यांपैकी कोणत्या ना कोणत्या कारणांनी युद्धे अटळ असल्यामुळे प्रत्येक लोकसंघाला व राष्ट्राला खडें सैन्य व सिद्धहस्त नेतृत्व यांची आवश्यकता असते. यासंबंधांत पूर्ण विचार करून भारतीयांनी जी व्यवस्था केली ती आजहि अनेक दृष्टींनीं विचारार्ह ठरते.
आज रशियामध्ये व थोड्याच दिवसांपूर्वी इटाली, जर्मनी व जपान या देशांतून आपापलें राष्ट्र सदैव सामर्थ्यसंपन्न राखण्यासाठी सर्व लोकांत सैनिकी प्रवृत्ति सदैव जागृत राहील अशा शिक्षणपद्धतीचाच अंगीकार करण्यांत आला आहे. या शिक्षणयंत्राच्या द्वारे सारेंच्या सारें राष्ट्र युद्धप्रवृत्त व युद्धास्तव सिद्ध असा मनोवृत्तीचें करण्यांत येतें. कित्येक राष्ट्रांतून तर सैनिकी शिक्षण सक्तीचे करण्यांत येऊन प्रत्येक पुरुषाला सैनिक म्हणून कांही काळ काम करण्यास भाग पाडण्यांत येतें. त्याचा परिणाम समाजांतील सुव्यवस्था व धैर्य यांना धक्का लागण्यांत आणि सांस्कृतिक व अन्य विकासांनाहि पुरेसा वाव न मिळण्यांत होतो. ज्या मनुष्याचें ज्या क्षेत्रांत काम करण्याचें निश्चित असेल त्याच्यावर लहानपणापासून तेच संस्कार करणें व त्या दृष्टीनेंच त्याचें विकसन घडवून आणणें आवश्यक असतें. ज्याला युद्धासाठी अखंड सिद्ध राखावयाचे आहे त्याच्या मनांत विजेतृत्वाची आकांक्षा निर्माण करणें, रक्तपात व संहार यांच्याविषयी घृणा न वाटेल असें त्यांचें भावजीवन सिद्ध करणें, कशाचीहि भीति वाटणार नाही अशी मनोवृत्ति सिद्ध करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या वातावरणांत त्याला लहानपणापासून वाढविणे, युद्ध हाच धर्म वाटेल व शस्त्राघाताचें प्राणार्पण हेंच सर्वश्रेष्ठ ध्येय वाटेल असा आदर्श सतत मनावर बिंबविणें, भौतिक ऐश्वर्याच्या सीमित उपभोगाची इच्छा व लालसा अंत:करणांत जागृत राहील, करपणार नाही अशाच पद्धतीने त्यांच्या मनाची मशागत करणें इत्यादि गोष्टी आवश्यक ठरतात. हे संस्कार समाजाच्या सांस्कृतिक शिक्षकाचें काम करणा-या वर्गावर करणे अर्थात् योग्य नाही. तात्पर्य सैनिकाचे संस्कार वेगळे व अन्य वर्गाचे वेगळे असें ठरवून भारतीयांनी एक वर्गावर हे संपूर्ण संस्कार केले. हे संस्कार ज्या वर्गासाठी त्यांनी सीमित केले तो क्षत्रियांचा वर्ग होय. त्याचा परिणाम अखंड युयुत्सु प्रवृत्तीपासून शांतताप्रधान विकसनाचें कार्य करणारा समाज वेगळा राखण्यांत आला व एक आश्चर्यकारक दृश्य भारतीय राष्ट्रांत दिसूं लागलें. आणि ते दृश्य म्हणजे प्रत्यक्ष युद्धें व युद्धसंस्थेचीं कामें जोरांत असली तरी त्यापासून इतर समाजघटकांच्या कार्यांना कोणताहि अडथळा उत्पन्न होत नसे. देश व धर्म यांच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करण्याची सदैव सिद्धता असणा-या या वर्गाकडे सर्वच्या सर्व समाज अत्यंत आदरानें पाही व भौतिक जीवनांतील सत्तेच्या अत्युच्च जागा या वर्गासाठी मोकळ्या ठेवलेल्या असून त्यांच्या राष्ट्र-रक्षणाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे मोल लक्षांत घेऊन त्यांचे वजन, उच्च अधिकार व विशिष्ट सवलती यांविषयी समाजांतील कोणत्याच थराच्या मनांत मुळींच मत्सर व असूयेचा भाव नसे. आयुधजीवी संघ सर्वच प्राचीन राष्ट्रांत होते. जगांतील श्रेष्ठ तत्त्वज्ञानी पुरुषांचें राष्ट्रहि सामर्थ्याच्या अभावीं कसे नष्ट होतें हा ग्रीक राष्ट्राच्या इतिहासावरून मिळणारा धडा विसरण्यासारखा नाहीं. म्हणूनच ऋग्वेदांत म्हटलें आहे :
" अनायुधा स असता सचन्ताम् । " ( ऋ ४,५,१४ )
"जे नि:शस्त्र असतात त्यांना नेहमींच दुर्दैवाचें व दु:खाचे जीवन लाभतें."
त्यामुळे भारतीयांनी क्षात्रवर्णाची निर्मिती केली हें खरें असलें तरी इतर राष्ट्रांतील बलोपासक लढवय्यांचा वर्ग यांत व क्षत्रिय वर्ग यांत अतिशय अंतर आहे, हें क्षात्रवर्णाच्या संस्कार व शिक्षण पद्धतीचें सूक्ष्म निरीक्षण केलें तर आढळून येईल. भारतीयांचे हें वैशिष्टय आहे कीं, त्यांनी पराक्रम व पशुत्व यांची क्षात्रधर्माच्या उभारणींत गल्लत होऊं न देतां पशुत्व विरहित पराक्रमांचें संवर्धन केलें. युद्ध व संरक्षण, राज्यविस्तार व हिंसा यांनाहि धर्माच्या नियंत्रणांत ठेवून त्यांनी मानवतेचे हितशत्रु ठरण्यापासून स्वत:ला वांचविले आहे. आयुधजीवी लोकांच्या युद्धान्मुखतेचें त्यांनी समर्थन केलें, पण ध्येयवादाची आधारशिला तिला दिली. संन्यास त्यांनी या वर्णाला निषिद्ध ठरविला. पण राष्ट्ररक्षणाच्या कामीं प्राणत्याग करणारा योद्धा व ब्रह्मनिष्ठ संन्यासी यांना मोक्षाचे समान अधिकारी ठरविलें. पराक्रमाचें प्रख्यापन हा क्षत्रियाचा बाणा असला तरी भारताच्या इतिहासांत अंगी सिंहासारखा पराक्रम असून चेंगीजखान, तैमूरलंग, नादिरशहा, जनरल हॉटसन, जनरल मील यांच्यासारखे नरराक्षस उत्पन्न न होतां मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्रापासून तर पुण्यश्लोक श्रीशिवछत्रपतींपर्यंत पुण्यश्लोक राजर्षीचीच परंपरा निर्माण झालेली आहे. रणांगणावर प्राणार्पण करणें हाच ज्याचा मोक्ष, पराक्रमाचें प्रख्यापन हाच ज्याचा बाणा व जें पराक्रमानें संपादन करण्यांत येईल त्याचाच स्वीकार हें ज्याचें महाव्रत त्या या वर्णांतून पशुत्वविरहित पराक्रमी वृत्तीचा कसा आविष्कार झाला होता हें पाहावयाचें असलें तरी भारतीयांचे युद्धाचें नितिशास्त्र पाहिले पाहिजे. त्यांतील कांही नियम पुढीलप्रमाणे :