वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाची सभा कोल्हापुरात यशवंतरावांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या सभेतील त्यांचे भाषण त्यांच्या रसिकतेचे व मर्मज्ञतेचे निदर्शक आहे. यशवंतराव यांच्या भाषणात म्हणाले, “भाऊसाहेबांच्या नायकाने एखाद्या तरुणीच्या उजव्या गालावरची खळी पाहिली, म्हणजे आपण लहान असताना तळ्यात खडा मारल्यानंतर पाण्यात जे भोवरे फिरत-फिरत जातात, त्यांची त्यास आठवण व्हायची. भाऊसाहेबांचे वाङ्मय वाचायला घेतले, म्हणजे बीजेची कोर आली नाही किंवा चांदणे आले नाही, असे कधी व्हायचे नाही. भाऊसाहेबांच्या वाङ्मयात निदान मी कधी अमावास्या पाहिली नाही. ती बीजेची कोर असेल किंवा चवथीचा चांद असेल किंवा अष्टमीचा चंद्रमा असेल किंवा पुनवेचा चांद असेल. असा हा चांदण्याचा लेखक आहे. प्रकाशाचा लेखक आहे. पण नुसता सहृद्य लेखक नाही. तर भाऊसाहेबांच्या लेखामध्ये स्वप्नाळू सहृद्यतेबरोबर निर्धारित क्रियाशीलताही आहे.”
यशवंतरावांची वाचनाची एक पद्धती होती. पुस्तक हाती घेतल्यावर ते पुढून मागून चाळत असत. मग मन लावून वाचत. ते करताना महत्त्वाच्या वाटलेल्या भागावर खुणा केल्या जात व काही वेळा शेरा मारला जाई. एखादा भाग शैली वा विचार दृष्टीने विशेष आवडला तर ते ख-या ग्रंथप्रेमीप्रमाणे स्वत:शीच मोठ्याने वाचत. राजसंन्यास, भाऊसाहेबाची बखर इत्यादींचे कित्येक भाग त्यांना पाठ होते. ही अशी पुस्तके असोत की, मालकम मगरीज, केनान इत्यादींची पुस्तके असोत त्यासंबंधी बोलण्यात आमचा बराच वेळ गेला आहे. रॉय जेन्किन्स हे यशवंतरावांचे आणखी एक आवडते लेखक. ते मजूर मंत्रिमंडळात मंत्री होते. नंतर मतभेदामुळे पक्षांतून बाहेर पडले. ते एक विचारगर्भ व शैलीदार लिखाण करणारे लेखक होते. त्यांच्या लिखाणाचे चाहते म्हणून यशवंतराव लंडनच्या मुक्कामात त्यांना मुद्दाम भेटायला गेले होते.
परदेश प्रवासात काम संपले की, पुस्तके खरेदी करावी, प्रेक्षणीय स्थळे पाहावी आणि नाटक, संगीतिका यांचा आस्वाद घ्यावा असा यशवंतरावांचा कार्यक्रम असे. देशातल्या वा परदेशांतल्या विविध स्थळांची त्यांनी थोडक्यात मार्मिकपणे वर्णने केलेली दिसतील. यांत थोडा इतिहास, खास वैशिष्ट्य, एकंदर वातावरण ही सर्व येऊन जात. युरोप अमेरिकेतील अनेक शहरांतील नदीकाठ कसा शोभिवंत असतो. या संबंधी लिहिताना यशवंतरावांनी म्हटले आहे की, पानशेतनंतर पुण्याचा नदीकाठ शोभिवंत करण्याची योजना आपण ठरवली होती. पण नंतर महाराष्ट्र सरकारने तिचे पानशेत केले. कृष्णाकाठावरच्या वास्तव्यामुळे त्यांना नदी सर्वांत आवडती वाटे.
ज्या गावास वा शहरास भेट देतील त्याचा इतिहास जाणून घेण्याची सवय असल्यामुळे, यशवंतराव अनेक गावांची जी माहिती देतात ती उल्लेखनीय असे. काबूलला गेले असता त्यांनी बामियन या गावी गौतम बुद्धाचे दोन प्रख्यात पुतळे पाहिले. त्यांनी लिहिले, की त्यांच्या आसपास चंगीझखानाने केलेल्या प्रचंड विध्वंसाचे पुरावे दिसले. एकीकडे तो विध्वंस आणि दुसरीकडे करुणामय बुद्धाचे पुतळे. यशवंतरावांनी ते पुतळे पाहिल्यानंतर पंचवीस – तीस वर्षांनी चंगीझखानाचे वारस शोभणा-या तालिबान्यांनी हे पुतळे छिन्नविछिन्न करून टाकले. अफगाण हे नाव कसे पडले? तसा काही वंश नाही. काबूलच्या म्युझियमच्या चालकाने सांगितले की, अश्ववाहन यावरून अफगाणिस्तान झाले असे मानतात. अफगाणिस्तानात घोडेस्वारी हा राष्ट्रीय खेळ मानला जातो. विविध देशांतल्या म्युझियम्समध्ये जाऊन त्यांतील चित्रकलेचे व शिल्पकलेचे उत्तमोत्तम नमुने पाहण्याचा मनसोक्त आनंद यशवंतरावांनी घेतला. व्होल्गाच्या काठावरील युद्धाचे स्मारक अगदी वेगळे आहे. तेथे जणू युद्धच चालू असल्याचा भास व्हावा अशा प्रकारचे ते आहे, असे यशवंतराव सांगतात. सिमल्यासंबंधी लिहिलेल्या पत्रात यशवंतरावांनी सिमल्यावर एखादा सुरेख लेख लिहावा असे वाटते. तशीच इच्छा इतर काही वेळा त्यांनी व्यक्त केली होती. पण लिखाण झाले नाही. ना. सी. फडके यांनी यशवंतरावांच्या लिखाणासंबंधी लिहिले होते. “भावनेने ओथंबलेलं, प्रभावी भाषेने नटलेलं लेखन जी लेखणी करू शकते ती साधीसुधी लेखणी नाही. श्रेष्ठ दर्जाच्या अस्सल साहित्यिकाच्या हातांत शोभावी अशीच ती आहे. यशवंतरावांच्या लिखाणाचा आस्वाद जेव्हां जेव्हां मी घेतो तेव्हा माझ्या मनांत येतं, यशवंतरावांच्या रूपानं महाराष्ट्राला व भारताला एक पहिल्या दर्जाचा नेता मिळाला खरा, परंतु त्यांच्यावर पडलेल्या नेतेपणाच्या ओझ्यामुळे यशवंतरावांच्या ठिकाणी जो श्रेष्ठ साहित्यिक आहे त्याचं पूर्ण कर्तृत्व प्रगट होत नाही, ही खेदाची गोष्ट म्हणावी लागेल. असं जरी असलं तरी भावी काळात त्यांच्यावर प्रचंड साहित्य निर्माण होईल, याबद्दल मला तिळमात्र शंका नाही.” भावनेने ओथंबलेले, प्रभावी भाषेने नटलेले या शब्दांत अप्पासाहेब फडके यांनी यशवंतरावांच्य़ा लिखाणाचे स्वरूप वर्णन केले आहे. त्याचा एक नमुना : “महाबळेश्र्वरला एकाच ठिकाणी पाच नद्या उगम पावतात.