर राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार निवडण्याची वेळ आली तर इंदिरा गांधी जगजीवन राम यांचे नाव सुचवणार नाहीत. हे मात्र खरे की, आपल्या विरुद्ध काहीजण खटपट करत आहेत अशी इंदिरा गांधींची भावना झाली होती. यशवंतरावांनी मग अशीही पुस्ती जोडली की, आपल्या विरुद्धही वाटेल त्या वावड्या उठवण्यात आल्या होत्या. एक अशी की, मोरारजी व आपण यांच्यात असे ठरले होते की, इंदिरा गांधींना दूर करून मोरारजींनी पंतप्रधान व आपण उपपंतप्रधान व्हायचे. हे पूर्णतः खोटे होते. उपपंतप्रधानपदाला कितपत किंमत आहे हे आपण जाणत होतो. तुम्ही इंदिरा गांधींच्या संबंधात नाराज असल्यामुळे मोरारजीभाईंना तुम्ही काही संकेत दिल्याची माहिती मोरारजींनी दिली आहे, ती कितपत खरी? या लेले यांच्या प्रश्नांसंबंधी यशवंतरावांचा खुलासा असा की, असे काही संकेत दिले नाहीत. उरळी कांचनचे मणिभाई देसाई आपले मित्र आहेत. ते गांधीवादी असून उत्तम विधायक काम करतात. त्यांच्याबद्दल आपल्याला आदर असून आम्ही भेटलो, की अनेक विषयांवर चर्चा करतो, पण राजकारणाची चर्चा केली नाही. वसंतराव नाईक यांची गोष्ट वेगळी. आम्ही राजकीय चर्चा करतो. पण मोरारजीभाईंना संकेत पाठवण्याचे कारण नव्हते. एक गोष्ट झाली ती ही की, संसदभवनात आमच्या कचे-या लगत होत्या. मोरारजीभाईंची तक्रार अशी होती की, आपण त्यांना नमस्कार वगैरे करत नाही. आम्ही सरकारी कामाच्या निमित्ताने दिवसांतून अनेकदा भेटत असल्यामुळे सकाळी नमस्कार वगैरे म्हणजे आपल्याला औपचारिक वाटत होते. पण यामुळे मोरारजीभाई नाराज आहेत असे समजल्यावर, आपण रोज सकाळी भेट झाली की ‘नमस्कार’ असे म्हणू लागलो. मग ते आपल्या कचेरीत येत किंवा वेळ असल्यास भेटा म्हणून सांगत. या भेटीत कामाबद्दल बोलणी होत; काही वेळा एखादी गोष्ट आवडली नाही तर ती आम्ही बोलून दाखवत होतो. पण इंदिरा गांधींविरुद्ध कट करण्याचे मनात नव्हते, असे यशवंतरावांनी निक्षून सांगितले.