जे आपणासाठी कोणी केले नाही ते आपण इतरांसाठी करावे आणि सत्तेच्या केंद्रस्थानी असताना ते केले तर अधिक फलदायी होते म्हणून अधिक मित्रभावाने, हळुवारपणे, पण विचारांच्या दिशा कायम ठेवून मी माणसे वागविली व वाढविलीही. हे सर्व ठीक आहे. पण आज जेव्हा राजकारणातले चित्र पाहतो तेव्हा माझे मन अस्वस्थ होते. खरोखरीच पण काही नव्या कामाचा पाय घातला का? खरी जिव्हाळ्याची माणसे अवतीभवती होती का?-काही काही माणसांचे नमुने पाहिले म्हणजे आश्चर्यही वाटते-खरे म्हणजे दुःख होते.
श्रीमतीजी अजून महत्त्वाच्या कामात सल्लामसलत घेतात. पण सत्तेच्या केंद्रवर्तुळाच्या बाहेर ठेवण्याचा समजेल असा प्रयत्न करतात, असा अनुभव आहे. मग मन धुमसत राहते. असे अवमानीत राहण्याने ज्यांचा मी प्रतिनिधी आहे असे मानतो, त्यांचाही अवमान तर नाही ना होत, अशी बोचणी असते, मी माझी समजूत घालतो, की नाही, असा वैयक्तिक भावनांचा विचार करून निर्णय घ्यावयाचे नसतात. राष्ट्रीय कार्य करीत असताना स्वतःला विसरले पाहिजे-भविष्याकडे लक्ष ठेवले पाहिजे. रागाने मोडता येते, जोडता येत नाही. तडजोडीने वागले पाहिजे असा विचार करून काम चालू राहते. पण ख-या अर्थाने काम चालू आहे का? की एका व्यक्तीचा अहंकार सुखविण्यासाठी हे सर्व चालू आहे? (विदेश यात्रा, पृष्ठे १३६-८)
या आधी महाराष्ट्र काँग्रेस व मंत्रिमंडळ या दोन्हींतील वादामुळे यशवंतराव बरेच व्यथित झाले होते. त्यांनी १९७४ मध्ये वेणुताईंना लिहिलेली काही पत्रे याची साक्ष देतात. विरंगुळा या संग्रहात ती समाविष्ट आहेत. एका पत्रात सातारा जिल्ह्यातील वातावरण कार्यकर्त्यातील दुफळीमुळे दूषित झाल्याचा उल्लेख असून, मंत्रिमंडळही गटबाजीत ग्रस्त झाल्याबद्दल विषाद व्यक्त झाला आहे. चाणक्य नीती वापरून मराठा-मराठेतर असा वाद सुरू करण्याचा प्रयत्न काहीजण करत असून, या लोकांना योग्य वेळी उघडे पाडण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, असे म्हटले आहे. हा वाद मागे टाकण्याचे प्रयत्न यशवंतरावांनी केले होते. यामुळेच कन्नमवार यांच्या निधनानंतर मराठा मुख्यमंत्री हवा यासाठी काही मराठा पुढा-यांनी खटपट केली असताना, यशवंतरावांनी ते मान्य केले नाही. सर्व मंत्रिमंडळाला कोण बरोबर घेऊन जाऊ शकतो, कारभाराचे कौशल्य कोणापाशी आहे, इत्यादी कसोट्या कां लावल्या पाहिजेत आणि केवळ जातीने मराठा म्हणून मुख्यमंत्र्याची निवड करणे कसे चूक होईल, हे त्यांनी एका उमेदवाराची शिफारस करण्यास आलेल्या मंडळींना समजावून सांगितले. दुस-या पत्रात मंत्रिमंडळात वेगवेगळे गट पडले असून वसंतराव नाईक यांनी त्याकेड दुर्लक्ष करू नये असा सूर आहे. त्याचबरोबर नाईक अंतर्गत गटबाजीला प्रोत्साहन देत आहेत की काय, असा प्रश्न पडत असल्याची कबुली आहे. सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची एक बैठक शरद पवार यांच्या घरी घेऊन, वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली असून, प्रत्यक्षात ही मंडळी कशी वागतात हे महत्त्वाचे असल्याचे मत दिले आहे. वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्रिपद सोडण्यास सांगावे अशी भाषा इंदिरा गांधींनी चालवली होती. तुम्ही पंतप्रधान आहांत तेव्हा काय ते ठरवा, तुमचा निर्णय मानला जाईल, असे यशवंतरावांनी सांगितल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर वसंतराव नाईक यांना प्रतिष्ठेने वागवले पाहिजे, असाही अभिप्राय त्यांनी दिला.
अखेरीस वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. आणीबाणीच्या काळात शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि नंतर राजकारणास वेगळी दिशा लागत गेली. आणीबाणीनंतरच्या काळात इंदिरा गांधींच्या बरोबर राहिलेले यशवंतराव, ब्रह्मानंद रेड्डी, स्वर्णसिंग यापैकी कोणावरच त्यांचा विश्वास नव्हता. तर ज्या प्रकारचे संघर्षाचे राजकारण त्या करू पाहत होत्या, ते या तिघांना मानवणारे नव्हते. जनता पक्षाच्या सरकारने इंदिरा गांधींच्या विरुद्ध मोहीमच काढली होती. गृहमंत्री चरणसिंग यांनी आणीबाणीच्या काळात स्थानबद्ध नेत्यांना ठार मारण्याचा इंदिरा गांधींचा कट होता, असे अतिशय बेजबाबदार विधान केले होते. इंदिरा गांधींवर खटलाही भरण्यात आला. त्यात सरकारची फजिती झाली आणि मग सामान्य लोकांच्या सहानुभूतीचा ओघ इंदिरा गांधींकडे वळू लागला. बेल्ची या बिहारमधील खेडेगावातील हरिजनांवर झालेल्या अत्याचाराच्या वेळी, गृहमंत्री चरणसिंग यांनी नव्हे, तर इंदिरा गांधींनी भेट दिली. इंदिरा गांधींनी त्या वातावरणात कर्नाटकमधील चिकमंगळूर या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात त्या विजयी झाल्या. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सभासदत्व त्यांनी सोडले आणि १ जानेवारी १९७८ रोजी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारी एक राष्ट्रीय परिषद घेतली. देशापुढील आव्हानांना सामोरे जाऊन परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी, या परिषदेने इंदिरा गांधी यांना अध्यक्ष निवडले. इंदिरा गांधींनी स्पष्ट वैचारिक मार्गदर्शन करण्याची आवश्यकता प्रतिपादून, समाजवादाकडे आगेकूच करण्यांची घोषणा केली. या रीतीने काँग्रेसमध्ये आणखी एक फूट पडली.