यशवंतरावांची न चुकता पत्रं येत राहिली. मीही पत्रं लिहीत गेलो. साहित्याशिवायच्या अनेक गोष्टी व व्यक्तिगत सुखदु:खं मन मोकळेपणी लिहीत गेलो. शेतीवाडीतल्या अडी-अडचणी, साहित्यातलं नवीन काही असलं तर मी त्यांना मुद्दाम लिहीत गेलो. शेतीत काही नवीन चांगलं निर्माण झालं तर उत्साहानं कळवीत राहिलो. असे संबंध वाढत गेले. दृढ झाले. सगळ्यांना आता नीट माहीत झालं होतं. पळसखेड ह्या चिमुरड्या उदासवाण्या खेड्याला एरवी कोण विचारीत होतं? मला व माझ्या कवितेला तिथे काय किंमत होती? यशवंतरावांच्या व माझ्या संबंधांची सगळ्यांना कल्पना आली तेव्हा महाराष्ट्रातल्या थोरा-मोठ्यांच्याही गाड्या माझ्या घरी येऊ लागल्या. त्यांच्या भेटीचा मला आनंदच होता, परंतु नंतर दु:ख वाढत गेलं. राज्यातल्या मंत्र्यांकडील अडून बसलेली लहान-सहान कामं, मुख्यमंत्र्यांकडली कामं, गुंतागुंतीचे प्रश्न व योजना, तिकीट मागणं, मंत्रिपद मागणं इत्यादी नको त्या अनंत गोष्टींसाठी माझ्यावर तासनतास दडपण आणून, चिठ्ठी, पत्र घेऊन लोक दिल्लीला जाऊ लागले. माझ्यामार्फत त्यांचं काम अधिक चांगलं व निश्चित होईल अशी त्यांची भावना होती. मी खूपच भिडस्त. मोठी माणसं घरी आलेली. नाही कसं म्हणणार? प्रत्येक वेळी इच्छा नसूनही मला यशवंतरावांना लिहावं लागलं. पुण्याला एका समारंभात यशवंतरावांशी माझी गाठ पडली. मी दूर उभा राहायचो. काहीतरी चूक केल्यासारखा माझा चेहरा असायचा. सगळ्यांशी बोलून झाल्यावर गर्दीतून ते माझ्याकडे आले.
“काय कविराज?”
“ठीक चाललंय्,” मी.
यशवंतराव हसले
“तुमचा स्वभाव आता मला माहीत झालेला आहे. सदैव कार्यरत असलेल्या उद्योगी लोकांचा मला नीट परिचय-ओळख आहे. तुम्हांला ते सगळं नवीन आहे. तुम्ही ह्या मंडळींना नकार देणं, दुखावणं शक्य नाही. मी योग्य ते काम जरूर करीन. अयोग्य काय ते मला ठाऊक आहे. तुम्ही अकारणी संकोचण्याचं कारण नाही. आमचं हे जग असंच चालत असतं. तुम्ही मला लिहीत रहा.”
मी एक शब्दही बोललो नव्हतो.
ते माझ्या मनाच्या तळघरात घुसले.
माझं अवघडलेपण त्यांनी क्षणात दूर केलं.
स्वामी रामानंदतीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव व कित्येक स्वातंत्र्यसेनानींनी हैद्राबाद स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास घडविला. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. माझ्या सोयगाव तालुक्यात व जवळपासच्या जळगाव-अजिंठा परिसरात खूप स्वातंत्र्यसैनिक सरहद्दीवर भूमिगत काम करीत होते. १९४८ ला माझ्या गावात जबरदस्त लढा झाला. दोन माणसं कापली गेली, ते हुतात्मे झाले. माझं खेडं वर्ष-सहा महिने माणसांशिवाय बेचिराख होतं. मला ह्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा अभिमान होता आणि आजही आहे. एक दिवशी माझ्या सोयगाव तालुक्यातपले कौली ह्या गावाचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री. हरीभाऊ गोडबोले माझ्याकडे आले. खूप कामाची कागदपत्रं आणली. मी हबकलो. हरीभाऊ मला म्हणाले-
“तुमचं यशवंतरावांचं इतक चांगलं आहे तर मला चिठ्ठी द्या.”
“कशासाठी?” मी.
“मी स्वातंत्र्यसैनिक. लढ्यात एवढं काम केलं आहे. घरी काही फार आधार नाही. आर्थिक स्थिती फार वाईट आहे. तुम्ही मदत करावी असं वाटतं.”
“मी काय करू शकतो?”