दोन महान सेतू बांधणारा महान इंजीनिअर
फेब्रुवारी महिन्यांत मालवण येथील कोळंबच्या पुलाच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेंत लोकांनी महाराष्ट्र सरकारचा हृदयपूर्वक गौरव केला आणि आमची ब-याच वर्षांची आकांक्षा आज पुरी होत आहे, असें सांगितलें. मी उत्तर देतांना म्हणालो, " असे दगडामातीचे पूल व रस्ते या नवमहाराष्ट्रांत किती तरी होतील. आमचे इंजीनिअर्स कठीणांतले कठीण पूल बांधतील. पण शेकडो वर्षांपासून विदर्भ व मराठवाड्याचें पश्चिम महाराष्ट्राशीं दळणवळण नव्हतें. निरनिराळ्या राज्यांच्या खाड्यांमुळे परस्पर राजकीय संबंध तुटले होते. या दोन महान खाड्या व नद्यांमुळे विदर्भांतील ९० लक्ष व मराठवाड्यांतील ५० लक्ष महाराष्ट्रीय जनता अलग पडली होती. अत्यंत प्रयासाने व परिश्रमाने महाराष्ट्राच्या महान तज्ञ इंजीनिअराने - यशवंतरावांनी-नुकतेच दोन मोठे सेतू बांधून महाराष्ट्राची ३।। कोटी जनता एकत्र आणली आहे. सर्व दृष्टीने परस्परांच्या दळवळणालायक व्यवस्था केली आहे. म्हणून नागपूरला मी, आज आपल्या कोळंब पुलाकरिता येथे येऊं शकलों. महाराष्ट्र राज्य स्थिर, मजबूत करण्याकरिता आपण सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर असे किती तरी दगडा-मातीचे पूल आणि रस्ते जागोजाग तयार होतील व ते जनतेच्या सुखांत भर घालतील. आता तुमची अडचण मी माझी अडचण ही एकात्मतेची भावना आपणांस निर्माण झाली पाहिजे. नागपूरकडल्या लोकांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रश्नांचा प्रामुख्याने विचार करावा, तर आपण रत्नागिरीकरांनी नागपूरकडल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीं झटावें. असें परस्पर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले पाहिजेत."
रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्राच्या जसा एका टोकावर आहे तसा चांदा जिल्हा देखील एका टोकाला आहे. जेव्हा मी रत्नागिरी जिल्ह्यांत येत असतों तेव्हा मी आपल्या स्वत:च्या चांदा जिल्ह्यांतच आहें असें मला वाटावयाला लागतें. या दोन्ही जिल्ह्यांत ब-याचशा बाबतींत साम्य दिसून येतें. दोन्ही जिल्ह्यांत भातशेती असून रत्नागिरी जिल्ह्याइतकें पावसाचें प्रमाण चांदा जिल्ह्याचें नसले तरी ते अर्ध तरी येईल. रत्नागिरी जिल्हा समुद्र खाड्यांनी वेष्टिलेला आहे तर चांदा जिल्हा वर्धा, वैनगंगा, गोदावरी, दीना, प्रणहीता, इंद्रावती वगैरे मोठ्या व लहान नद्या-नाल्यांनी व तलावांनी वेष्टिलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यांत समुद्राचा जलप्रवास आहे तर चांदा जिल्ह्यांत गोदावरी नदींतून आंध्र प्रांतांतील राजमहेंद्रीपर्यंत सागाच्या लाकडांची वाहतूक आहे. मागे वैनगंगा धरण योजना अमलांत आली असली तरी राजमहेंद्री ते नागपूरजवळील कन्हान नदीपर्यंत सर्व प्रकारचा जलप्रवास होऊ शकला असता. रत्नागिरींत जंगल तेवढें मोठें नाही परंतु चांदा जिल्ह्यांत मैलौगणती घनदाट जंगल असून तें महाराष्ट्रांत पहिल्या दर्जाचें जंगल मानलें जातें. रत्नागिरीच्या सडका लाल व चांदा जिल्ह्याच्या सडकाहि लाल आहेत. रत्नागिरी जिल्ह्यांत कांही प्रमाणांत खनिज द्रव्यें आढळतात तर चांदा जिल्ह्यांत ती भरपूर प्रमाणांत आहेत.
ह्या सर्व गोष्टीपेक्षा मला रत्नागिरी जिल्ह्याबद्दल जास्त आस्था वाटण्याचें कारण हें आहे कीं माझे राजकीय गुरु स्वर्गीय लोकमान्य टिळक हे रत्नागिरी जिल्ह्याचेच ! असे आत्मीयतेचे संबंध कसे जोडतां येतील याचा परस्परांकडून विचार होत गेला पाहिजे.
एकसंघ, एकजिनसी मराठी मन या नवमहाराष्ट्रांत तयार व्हावे म्हणून यशवंतरावांची तळमळ आहे. या दृष्टीने आपल्या प्रयत्नांची परकाष्ठा ते करीत आहेत व हृदयांतील स्नेहभावाचे भांडार खोलीत आहेत. गतवर्षी वर्धेला झालेल्या एक जाहीर सभेंत यशवंतरावांचे अत्यंत हृद्यस्पर्शी असें भाषण झालें ते म्हणाले, "शेकडो वर्षांपासून विदर्भांतील व पश्चिम महाराष्ट्रांतील भावाभावांची ताटातूट झाली होती. आपण एकमेकांपासून अंतरलो होतो. आज आपली राम-भरत भेट झाली आहे. आता कोण मंथरेने आम्हा भावाभावांच्या संबंधांत विष कालवूं नये, ही परमेश्वराला प्रार्थना आहे. देवाने मला विदर्भांत जन्माला न घालतां महाराष्ट्रांत देवराष्ट्र गांवी जन्माला घातलें, हा माझा दोष नाही. पण ज्यांचा परप्रांतांत जन्म झाला असूनहि केवळ व्यवसाय करण्याकरिता जे विदर्भांत येऊन राहिले त्यांचा विदर्भावर जर हक्क पोचूं शकतो तर मलाहि एखादी झोपडी अथवा घर करून नागपुरांत राहता येईल; व विदर्भाचा म्हणवितां येईल. आपले व आमचे संबंध आजचे नाहीत. अत्यंत पुरातन असे आत्मीय संबंध आहेत. अखिल महाराष्ट्रावर राज्य करणा-या छत्रपति शिवाजी महाराजांना आपल्या विदर्भाने महाराष्ट्रास दिलें आहे. विदर्भ हें शिवाजी महाराजांचे आजोळ असून त्यांच्या प्रिय जिजामातेचें माहेर आपल्या विदर्भांतील सिंदखेडराजा या गावीं आहे."